आपली मुले ज्यांच्याकडे देतो ती मंडळी विकासाला सामोरी जाणारी, नव्या गोष्टी धडाडीने करून पाहणारी, अपयशाला न कचरणारी, कष्टाला न घाबरणारी, उमेदीनेे सतत कार्यशील राहणारी आहेत असे समाजाला पाहायला मिळाले तर समाज निर्धास्तपणे आपली मुले भविष्याची गुंतवणूक करणार्‍या शिक्षकांच्या हवाली करतात.
त्यासाठी शिक्षकांनी स्वतःची आणि आपल्या पेशाची विश्वासार्हता सातत्याने वाढती ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे.
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या अत्यंत प्राथमिक गरजात कालौघात बदल होऊन त्यात शिक्षणाचाही समावेश झाला. माणूसपण साध्य करायचे असेल तर शिक्षण हे एकमेव माध्यम आहे.

त्या क्षेत्रात असलेल्या शिक्षक नावाच्या सुज्ञ व्यक्तीमुळे हे साध्य होते. माणसाचा विकास, उन्नती किंवा उद्धार होण्याची बीजे शालेय वयातच शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या मनात रुजवली जातात.

गेल्या आठवड्यामध्ये मी काही शाळांना भेटी दिल्या. या शाळा 365 दिवस भरतात. गावकर्‍यांचे 100 टक्के योगदान मिळत आहे.

हे सर्व कसे शक्य आहे याचा सखोल विचार केला त्यावेळी तिथल्या गावकर्‍यांनी सांगितले, या शाळेत काम करणारे शिक्षक हे या क्रांतीच्या केंद्रस्थानी आहेत.

या शाळेतील शिक्षक सकाळी सातपासून संध्याकाळी साडेसातपर्यंत शाळेत असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार जेव्हा मार्गदर्शनासाठी येणे शक्य आहे तेव्हा ते येतात.

लेखक – डॉ. अ. ल. देशमुख

तेव्हा शिक्षक उपलब्ध असतात. या शिक्षकांनी शाळांमधून अनेक नावीन्यपूर्ण योजनांची सुरुवात केली आहे. शिक्षकांचे हे योगदान विचारात घेऊन गावकर्‍यांनी शिक्षकांना शाळेत येण्यासाठी कार भेट दिली आहे. प्रातिनिधिक स्वरुपातील हे उदाहरण सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कार्यरत आहे.

महाराष्ट्राचा विचार केल्यास प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासकीय योजनेतून जे यश मिळाले आहे ते केवळ शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच आहे. महाराष्ट्रामध्ये तंत्रस्नेही शिक्षकांचे एक जाळे निर्माण झाले आहे.

निष्ठेने काम करणार्‍या शिक्षकांची पुन्हा नव्याने उभारणी होऊ लागली आहे. अनेक शिक्षक फक्त शाळेपुरतीच आपल्यावर जबाबदारी आहे असे न मानता समाज परिवर्तनाची, राष्ट्र घडवण्याची जबाबदारी आमचीच आहे, संपूर्ण विकासाची प्रक्रिया आमच्यावर अवलंवून आहे ही विचारसरणी मनात ठेवून मोठ्या प्रमाणात सध्या कार्यरत आहेत.

राष्ट्राला आणि संपूर्ण मानवजातीला स्वतःच्या अस्तित्वासाठी मने बदलायच्या, घडवायच्या सामर्थ्याविषयी कोणाचा भरवसा वाटत असेल तर तो शिक्षणाचा आणि ते साध्य करण्याची जबाबदारी घेणार्‍या शिक्षकांचा.

त्यामुळे शिक्षकांच्या वर्तनाकडे समाज फारच काटेकोरपणे पाहत असतो. संयम, सहनशीलता, सद्भावना, सत्शील, सद्विचार, सदाचार या सर्वच अपेक्षा शिक्षकांकडून केल्या जातात.

समाजाला शिक्षकांकडून ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक या तीनही क्षेत्रातील परिपक्वता अभिप्रेत आहे. गैरवर्तन करणार्‍या शिक्षकाला समाज स्वीकारत नाही हे कटू पण सत्य आहे. त्यामुळे शिक्षकाला चुका करताच
येत नाहीत.

शिक्षकांचे स्थान समाजात एका विशिष्ट उंचीवर आहे. शिक्षकाचे व्यावसायिक व्यक्तिमत्त्व सतत समृद्ध होत राहणे ही काळाची गरज आहे.

आपली मुले ज्यांच्याकडे देतो ती मंडळी विकासाला सामोरी जाणारी, नव्या गोष्टी धडाडीने करून पाहणारी, अपयशाला न कचरणारी, कष्टाला न घाबरणारी, उमेदीने, उत्साहाने सतत कार्यशील राहणारी आहेत असे समाजाला पाहायला मिळाले तर समाज निर्धास्तपणे आपली मुले भविष्याची गुंतवणूक करणार्‍या शिक्षकांच्या हवाली करतात.

त्यासाठी शिक्षकांनी स्वतःची आणि आपल्या पेशाची विश्वासार्हता सातत्याने वाढती ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे.

स्वतःमध्ये सतत विकासाची प्रक्रिया सुरू राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिेजेत. आजची स्थिती किंवा परिस्थिती आम्हीच बदलू शकतो, असा मनाशी ठाम विश्वास ठेवणे आवश्यक आहे.

इतरांना सुधारायला न जाता स्वतःत बदल करून परिस्थितीत बदल घडवून आणायचा तर त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे.

बदल होण्यास वेळ जरूर लागेल. पण तो घडतो यावर शिक्षकांचा अटळ विश्वास असणे गरजेचे आहे. यासाठी स्वतःमध्ये प्रवृत्ती बदल आणि मानसिक तयारी करण्याची गरज आहे.

नव्या जगातील शिक्षक ज्ञान पातळी, प्रभावी व परिणामकारक अध्यापन पद्धती आणि मूल्यमापनाची विविध तंत्रे ही शैक्षणिक सामुग्री वापरणारा असलाच पाहिजे; पण त्याहीपेक्षा कणभर जास्त भावनिकता, मानसिकता, प्रेम, जिव्हाळा, आत्मियता, उदात्त अंतःकरण हे गुण असणारा आवश्यक आहे. त्यांच्या या गुणांवरच विद्यार्थी माणूस म्हणून घडणार आहे. आपल्या (शिक्षकांच्या) पूर्वजांनी हेच केले आहे.

आपण 21 व्या शतकात प्रवेश केलेला आहे. हे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. शिक्षणाचा प्रवास दृकश्राव्य अध्यापनाकडे जास्तीत जास्त वळलेला आहे. आपल्यासमोर असलेले विद्यार्थी संगणक साक्षर आहेत.

डिजिटलायझेशनच्या आजच्या युगामध्ये शिक्षक शंभर टक्के साक्षर असणे आवश्यक आहे. परंतु आजही पन्नास टक्के शिक्षक बदलाला तयार नाहीत. इ-लर्निंग आणि इ-बुकच्या जमान्यात अजून ते कागदी पाठ्यपुस्तकातच रमून आहेत.

मोबाईलचा वापर शैक्षणिक साधन म्हणून अधिकाधिक केला पाहिजे यासाठी शिक्षक जागरुक असणे आवश्यक आहे. ब्लॅकबोर्ड किंवा फळ्याऐवजी स्मार्टबोर्डचा वापर जेव्हा शिक्षक करू लागतील तेव्हाच काळाच्या ओघानुसार कार्यपद्धती सुरू राहील.

संगणक, इंटरनेट, फॅक्स, उपग्रह, क्लिप्स, ब्लॉग्ज, वेबसाईट, यू-ट्यूब, विकिपिडिया, ऑनलाईन शिक्षण यांचा वापर करण्याचे कौशल्य किंवा तंत्रज्ञान शिक्षकांनी अवगत करून घेणे, त्यावर प्रभुत्व मिळवणे आणि त्याचा दैनंदिन अध्यापनात वापर करणे ही आजच्या काळाची गरज आहे.

कारण जनसामान्यांपर्यंत ही चळवळ फक्त शिक्षकच पोहोचवू शकतात, हे वास्तव आहे. स्वतःजवळच्या सामर्थ्याचा वापर न केल्याने आणि स्वतःजवळ हे सामर्थ्य आहे याचाच पत्ता न लागल्याने शिक्षक

मित्रांना आपले आंतरिक सामर्थ्य उमगण्यात अडचण येत आहे हे सध्या सर्वत्र दिसून येते.
नुकत्याच साजर्‍या झालेल्या शिक्षकदिनानिमित्त शासनाने ही बाब लक्षात घेऊन शिक्षक प्रशिक्षण प्रभावी कसे करता येईल याविषयीचा विचार करण्याची गरज आहे.

हे न होता अजूनही शासन शिक्षकांना आपल्या धाकात ठेवू पाहत आहे. अनेक शाळांमधून अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न शासनाला सोडवता आलेला नाही.

तंत्रज्ञानाच्या या आधुनिक युगात काही गावांमधून शिक्षकांना टमरेल घेऊन सकाळी बाहेर पडणार्‍या लोकांची मोजणी करण्याचे काम दिले जात आहे.

दोन वेळचे पुरेसे जेवण मिळेल एवढेही वेतन विनाअनुदान तत्त्वाच्या शिक्षकांना मिळत नाही. अध्यापनाशिवाय इतर कामांमध्येच शिक्षकांना जास्त गुंतवून ठेवले जाते.

खासगी संस्थाचालकांचे वर्चस्व तर शिक्षकांवर आहेच. या सर्व व्यथा दूर करता येतात का, कमी करता येतात का, याचा विचार होणे आवश्यक आहे. शिक्षकांचे कौतुक करणे, पुरस्कार देणे, सन्मान देणे या सर्व गोष्टींबरोबरच शिक्षकांच्या अडचणी, प्रश्न दूर करणे अधिक महत्त्वाचे आहे.

 

 

LEAVE A REPLY

*