पीटर ड्रकर यांनी त्यांच्या ‘फ्युचर चेंज इन मॅनेजमेंट’ या ग्रंथात असे म्हटले आहे की, एकविसाव्या शतकाच्या शेवटी जगात विद्यापीठे असणार नाहीत. प्रत्येक जण संगणकाच्या पडद्यावर शिकेल.
अशा बदलत्या काळात शिक्षकांची भूमिकाही बदलणार आहे. पुस्तके वाचून ज्ञान देण्याचे दिवस संपले आहेत. स्वतः शिक्षकाला ज्ञान समजून घेता आले पाहिजे आणि आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असलेल्या विद्यार्थ्याला त्यात सहभागी करून घेता आले पाहिजे.
माहिती युगाने मानवी जीवनाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला आहे. या वर्तमानसंदर्भात बदलती शिक्षणपद्धती व शिक्षकांपुढील आव्हाने यांचा विचार करणे अगत्याचे ठरते.

आज शिक्षणाचा प्रवास गुरुकुलापासून ते इ-गुरुकुलापर्यंत झाला आहे. इ-लर्निंग किंवा ऑनलाईन लर्निंग हे नव्या शिक्षणाची वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकजण सध्या संगणकाच्या पडद्यावर शिकत आहे.

भारतीय शिक्षणसुद्धा हळूहळू बदलत आहे. कर्नाटकातील बेळगाव येथील सर मोक्षमुंडम विश्वेश्वरय्या विद्यापीठात प्रवेशापासून ते निकालापर्यंतची सर्व व्यवस्था ऑनलाईन केली आहे.

लेखक – प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

एक ताजे उदाहरण म्हणजे मुंबईतील एका विद्यार्थ्याने अमेरिकेतील एमबीएसाठी प्रवेश परीक्षा दिली आणि त्याला प्रवेश मिळाला. जगाच्या कुठल्याही देशात नोकरी, सेवा, शिक्षण यासाठी मुलाखती ऑनलाईन देता येतात आणि विद्यार्थ्यांची निवड होऊ शकते.

इ-लर्निंगची व्याख्या करताना असे म्हटले जाते लर्निंग इलेक्ट्रॉनिकली, लर्निंग इफेक्टिव्हली, लर्निंग इझीली. ज्ञानकेंद्री समाजात माहिती तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे.

आजच्या समाजाचे वर्णन नॉलेज इंटेन्सिट सोसायटी असे केले जाते. त्या ज्ञानकेंद्री समाजामध्ये प्रगत माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संगणकीकरण, कॉम्प्युटराझेशन आणि सायबर स्पेसचा उपयोग करून शिक्षणाचा प्रसार केला जात आहे.

संकेतस्थळावरून परस्परांच्या कल्पनांचे आदानप्रदान होत आहे. इ-लर्निंग हे आंतरक्रियात्मक आणि विचारपूर्वक विकसित करण्यात आले आहे. आपल्यासमोरील समस्यांना प्रभावीपणे उत्तर देण्यासाठी आणि शिकणार्‍या विद्यार्थ्याला शंका निरसन करण्यासाठी या सुविधेचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो.

इ-लर्निंगच्या सर्व सुविधांचा उपयोग करून शिक्षकांनासुद्धा अद्ययावत आणि प्रगत दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. हार्वर्ड शिक्षणपत्रिकेत असे म्हटले आहे, लॅपटॉपचा वापर करून वर्गात शिकवणेे आनंददायी आहे.

आपल्या लॅपटॉपचा, पॉवरपॉईंटचा उपयोग करून आपला वर्ग आनंददायी करणे आणि आपल्या विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणे ही शिक्षकांची भूमिका असणार आहे. पुर्वीच्या काळी शिक्षक पंतोजी होते.

ते पुस्तके वाचून मुलांना ज्ञान देत होते. आता आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असलेल्या विद्यार्थ्याला त्यात सहभागी करून घेता आले पाहिजे.

शिक्षकाची बदलती भूमिका सांगताना असे म्हटले आहे की तो विद्यावान तर असावाचा; पण त्याच्याकडे सारग्रही ज्ञान असावे. तो एक उत्तम दर्जाचा व्यवस्थापक, नायक असावा. शिक्षक चुंबकाप्रमाणे विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेणारा असावा.

भारताच्या माजी पंतप्रधान जेव्हा जपानला गेल्या होत्या तेव्हा तिथल्या शिक्षकांच्या पगाराची चौकशी त्यांनी केली होती. तेव्हा तिथल्या शिक्षणमंत्र्यांनी तिथल्या शिक्षकांचे पगार जिल्ह्याच्या कलेक्टरएवढे आहेत, अशी माहिती दिली.

त्यानंतर इंदिरा गांधी यांनी नवा वेतन आयोग नेमला. 1975 मध्ये 300 ते 600 रुपये पगाराची श्रेणी असलेल्या प्राध्यापकांची श्रेणी 700 ते 1600 अशी करण्यात आली.

प्राथमिक, माध्यमिक किंवा प्राध्यापक यांची वेतनश्रेणी समाधनकारक आणि ज्ञानप्रक्रियेला पोषक झाली आहे. अध्यापन, अध्ययन, संशोधन आणि कार्यविस्तार चांगल्या प्रकारे करण्यासाठी योग्य आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भारतीय शिक्षकांच्या प्रशिक्षणाची समस्यासुद्धा महत्त्वाची आहे. राजीव गांधी यांनी 1987 मध्ये भारतात हार्वर्ड विद्यापीठाच्या धर्तीवर पन्नास अ‍ॅकाडमिक स्टाफ कॉलेजेस म्हणजेच मनुष्य विकासाची केंद्रे स्थापन केली.

त्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाऊ लागले. दरवर्षी 40 ते 50 अभ्यासक्रम करून ते या केंद्रातून शिकवले जातात. शिक्षकांना त्यांच्या कार्यकाळात तीन ते चारवेळा प्रशिक्षण दिले जाते.

युनेस्कोनेही भारताने सुरू केलेल्या या शिक्षक प्रशिक्षणाच्या उपक्रमाचे स्वागत केले आहे. शिक्षक भाषा, सामाजिक किंवा विज्ञान-तंत्रज्ञानाचा असो संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. संगणकाचे ज्ञान असेल तर जगातील कोणत्याही विद्यापीठात जाऊन शिक्षक पहिल्या क्रमांकाचा दर्जा प्राप्त करू शकतो.

आपण शिक्षण व्यवस्थेत प्रगत, अद्ययावत आणि आधुनिक बदल करत शिक्षणाला अग्रेसर आणि कार्यक्षम, कालसुसंगत बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

भारत सरकारच्या मानव संसाधन कार्यालयाने नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुसूत्रपणे आणि प्रभावीपणे सुरू केली आहे. या नव्या धोरणानुसार प्रगत माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षणाला अधिक प्रगत रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भारतीय शिक्षणापुढे तीन गोष्टींचे आव्हान आहे.

संख्या, समानता आणि गुणवत्ता. भारतात महाविद्यालये, विद्यापीठे यांची शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे पण या संख्येचे गुणात्मक वाढीत रूपांतर करण्याची गरज आहे.

चीनसारख्या देशात 1200 विद्यापीठे आहेत आणि आपल्याकडे त्याच्या निम्मीच विद्यापीठे आहेत. आपणास चीनपेक्षा एक पाऊल पुढे टाकत 1600 विद्यापीठे निर्माण करावी लागणार आहेत.

प्रत्येक जिल्ह्यात एक स्वायत्त विद्यापीठ असावे लागेल आणि त्याचा दर्जा समसमान असावा लागेल. तिसरे महत्त्वाचे आव्हान गुणवत्तेचे आहे. गुणवत्ता ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत श्रेष्ठ दर्जाची असली पाहिजे.

प्रवेश घेतलेल्या संस्थेमध्ये किती चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले जाते? तेथील शिक्षकांची पात्रता काय आहे? ते किती गुणवान आहेत? यावरच शिक्षणाचा नावलौकिक अवलंबून असतो. शिक्षकांच्या नावाने ओळखली जाणारी विद्यापीठे जगात श्रेष्ठ ठरली आहेत.

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड, हार्वर्ड किंवा इंग्लंडमधील ऑक्स र्ड, केम्ब्रिजसारखी विद्यापीठे शिक्षकांमुळे ओळखली जातात.
तिथले नामांकित शिक्षक हे त्या विद्यापीठाचे प्रतीक असतात.

नजीकच्या भविष्यकाळात आपणास भारतातील दहा विद्यापीठे तरी जगातील शंभर विद्यापीठांच्या यादीत आली पाहिजेत, असा प्रयत्न केला पाहिजे.

हे काम संस्थेने किंवा सरकारने केल्याने होणार नाही तर हा संकल्प शिक्षकांनीच केला पाहिजे. बदलत्या शिक्षण पद्धतीचे आव्हान पेलण्यासाठी शिक्षक जर बलवान, बलशाली झाले तरच चित्र बदलू शकेल.

नालंदा आणि तक्षशीला विद्यापीठांप्रमाणे भारतातील विद्यापीठे पुन्हा तेजाने झळकू लागतील. जगातील विद्यार्थ्यांचा ओघ भारताकडे वळू लागेल अशाप्रकारची गुणवत्ताप्रधान शिक्षणपद्धती विकसित करण्याचे काम भारतीय शिक्षकाने करावे.

 

LEAVE A REPLY

*