मोबाईल दुकान फोडणार्‍या चोरट्याला अटक

0
जळगाव । शहरातील गोलाणी मार्केटमधील माऊली मोबाईल अ‍ॅण्ड अ‍ॅसेसरीज या दुकानातून 13 मोबाईल लांबवून नेणार्‍या संशयिताला शहर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून याच्याकडून सर्व मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. स्वप्निल ज्ञानेश्वर पाटील वय 24 रा. बिलवाडी असे या चोरट्याचे नाव आहे.

अयोध्यानगरातील रामकुमार महाजन यांच्या गोलाणी मार्केटमधील मोबाईल दुकानाचे दोन्ही कुलूप तोडून चोरट्याने सोमवारी मध्यरात्री दुकानातील 1 लाख 65 हजार रुपये किंमतीचे 13 मोबाईल चोरून नेले होते. दरम्यान हा चोरटा दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता.

याप्रकरणी महाजन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, पोहेकॉ. विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, विकास महाजन यांनी तपास करून संशयित स्वप्निल पाटील याला ताब्यात घेतले.

संशयित जैन कंपनीत कामाला
संशयित स्वप्निल हा जैन इरिगेशन कंपनीत कामाला असून तो सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे घरून ड्युटीवर जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान तो दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्यानंतर त्याचे फोटो आज वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्यानंतर त्याचे कुटुंबिय स्वतः त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यासाठी येत असतांनाच पोलिस त्याच्यापर्यंत पोहचले.

शेतात लपविले होते मोबाईल
स्वप्निल याने माऊली मोबाईल दुकानातून मोबाईल लांबविल्यानंतर त्याने सर्व मोबाईल डोमगाव शिवारातील शेतात झाडाजवळ लपवून ठेवले होते. दुपारी त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने शेतात लपविले सर्व मोबाईल पोलिसांना काढून दिले.

LEAVE A REPLY

*