Blog : वेगळ्या वाटेने जाणारे; पण ? 

0
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेले अफगाणिस्तानसंदर्भातील नवे धोरण ओबामांच्या धोरणांपेक्षा वेगळ्या वाटेने जाणारे आहे.
ट्रम्प यांनी अफगाणिस्तानच्या मुद्यावरून पाकिस्तानला दोषी धरून थेट टीका केली आहे. पाकिस्तानवर केवळ टीका न करता त्यांना देण्यात येणारी विविधांगी मदत रोखणे गरजेचे आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच अफगाणिस्तानविषयीचे आपले नवे धोरण जाहीर केले आहे. तालिबानबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा करायची नाही, शस्रास्रांचा वापर करून त्यांना नष्ट करायचे, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे.

तालिबानचा धोका प्रत्येक लोकशाही राष्ट्रांना आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी तालिबानला संपवणेच आवश्यक असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

त्यांनी अफगाणिस्तानमधील अस्थिरतेच्या, अराजकाच्या मुद्यावरून पाकिस्तानवर प्रत्यक्ष टीका केली आहे. यापूर्वीच्या काळात टीका थेट अथवा अधिकृत नसायची.

परंतु ट्रम्प यांनी आपल्या अफगाणिस्तान धोरणात पाकिस्तानला उघड उघड ताकीद दिली आहे. त्यांनी सांगितले, अफगाणिस्तानातील 40 टक्के भाग तालिबानच्या नियंत्रणाखाली आहे.

लेखक – डॉ. शैलेंद्र देवळाणकर

पाकिस्तान पुरस्कृत जे दहशतावादी गट, विशेषतः हक्कानी समूहासारखे गट पाकिस्तान, अफगाणिस्तान दोन्ही देशांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे अफगाणिस्तानच्या बाबतीतील धोरण चुकीचे आहे.

वरकरणी पाकिस्तान अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य पाहिजे आहे असे सांगत आहे. परंतु पाकिस्तानचा प्रयत्न अफगाणिस्तानात अस्थिरता माजवण्याचाच आहे. हा देश तालिबान आणि हक्कानींसारख्या गटांना समर्थन देतो आहे.

अफगाणिस्तानात अमेरिकेच्या माध्यमातून जे लोकशाही शासन निर्माण झालेले आहे त्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न पाकिस्तान आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना करत असतात.

पाकिस्तानने हे दुटप्पी धोरण सोडले पाहिजे, अशा खरमरीत शब्दांत पाकिस्तानची कानउघाडणी केली आहे. पाकिस्तानला हा उघड इशारा आहे. असा इशारा आजवरच्या एकाही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडून कधीच दिला गेला नाही.

अमेरिकेच्या नव्या धोरणाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे अफगाणिस्तानात भारताने अधिकाधिक सक्रिय भूमिका पार पाडायला हवी अशी इच्छा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.

भारताची भूमिका सर्वसमावेशक असावी अशा स्वरुपाचे विधान त्यांनी केले आहे. त्याचबरोबर भारताने सामरिक भूमिकाही घ्यावी याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

ट्रम्प यांनी आणखीही एक विधान केले असून त्यातून एक उद्देश स्पष्ट होतो. भारत- अमेरिका व्यापारात भारताला मोठा फायदा होतो.

हा आर्थिक नफा होत असल्याने भारताने अफगाणिस्तानची आर्थिक बाजू उचलून धरावी, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे अशा अर्थाचे विधान ट्रम्प यांनी केले आहे.

भारताने अफगाणिस्तानमध्ये सक्रिय भूमिका राबवावी हा ट्रम्प यांचा आग्रह निश्चितच महत्त्वाचा आहे. मात्र अफगाणिस्तानसंदर्भातील भारताच्या भूमिकेला पाकिस्तानचा कायमच नकार राहिलेला आहे.

1990 च्या दशकापासून पाकिस्तानने यासंदर्भात विरोध केला आहे. विशेष म्हणजे त्याला पश्चिम युरोपिय राष्ट्रांचाही पाठिंबा होता.

1990 च्या दशकात अफगाणिस्तानवर अनेक परिषदा, सभा झाल्या. त्या कोणत्याही परिषदांमध्ये भारताने अफगाणिस्तानात महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असे म्हटले गेले नव्हते.

1996 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि जगभरात दहशतवादाची निर्यात सुरू झाली तेव्हा मात्र पाकिस्तानची दुटप्पी भूमिका पश्चिम युरोपिय राष्ट्रांच्या व अमेरिकेच्या लक्षात आली.

तालिबानमार्फत पाकिस्तान अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवू इच्छितो हे स्पष्ट झाले. तेव्हापासून पश्चिम युरोपिय राष्ट्रांनी आणि अमेरिकेने भारताच्या भूमिकेवर भर द्यायला सुरुवात केली.

2002 नंतर जेव्हा तालिबानचा पाडाव झाला त्यानंतर भारताने अफगाणिस्तानात विकासात्मक भूमिका बजावायला सुरुवात केली आहे. दरवर्षी भारत सुमारे 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज अफगाणिस्तानला देतो आहे.

त्यातून तिथे विकासात्मक, संसाधनात्मक काम होते आहे. रस्ते, रुग्णालये, महाविद्यालये बांधली जात आहेत. 2011 मध्ये भारताने अफगाणिस्तानशी सामरिक सुरक्षेचा करारही केला आहे.

मात्र भारत कोणत्याही परिस्थितीत संरक्षक भूमिका पार पाडायला तयार नाही. ही संरक्षक भूमिका न घेण्यामागे पाकिस्तानला वाटणारी असुरक्षितता आणि पाकिस्तानचा विरोध ही दोन कारणे आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही अफगाणिस्तानात भारताने सामरिक भूमिका बजवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आता ट्रम्प यांनी त्याला पुन्हा दुजोरा दिला आहे.

आता प्रश्न उरतो तो ट्रम्प यांनी पाकिस्तानवर उघड टीका करण्यामागचे कारण काय? पाकिस्तानची चीनशी वाढती जवळीक, आर्थिक परिक्षेत्र निर्मिती, चीनच्या सहकार्यातून पाकिस्तानची अफगाणिस्तानातील वाढती भूमिका तसेच पाकिस्तानच्या माध्यमातून चीनचा पश्चिम आशियात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टींमुळे अमेरिका पाकिस्तानवर नाराज आहे. या सर्वातून अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात विश्वास तूट वाढताना दिसते आहे.

ट्रम्प यांच्या नव्या धोरणामध्ये चीनच्या भूमिकेबाबत कोणतेही वक्तव्य केलेले दिसत नाही. ओबामांनी चीनने अफगाणिस्तानात सकारात्मक भूमिका पार पाडावी यावर भर दिला होता. मात्र ट्रम्प यांनी असे कोणतेही वक्तव्य करायचे टाळले आहे.

ट्रम्प यांची अफगाणिस्तानविषयक भूमिका प्रत्यक्षात यायची असेल तर काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. अफगाणिस्तानच्या समस्येचे मूळ लक्षात घेतले पाहिजे.

पाकिस्तान जोपर्यंत दुटप्पी भूमिका सोडणार नाही किंवा तालिबानला मदत करत राहील तोपर्यंत अफगाणिस्तानचा प्रश्न सुटणार नाही.

म्हणूनच ट्रम्प यांनी केवळ टीका करून किंवा इशारा देऊन भागणार नाही तर त्यांनी पाकिस्तानला केली जाणारी विविधांगी मदत थांबवली पाहिजे. इराणप्रमाणे पाकिस्तानवरही आर्थिक निर्बंध घातले गेले पाहिजेत.

तसेच अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर हवाई हल्ले केले गेले पाहिजेत. तिथे कार्यरत असणार्‍या हक्कानीसारख्या दहशतवादी संघटना नेस्तनाबूत केल्या पाहिजेत.

या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत अमेरिकेचे अफगाणिस्तानचे धोरण प्रत्यक्षात येण्यास मदत होणार नाही.

 

LEAVE A REPLY

*