आरटीओ कार्यालयात दलालांना ‘नो एंट्री’

0
जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-मद्यधुंद दलालाकडून आरटीओ अधिकार्‍याची हुज्जत घातल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. यामुळे शनिवारी परिवहन अधिकार्‍यांनी सर्व एजंटांना कार्यालय आवारात मज्जाव केला.
त्यामुळे दिवसभर कार्यालयाचे व्यवहार ठप्प झाल्याचा दावा युनियनच्या पदाधिकार्‍यांनी केला. दुसरीकडे आरटीओ जयंत पाटील यांच्या पत्रावरुन मनपा अतिक्रमण विभागाने परिसरात कारवाई केल्याने एजंटांची धावपळ उडाली होती.
आरटीओ कार्यालयात दलाल ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी देखील अधिक पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातच शुक्रवारी दुपारी गणेश नामक एजंटने मद्यधुंद अवस्थेत परिवहन अधिकारी यांच्या दालनात येवून त्यांच्याशी हुज्जत घातली.
यावेळी परिवहन अधिकारी पाटील यांनी त्या एजंटला बाहेर जाण्यास सांगितले. त्यावर त्यांच्याशी सुध्दा त्याने असभ्य वर्तन केले.

त्यामुळे संतप्त झालेल्या आरटीओ यांनी कार्यालय परिसरातील एजंटसह सर्व दलालांना कार्यालयबाहेर काढून मुख्य प्रवेशद्वार बंद केले.

या प्रकारामुळे परिसरात काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान आज देखील आरटीओ कार्यालयात एजंटला प्रवेश बंदी करण्यात आली.

गेटवरच वाहतुक निरिक्षकांचा बंदोबस्त लावून नागरिक व शोरुमचे अधिकृत कर्मचारी, ड्राइव्हींग स्कूलच्या कर्मचार्‍यांनाच प्रवेश देण्यात येत होता.

त्यामुळे बहुतांश एजंट प्रवेशद्वारासमोर व भिंतीलगत बसणार्‍या इतर एजंटजवळच खुर्च्या व टेबल टाकून बसले होते.

आरटीओंची कॉल सेंटरवर तक्रार
आरटीओ जयंत पाटील यांनी मनपाच्या कॉलसेंटरवर कार्यालयाबाहेर तसेच प्रवेशद्वार व भिंतीलगत असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार केली. तसेच लेखी तक्रार महापालिकेत देवून आयुक्तांशी देखिल चर्चा केली.

अतिक्रमण विभागाकडून कारवाई
मनपाकडे आरटीओंच्या तक्रारीवरुन प्रभाग 3 मध्ये शहरातील सर्व अतिक्रमण पथके बोलावून घेतली. प्रभाग अधिकारी सुशील साळुंके व अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ कार्यालयासमोरील तसेच भिंतीजवळील एजंटच्या टपर्‍या, खुर्च्या, टेबल असे दोन ट्रक व तिन ट्रॅक्टर साहीत्य जप्त करण्यात आले. अचानक सुरु झालेल्या या कारवाईमुळे एजंटची धावपळ उडाली.

एजंट प्रतिनीधींनी घेतली आरटीओंची भेट
वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष रज्जाक खान गनी खान, सचिव सुरेश पाटील व इतर सदस्यांनी आरटीओ जयंत पाटील चर्चा केली. यावेळी संघटनेकडून तुम्ही कार्यालयात येण्यापासून वाहनचालक व मालकांच्या प्रतिनिधींना रोखू शकत नाही असे सांगीतले. याबाबत हायकोर्टाचे आदेश असल्याचे ते म्हणाले. यावर आरटीओ यांनी हायकोर्टाचे आदेश दाखवा मग निर्णय घेवू असे सांगीतले.

 

 

LEAVE A REPLY

*