Blog : चला, विद्यार्थ्यांना खुले व्यासपीठ देऊ या !

0

7 नोव्हेंबर 1900 या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला. यंदापासून हा दिवस ‘विद्यार्थी दिवस‘ म्हणून साजरा केला जाणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भातले परिपत्रकही काढले आहे. पण इतर दिवसांसारखा हा दिवस फक्त साजरा न करता शाळाशाळांनी विद्यार्थ्यांसाठी एक खुले व्यासपीठ जर सुरु केले व ते त्यांना खर्‍या अर्थाने बोलते केले तर…! जरा गंभीरपणे विचार करु या सर्व गोष्टींचा…

नोव्हेंबर महिना, शाळांचे द्वितीय सत्र. या द्वितीय सत्रात परीक्षेसह शैक्षणिक सहली, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन वगैरे गोष्टी आहेत. त्यात 11 नोव्हेंबर ‘शिक्षण दिन’, 14 नोव्हेबर ‘बालदिन’, 19 नोव्हेंबर ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’, 26 नोव्हेंबर ‘संविधान दिन’ हेही विशेष दिन आहेत.

त्यात आता 7 नोव्हेंबर हा साजरा करायचायं तो ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या परिपत्रकात ‘विद्यार्थी दिवस’ कसा साजरा करायचा ? हे सांगितले.

या दिनानिमित्ताने सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि काव्यवाचन व्हावे, ही अपेक्षा आहे.

डॉ. आंबेडकर यांचा ‘शाळा प्रवेश दिवस’ हा एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल निश्चितच म्हटले पाहिजे आणि त्या निमित्ताने खरचं ‘विद्यार्थी दिवस’ हा सर्वांच्या स्मरणात राहील असा पण विद्यार्थीमय व्हायला हवा आहे.

मला असं वाटतं की, 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक शाळेने विविध, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम हाती घेत तो सप्ताह जर संपूर्णतः विद्यार्थ्यांच्या मदतीने साजरा केला, त्यांच्या कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम आखले तर, ती पुढील स्नेहसंमेलनाची छानशी तयारी ठरु शकेल.

आज इयत्ता पहिली पासून पुढे ज्ञान रचना वादावर आधारित पाठ्यपुस्तके आहेत, जी खरचं वैशिष्ठ्यपूर्ण विद्यार्थ्यांना बोलता व लिहिती करणारी आहेत.

– चंद्रकांत भंडारी, जळगाव
शिक्षक समन्वयक, शालेय विभाग,
के.सी.ई. सोसायटी, जळगाव.
मो. 9890476538

तेव्हा त्या त्या इयत्तेची पाठ्यपुस्तके व त्यातील निवडक, पाठ्यांशांना जर विद्यार्थ्यांमार्फत बोलतं, लिहितं व नाट्यीकरण करता आलं तर तो प्रयोग एखाद्या अभ्यास जत्रेसारखे होऊ शकेल.

आज विद्यार्थ्यांना बोलायला, लिहायला तसे खुले व्यासपीठ नाही. शाळा, वर्गखोल्या, ज्ञानरचनावादी वा डिजीटल झाल्याय. पण मुले कुठे त्या त्या तंत्राशी, यंत्रांशी जोडली गेलीये ? कॉम्प्युटर, प्रोजेक्टर, टीव्ही वगैरे सर्वकाही संगणक कक्षात आहे. पण त्याच्या सार्‍या किल्ल्या आहेत त्या मास्तरांच्या हातात.

तेव्हा, शाळेविषयी व अभ्यासाविषयी जर विद्यार्थ्यांना जिव्हाळा, प्रेम वाटावे असे वाटत असेल, त्यांना शाळेची गोडी लावायची असेल तर सात नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या सप्ताहाच्या सर्वच शाळांनी (नियोजनबध्द रित्या) छानसा उपयोग करुन घेतला पाहिजे.

विधायक, रचनात्मक व समाजभिमुख कार्य जर उभे करायचे असेल तर विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक, पालक-शिक्षक संघ व इतर घटकांचीही मदत घेणे गरजेचे आहे.

तेथून निश्चितच शाळेविषयी, विद्यार्थ्यांविषयी, जिव्हाळा, प्रेम निर्माण होईल. याबाबत माझ्या मनात कुठलीच शंका नाही. अहो, पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन वा आऊट ऑफ बॉक्स विचार करुन वा तसे नियोजन करुन जेव्हा विद्यार्थ्यांची उत्सुकता व चिंतनशिलता आम्ही वाढवू तेव्हा असे हे ‘विद्यार्थी दिवस’ खरच कारणी लागतील.

मुलांचं शिकण्याचं व शिक्षकांचं शिकवण्याच टायटल क्लिअर होईल. असे मला शंभर टक्के वाटतं असो. आजची शिक्षण पध्दती विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देते की, त्यांची शिकण्याची उर्मी दाबून टाकते.

असा प्रश्न मलाच नव्हे तर सर्वच विद्यार्थीप्रेमींना पडतो. त्यात मुलांचा आनंद हिरावून घेणारी आणि म्हणून कंटाळवाणी वाटणारी सक्तीची गोष्ट म्हणजे गृहपाठ लिहा, उतरवून काढा, असे सांगणारा हा गृहपाठ ?

आम्ही कां यांत्रिक पध्दतीने पुरा करण्याचा आग्रह धरतो ? अध्ययन क्रियेत गृहपाठाला निश्चीत स्थान आहे. पण तो इतका बोअर असावा ? अहो, मुलांच्या मेंदूत काय भरावं ? कसं भराव ? आणि त्यांना हुशार, व्यवहारी माणूस म्हणून कस घडवावं? याचे असंख्य प्रयोग आपल्या समाजात घडले, घडताय.

त्या विविध प्रयोगांद्वारे विद्यार्थ्यांना जर आम्ही मुक्तपणे व्यक्त होण्याची संधी दिली. त्याचं भावविश्व जर खुलं करुन देण्यासाठी छोटसं व्यासपीठ जर त्यांना दिलं तर? मला वाटतं, त्यासाठीच हे सारे दिवस/दिन असतात.

तेव्हा 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना लिहितं करणारं, बोलतं करणारं, घडविणारं व्यासपीठ खुले करावे, पण एक पथ्य जरुर पाळावं ते म्हणजे हे व्यासपीठ, तीन-चार वा पाच-सहा वर्षांच्या लेकरांसाठी सक्तीचे नसावं. कारण ते वय (?) स्पर्धेचा अनुभव देण्याचं, बक्षीस पटकावण्याचं नाहीये, हेही ध्यानी घ्यावं!

 

 

LEAVE A REPLY

*