Blog : अरेरे! आमच्या गांधी प्रेमाची अशी संभावना ?

0

1948 मध्ये नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली; पण आम्ही ‘गांधीजींचा विजय असो’ असे म्हणतो आणि दररोज गांधीजी व त्यांच्या विचारांची हत्या करतच आहोत.

गांधीजींनी सत्याग्रह आणि असहकाराचे शस्त्र आमच्या हाती सोपवले. लोकशाहीतील नागरिकांच्या भूमिकेचे महत्त्व त्यांनी सांगितले.

तथापि आपल्या अधिकारासाठी आवाज उठवणार्‍या विद्यार्थिनींवर गांधीजींच्या भारतात आज पोलिसी लाठ्या पडत आहेत. गांधीजींनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली.

आम्ही त्या शिकवणीला राज्यघटनेतील केवळ एक वाक्य बनवून ठेवले. गांधीजींनी सत्य आणि न्यायाच्या बाजूने आवाज उठवण्याचे आवाहन केले.

आम्ही मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलणार्‍यांवरच गोळ्या चालवत आहोत. ही सर्व उदाहरणे गांधी हत्याच नाही तर आणखी काय आहे?

‘तुम्ही गांधीजींना सांभाळू शकत नाही. आम्हा मॉरिशसवासीयांंना देऊन टाका गांधीजी…!’ असा आहेर मुंबईतील एका सभेत मॉरिशसचे प्रसिद्ध साहित्यिक राज हिरामण यांनी भारतीय श्रोत्यांना दिला.

गांधीजींनी स्थापलेल्या हिंदुस्थानी प्रचार सभेच्या 75 व्या वर्षानिमित्त गांधी जयंतीला आयोजित एका सभेत मॉरिशसच्या या साहितत्यिकाने आपली वेदना प्रकट केली.

गांधींच्या देशातच गांधींना विसरले जाण्याच्या त्या वेदना होत्या. भारतात महात्मा गांधींचे नाव आवर्जून घेतले जाते; पण गांधीजी ज्यासाठी जगले आणि प्राणांचे बलिदान केले त्या सर्व गोष्टींची आठवण ठेवण्याची गरज मात्र सध्या कोणालाच का वाटत नाही?

महात्मा गांधींना आता आम्ही ‘स्वच्छता अभियाना’शी जोडले आहे. भारत सरकारने या अभियानाच्या प्रचारासाठी एक जाहिरातही प्रसिद्ध केली आहे.

गांधी जयंती ‘स्वच्छ भारत दिन’ म्हणून पाळण्याचा उल्लेख त्यात आहे. या अभियानाचे प्रतीक गांधीजींचा चष्मा आहे. चष्म्याच्या एका काचेवर ‘स्वच्छ’ आणि दुसर्‍या काचेवर ‘भारत’ लिहिले आहे.

एका कार्यक्रमात गांधीजींचे नातू तुषार गांधी यांनी त्याकडे लक्ष वेधले होते. ‘आम्हाला गांधीजींचा चष्मा तर हवा आहे; पण गांधीजींची दृष्टी मात्र नको’ असे ते म्हणाले होते.

भावना व्यक्त करताना तुषार गांधींच्या आवाजातून राज हिरामण यांनी व्यक्त केलेली खंतच प्रकट होत होती. ‘तुम्ही देऊ इच्छित नसाल तर गांधीजींना विकून टाका आम्हाला’ असे त्यांनी म्हटले तेव्हा गांधीजी ही खरेदी-विक्रीची वस्तू आहे, असे ते सांगू इच्छित नव्हते.

आम्ही भारतीयांनी आपल्या ‘बापूं’ना चलनी नाणे बनवले आहे. त्या जोरावर आमचे नेते राजकारण करत आहेत, हेच त्यांनी नेटक्या शब्दांत सांगितले.

प्रत्येक रंगाचा नेता गांधीजींचे उदाहरण देतो; पण वास्तवात तो गांधीजींच्या नावावर स्वार्थच साधत आहे. ही कृती गांधीजींना विकण्यासारखीच नाही का ? ‘आम्ही गांधीजींना तुमच्याकडून विकत घेऊ’ असे राज हिरामण म्हणाले ते तेवढ्याचसाठी!

आम्ही भारतीय गांधीजींना राष्ट्रपिता म्हणतो; पण मॉरिशसवासीयसुद्धा त्यांना त्यांचे ‘राष्ट्रपिता’ मानतात. ‘गांधीजींनी आम्हाला भाषा दिली, आम्हाला देश दिला’ असे त्या सभेत मॉरिशसच्या त्या साहित्यिकाने म्हटले होते.

गांधीजी एकदा योगायोगाने मॉरिशसला गेले होते. त्यांच्या जहाजात काही दोष निर्माण झाला होता. त्यामुळे जहाज दुरुस्तीसाठी ते मॉरिशसमध्ये थांबले होते.

त्यावेळी त्यांनी ‘गिरमिटीया’ गुलामांना पाहिले. गोर्‍या शासकांनी त्यांना भारतातून गुलाम बनवून तेथे नेले होते. गांधीजींनी त्यांच्याशी संवाद साधला.

त्यांची व्यथा जाणून घेतली. ‘तुमच्या मुलांना शिकवा आणि त्यांना राजकारणात येण्याची प्रेरणा द्या’ असे ते म्हणाले होते.

(लेखक – विश्वनाथ सचदेव-ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत आहेत.)

ही दोन वाक्ये राज हिरामण यांच्या म्हणण्यानुसार त्या गुलामांना मुक्तीचा मंत्र ठरली. हिंदी भाषेच्या आधारे त्यांनी आपली योग्यता व क्षमता वाढवली.

आज तेच लोक मॉरिशसवर सत्ता गाजवत आहेत. ‘म्हणूनच आम्ही गांधीजींना राष्ट्रपिता मानतो’ असे राज हिरामण म्हणाले. मॉरिशसमधील भारतीय वंशाच्या घराघरांत आजसुद्धा गांधीजींचे छायाचित्र पाहावयास मिळते.

मॉरिशसवासीय त्या चित्राची पूजा करतात. त्यापासून प्रेरणा घेतात. आम्ही मात्र गांधीजींचे छायाचित्र नोटांवर छापून आत्मसंतुष्ट आहोत.

गांधींजींच्या चष्म्याला प्रतीक बनवून ‘गांधीजींनी दाखवलेल्या रस्त्याने आम्ही चालू पाहत आहोत’ हा देखावा करण्यात आम्हाला संकोच (लाज) वाटत नाही. गांधीजींनी सांगितलेली मूल्ये व आदर्शांचे पालन करण्याऐवजी आम्ही देखावा करत आहोत.

स्वच्छता अभियानाचाच मुद्दा घ्या. स्वच्छतेचे महत्त्व कोण नाकारणार? तथापि स्वच्छतेचा ठेका एका विशिष्ट जातीकडेच का असावा ?

देशातील महानगरे तसेच इतर मोठ्या शहरांत मैला वाहिन्या साफ करण्याचे काम करणारे नव्वद टक्के लोक कमी लेखल्या जाणार्‍या जातीतील आहेत. सामाजिक व्यवस्थेच्या श्रेष्ठतेच्या आमच्या दाव्याची ही लाजिरवाणी पोलखोलच आहे.

गांधीजींनी मानवाच्या समानतेचा आदर्श सर्वांपुढे ठेवला होता. तरीसुद्धा दलित वर्गातील एका युवकाने टोकदार मिशा ठेवण्याचा गुन्हा केला म्हणून त्याची हत्या केली जाते.

एकविसाव्या शतकातील भारतात आजही खालच्या जातीतील माणूस स्वत:च्या लग्नाच्या वरातीत घोेड्यावर बसू शकत नाही. गांधीजींनी स्वत: मैला साफ करण्याचा आदर्श घालून दिला.

दक्षिण आफ्रिकेत आणि नंतर भारतातसुद्धा त्यांनी स्वच्छता म्हणून त्याकडे पाहिले; पण आम्ही काय केले? देशात डोक्यावर मैला वाहून नेण्याची उदाहरणे आजही पाहावयास मिळतात.

ही प्रथा संपुष्टात आणण्यासाठी कायदे बनले आहेत; पण प्रत्यक्षात मात्र हे अमानवीय काम आजही चालूच आहे. 1993 च्या या कायद्यानुसार आतापर्यंत एकाही व्यक्तीला शिक्षा झालेली नाही.

केवळ सोळा राज्यांनी हा कायदा स्वीकारला आहे. त्याची पूर्णपणे अंमलबजावणी मात्र कुणी सुरू केलेली नाही. गांधीजींच्या भारतात आजसुद्धा तेरा लाख लोक दुसर्‍याचा मैला डोक्यावर वाहून नेतात. परंपरा आणि जातीच्या नावावर त्यांना हे काम करावे लागते.

1948 मध्ये नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली होती; पण आम्ही ‘गांधीजींचा विजय असो’ असे म्हणतो आणि दररोज गांधीजींची व त्यांच्या विचारांची हत्या करतच आहोत.

गांधीजींनी सत्याग्रह आणि असहकाराचे शस्त्र आमच्या हाती सोपवले. लोकशाहीतील नागरिकांच्या भूमिकेचे महत्त्व त्यांनी सांगितले होते.

तथापि आपल्या अधिकारासाठी आवाज उठवणार्‍या विद्यार्थिनींवर गांधीजींच्या भारतात आज पोलिसी लाठ्या पडत आहेत. गांधीजींनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली.

आम्ही त्या शिकवणीला राज्यघटनेतील केवळ एक वाक्य बनवून ठेवले. गांधीजींनी सत्य आणि न्यायाच्या बाजूने आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. आम्ही मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलणार्‍यांवरच गोळ्या चालवत आहोत.

गांधीजींनी ‘परायी पीर’ (पर पीडा) समजून घेण्याच्या नरसी यांच्या उपदेशाला जीवनाचा भाग बनवले होते. आम्ही दुसर्‍यांना वेदना देऊन खूष होतो.

ही सर्व उदाहरणे गांधी हत्याच नाही तर आणखी काय आहे? तरीही एखादा हिरामण हजारो मैलांवरून भारतात येऊन ‘आपल्या मॉरिशस देशात गांधीजी जिवंत आहेत’ असे म्हणतो तेव्हाही आमची मान लाजेने खाली झुकत नाही.

‘आम्ही गांधीजींना देणार नाही’ असे त्या सभेत एका वक्त्याने हिरामण यांना सुनावले होते; पण त्या वक्त्याने कोणत्या आधारे असे म्हटले होते ?

आमच्यापैकी प्रत्येकाला आज आपल्यातील गांधीला जागे करण्याची आवश्यकता आहे. माणूस होण्याची हीच मुख्य अट आहे. गांधीजी सर्वांचे होते; पण सर्वजण गांधींचे होतील तेव्हाच मानवता जिवंत राहील, हा विश्वास मजबूत होऊ शकेल.

 

LEAVE A REPLY

*