Blog : जलप्रदूषणाचे आव्हान

0

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात 9 कोटीहून अधिक लोकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. विशेष म्हणजे ही आकडेवारी शहरी लोकांची आहे.

ग्रामीण लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचे तर खेड्यांमध्ये आजही 70 टक्के लोक दूषित पाणी पितात. त्यामुळेच ग्रामीण क्षेत्रात पाण्यामुळे होणारे आजारांचे प्रमाणही अधिक आहे.

स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहांच्या योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास संपूर्ण जगात पाण्यामुळे होणार्‍या आजारांच्या उपचारावर देशांचा होणारा खर्च नऊ टक्क्यांनी कमी करता येऊ शकतो.

त्यामुळे स्वच्छ पाण्यासाठी काहीतरी ठोस उपाय शोधावा लागणार आहे. निसर्गाने मानवाला भरभरून सृष्टी दिली. पाने, फुले, हवा, पाणी, पशू, पक्षी या सर्व गोष्टी दिल्या आहेत.

पण माणूस स्वार्थी झाला आणि त्याने निसर्गाच्या या देणगीचा आदर करण्याऐवजी त्यात ढवळाढवळ करायला सुरुवात केली. याची अनेक उदाहरणे आहेत.

मात्र त्यामुळे निसर्गाने वरदान म्हणून दिलेल्या काही घटकांचे नुकसान होऊ लागले. पाणी हे याचे सर्वात मोठे उदाहरण.
जलप्रदूषण हा आज सर्वात मोठा प्रश्न बनला आहे.

संपूर्ण जगात एड्स किंवा इतर काही आजार, रस्ते अपघात यामध्ये मृत्युमुखी पडणार्‍या लोकांपेक्षा अधिक मृत्यू हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. संपूर्ण जगभरात 180 कोटी लोक दुर्दैवाने आजही दूषित पाणी पितात.

लेखक – प्रा. रंगनाथ कोकणे

पाण्यात अनेक प्रकारची खनिजे, वायू मिसळलेले असतात. पाण्यात हे सर्व पदार्थ अतिप्रमाणात एकत्र मिसळले गेल्यास पाणी प्रदूषित होते आणि ते आरोग्यास हानिकारक असते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात 9 कोटीहून अधिक लोकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. विशेष म्हणजे ही आकडेवारी शहरी लोकांची आहे.

खेड्यातील लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचे तर खेड्यांमध्ये आजही 70 टक्के लोक दूषित पाणी पितात. त्यामुळेच ग्रामीण क्षेत्रात पाण्यामुळे होणारे आजारांचे प्रमाणही अधिक आहे.

संयुक्त राष्ट्राने सादर केलेल्या एका अहवालानुसार आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका या देशांमध्ये प्रत्येक वर्षी 35 लाख लोकांचा मृत्यू पाण्यामुळे होणार्‍या विविध आजारांमुळे होतो.

प्रदूषित किंवा घाण पाणी प्यायल्याने प्रत्येक वर्षी जगात 8 लाख 42 हजार लोकांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार लोकांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहांच्या योग्य पातळीवरील सुविधा उपलब्ध करून दिल्यास संपूर्ण जगात पाण्यामुळे होणार्‍या आजारांच्या उपचारावर देशांचा होणारा खर्च नऊ टक्क्यांनी कमी करता येऊ शकतो.

भारताव्यतिरिक्त असे 32 देश आहेत जिथे पाण्यामुळे होणार्‍या आजारांची संख्या अधिक आहे. या सर्व देशांमध्ये स्वच्छतेच्या सोयी आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिल्यास आजार आणि त्यासंबंधी गोष्टींवर होणारा खर्च 15 टक्क्यांनी कमी होईल.

प्रदूषित पाणी हे मानवासाठी विषासारखेच आहे. जगभरात 80 टक्क्यांहून अधिक आजारांसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या प्रदूषित पाणी हेच कारण आहे.

भारतातील 34 हजार गावांमधील सुमारे 2.5 कोटी लोक डायरियाने ग्रस्त असल्याचा अंदाज वर्तवला जातो. प्रदूषित पाण्यात अनेक रोगकारक जिवाणू, विषाणू असल्याने या पाण्यामुळे रोगांचा फैलाव होतो.

शास्त्रज्ञांच्या मते, भारतात होणारे सर्वाधिक आजार हे शौचप्रदूषित पाण्याच्या सेवनाने होतात. प्रदूषित पाण्यामुळे पोलिओ, जुलाब, आव पडणे, कावीळ, मुदतीचा ताप किंवा टायफॉईड, विषाणूजन्य ताप, त्वचेचे रोग होतात.

प्रदूषित पाण्याचा सर्वात वाईट परिणाम मुलांवर होतो आणि परिणामस्वरूप देशात प्रतिवर्षी डायरियामुळे तीन लाख मुलांचा मृत्यू होत असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितले आहे.

म्हणजेच आपल्या देशात तासाला 13 मुलांचा डायरियाने मृत्यू होतो. प्रदूषित पाण्यामध्ये फ्लोराईडचे
प्रमाण अधिक असल्याने मणक्याचे हाडही वाकडे होण्याचा धोका असतो.

दात पिवळे होऊन पडू लागतात तसेच हातापायांच्या हाडांची तन्यता कमी होतो. प्रदूषित पाण्याचा परिणाम जलजीवांवरही होत असतो. प्रदूषित पाण्यात बुरशी किंवा जलपर्णी साठते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.

नद्यांच्या पाण्याच्या नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार एक लिटर नदीच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण सध्यातरी 0.1 घनसेमीमीटर इतके अल्प राहिले आहे. जलप्रदूषणाचा परिणाम माश्यांच्या काही प्रजातींवरही होतो.

महासागरात तेल पसरल्यामुळे तसेच हायड्रोकार्बन पृष्ठभागावर पसरल्यास जलजीवांना पुरेसा ऑक्सिजन मिळू शकत नाही आणि ऑक्सिजनच्या कमतरतेपायी ते मरतात.

प्रदूषित पाण्याची समस्या इतकी तीव्र आहे की काही जलजीवांच्या प्रजाती प्रदूषित पाण्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गणेशोत्सव आणि दुर्गाष्टमी या काळात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात.

या मूर्ती विरघळण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. कारण या मातीत जिप्सम, सल्फर, फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम असते. त्यामुळे पाणी अधिक विषारी होते.

शिवाय मूर्ती रंगवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रंगात मर्क्युरी, लेड आणि कार्बन असल्यामुळे पाण्यात आम्ल तयार होते.
लंडनमध्ये झालेल्या संशोधनातून काही तथ्य समोर आली.

त्यानुसार प्रदूषित पेयजलात लेड, मालिथयोन, डीडीटी आणि क्लोपायरियोफोस सारखी कीटकनाशके मिसळलेली असतात जी पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे भूजलही प्रभावित होते.

पाण्याच्या प्रदूषणाच्या धोक्याबाबत लोकांमध्ये जागरुकता उत्पन्न करणे ही सध्याची सर्वात गरजेची गोष्ट आहे. कारखाने आणि औद्योगिक संस्थांमधून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात.

त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्याशिवाय हे पदार्थ बाहेर टाकण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया केली गेली जाणे आवश्यक आहे.

नदी किंवा इतरही जलस्रोतांमध्ये रासायनिक टाकाऊ पदार्थ सोडणे किंवा टाकणे हे बेकायदेशीर ठरवून त्यावर कायदेशीर कारवाई केली जावी. पाण्यातील जिवाणू नष्ट करणारे रासायनिक पदार्थ, ब्लिचिंग पावडर इत्यादींचा वापर केला पाहिजे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांद्वारे समुद्रामध्ये ज्या आण्विक चाचण्या केल्या जातात त्यावरही निर्बंध लावले पाहिजेत.

 

LEAVE A REPLY

*