Blog : सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

0

अरुणाचल प्रदेशात हवाई दलाचे एमआय 17 हे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. 1970 पासून हवाई दलातील सर्व प्रकारांची 1300 विमाने अपघातग्रस्त झालेली आहेत.

यामध्ये 500 हून अधिक मिग फायटर, 150 हून अधिक चिता आणि चेतक हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. सामान्यतः हेलिकॉप्टरचे अपघात तीन कारणांमुळे होतात.

एक तांत्रिक बिघाड, दुसरे वैमानिकाची चूक आणि तिसरे वातावरणातील बिघाड. कारण काहीही असले तरी उड्डाणांच्या सुरक्षिततेवर या अपघाताने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

अरुणाचल प्रदेशात भारतीय हवाई दलाचे ‘एमआय 17 व्ही 5’ हे हेलिकॉप्टर कोसळून दोन अधिकार्‍यांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. हवाईमार्गाच्या देखभालीचे काम सुरू असताना हा अपघात झाला.

हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी 2013 मध्ये उत्तराखंड येथे आलेल्या महापुराच्या वेळी मदतकार्य करताना याच प्रकारातील हेलिकॉप्टरला अपघात झाला होता आणि त्यामध्ये 20 जण ठार झाले होते.

रशियन बनावटीचे हे हेलिकॉप्टर लष्करी सामुग्रीची ने-आण करण्यासाठी वापरले जातात. रशियासोबत यापूर्वी झालेल्या एका करारानुसार ही हेलिकॉप्टर भारताने खरेदी केली आहेत.

लेखक – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

हेलिकॉप्टर आणि विमानांचा अपघात ही नक्कीच चिंतेची बाब आहे. आजवर पाकिस्तानबरोबरील लढाईमध्ये जेवढी हेलिकॉप्टर आणि विमाने अपघातग्रस्त झाली नाहीत त्याहून जास्त शांतता काळात अपघातग्रस्त झाली आहेत.

1970 पासून हवाई दलातील सर्व प्रकारांची 1300 विमाने अपघातग्रस्त झालेली आहेत. यामध्ये 500 हून अधिक मिग फायटर, 150 हून अधिक चिता आणि चेतक हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे.

अपघाताची कारणे
विमाने आणि हेलिकॉप्टर्सचे अपघात होण्यास अनेक कारणे आहेत. आज भारतीय हवाई दलामध्ये वैमानिकांना मिग 21, चिता, चेतक ही जुनाट झालेली विमाने चालवावी लागतात.

विमाने जुनाट असल्याने अपघाताची शक्यता अधिक असते. ही जुनाट विमाने लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे. मात्र संरक्षण दलासाठी असलेली अर्थसंकल्पीय तरतूद कमी असल्याने या जुनाट विमानांची बदली कमी वेगाने होत आहे. मिग विमाने हवाई दलातून बाद करण्यासाठी आणखी बरीच वर्षे लागणार आहेत.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे विमानांच्या आणि हेलिकॉप्टर्सच्या देखभालीची गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे. हेलिकॉप्टर अपघातांची तुलना प्रगत राष्ट्रांमध्ये होणार्‍या विमान अपघातांशी करतो तेव्हा त्याच प्रकारच्या हेलिकॉप्टर्सचे अपघात भारतात अधिक प्रमाणात होतात. त्याचे मुख्य कारण हेलिकॉप्टरचे देखभाल व्यवस्थापन. त्यात सुधारणा होण्याची गरज आहे.

तिसरे कारण म्हणजे हेलिकॉप्टर्सचे सुटे भाग. हे भाग जुनाट झाल्यानंतर सातत्याने बदलावे लागतात. दुर्दैवाने आपल्याला सुटे भाग आजही रशिया किंवा अमेरिका इथून आयात करावे लागतात.

या सुट्या भागांची कमतरता भासल्याने अपघातांचे प्रमाण वाढते. त्याव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैमानिकांचे प्रशिक्षण. काही अपघातांमध्ये मानवी चुका होतात.

त्यासाठी वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी विविध प्रकारची एअरक्राफ्ट हवाई दलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. वाढते अपघात लक्षात घेता, प्रगत जेट ट्रेनर हे विमान लवकरात लवकर हवाई दलात सामील करायला हवे.

विमानांची काळजी आणि देखभाल
अशा अपघातात मानवी जीवनाची कधीही भरून न येणारी हानी होते. अपघातांमुळे हेलिकॉप्टर आणि विमानांची संख्या कमी होते, एवढेच नव्हे तर तेव्हा त्या श्रेणीतील सर्वच हेलिकॉप्टर्स ग्राऊंड करून त्यांची पूर्ण तपासणी होईपर्यंत उड्डाणे थांबवून विमानतळावरच ठेवली जातात.

म्हणजेच अचानक गरज पडल्यास ती उपलब्ध नसतात. अगदी लढाईसाठीही! त्या सर्व हेलिकॉप्टरची तांत्रिक अवस्था तज्ज्ञांकडून तपासून घेतली जाते.

त्यामुळे पुढील अनेक महिने सर्वच ‘एमआय 17 हेलिकॉप्टर्स’चे उड्डाण बंद राहणार आहे. त्यांची पुनर्तपासणी केली जाईल.

एकूणच आज हवाई दलासमोर असणार्‍या आव्हानांमध्ये हेलिकॉप्टर आणि विमान अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान मोठे आहे.

एक हेलिकॉप्टर कोसळते तेव्हा देशाचे 200 ते 250 कोटी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे अशाप्रकारच्या महागड्या हेलिकॉप्टर्सची काळजी आणि देखभाल करणे महत्त्वाचे आहे.

रशियाचे विभाजन झाल्यानंतर या हेलिकॉप्टर आणि विमानांची देखभाल-दुरुस्ती करणे फार कठीण झाले होते. त्यांचे आयुष्य वाढवण्याकरता त्यांचे पुन्हा ओव्हरऑल सुरू झालेले होते.

अशा प्रकारचे ओव्हरऑल झाल्यानंतर त्यांचे आयुष्य 10 ते 15 वर्षांनी वाढू शकते. आधुनिकीकरण केलेल्या हेलिकॉप्टरमध्ये अनेक नवीन उपकरणे बसवली जातात.

यामध्ये हेलिकॉप्टरचा बाहेरचा ढाचा मजबूत करणे, जीपीएस, वातावरणावर लक्ष ठेवण्यासाठी रडार आणि इतर अनेक आधुनिक उपकरणांचा समावेश होतो.

हवाई दलाचे कुठेलही हेलिकॉप्टर सुरक्षित आहे असे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच उड्डाण केले जाते. म्हणूनच सुरक्षिततेबाबत कोणतीही शंका असेल तर त्या हेलिकॉप्टरला उड्डाणासाठी परवानगी मिळत नाही.

कोणताही अपघात हा दुर्दैवी असतो आणि त्यामुळे अपघाताचे समर्थन करता येणार नाही. अपघात नेमका कशामुळे झाला हे समजण्यासाठी त्याची कोर्ट ऑफ चौकशी होईल आणि त्यातून नेमके कारण समोर येईल.

मागील अनुभवांचा विचार करता सामान्यतः हेलिकॉप्टरचे अपघात तीन कारणांमुळे होतात. एक म्हणजे तांत्रिक बिघाड, दुसरे म्हणजे वैमानिकाची चूक आणि तिसरे म्हणजे वातावरणातील बिघाड.

वातावरणीय बिघाडांवर मनुष्याचे नियंत्रण नसते. काहीवेळा अचानकपणाने सोसाट्याचा वारा येतो, वादळ येते, प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. अशावेळी हेलिकॉप्टर चालवणे धोकादायक होऊ शकते.

ताज्या दुर्घटनेबाबत तसे काहीच समोर आलेले नाही. म्हणून वातावरणीय बदलामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला असण्याची शक्यता कमी आहे.

तसेच पायलटकडून काही चूक झाल्याचेही दिसत नाही. त्यामुळे काही तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरचा अपघात झाला असण्याची शक्यता जास्त आहे. कारण काहीही असले तरी उड्डाणांच्या सुरक्षिततेवर या अपघाताने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

वैमानिकांची, विमानांची आणि हवाई दलाची युद्धसज्जता हे तिन्ही घटक एकमेकांशी संलग्न आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या हेलिकॉप्टर /लढाऊ हेलिकॉप्टरच्या अपघाताचे विश्लेषण करत असतानाच हवाई दलात सेवा करणार्‍यांत सर्वच लढाऊ विमानांच्या अत्याधुनिकीकरणाचाही तितक्याच गांभीर्याने विचार केला पाहिजे.

 

LEAVE A REPLY

*