धर्मवेड की वेड्यांचा धर्म?

0

एखाद्या व्यक्तीचे राहणीमान, घरात खेळले जाणारे बैठे खेळ, सहजतेचा आविष्कार व आपसातील संवाद हेदेखील धार्मिक ताणाचे कारण बनावे का? पण तसे ते होत आहे हेही खरे!

नगण्य मुद्यालाही दिला जाणारा जातीभेदाचा अथवा धार्मिकतेचा रंग समाजाच्या विवेकबुद्धीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. मोहम्मद कैफ हा भारताचा गुणवान क्रिकेटपटू!

त्याने आपल्या मुलासह बुद्धिबळ खेळतानाचा फोटो समाज माध्यमांवर टाकला. बुद्धिबळ खेळणे इस्लाममधील तत्त्वांच्या विरोधात असल्याच्या प्रतिक्रिया काही खास ‘इस्लामप्रेमीं’नी त्यावर व्यक्त केल्या.

मध्यंतरी महम्मद शमीलाही त्याच्या पत्नीच्या पोशाखावरून तीव्र धार्मिक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले. तथाकथित गोरक्षकांचा धुमाकूळ पंतप्रधानांच्या इशार्‍यानंतरही अजून थांबलेला नाही.

हत्यांचा सिलसिला सुरूच आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्मारक उभारले गेले. तिथे पुतळ्यासमोर भगवद्गीतेची प्रतिकृती व हातात वीणा कोरली आहे. त्यावरून तेथेही वादंग उभे राहिले आहे.

पुतळ्यासमोर कुराण आणि बायबलदेखील ठेवले जावे, अशी मागणी केली गेली आहे. बिहार विधानसभेच्या आवारात ‘जय श्रीराम’ अशी घोषणा दिल्याने खुर्शीद ऊर्फ फिरोज अहमद या मंत्र्याविरोधात ‘इमारत-ए- शरिया’ संघटनेने फतवा काढला आहे.

मिळून काय, सर्वत्र खिलाडूवृत्ती व विचारांचा मोकळेपणा लुप्त होऊ पाहत आहे. देशाच्या भवितव्याला दिशा देणार्‍या कलामांसारख्या महापुरुषाला धार्मिकतेच्या व जातीभेदाच्या चौकटीत बांधू पाहणार्‍यांना धर्मवेडे तरी कसे म्हणावे?

कुठल्याही धर्माची मूलतत्त्वे इतकी ठिसूळ असू शकतील का? विश्ववंद्य ठरलेल्या सर्व महापुरुषांनी जगाला मानवतेचा संदेश दिला. विचारांची संकुचितता टाळून व्यापकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली.

सर्व धर्मग्रंथांतूनदेखील कमी-अधिक फरकाने त्याच व्यापक विचारांची शिकवण दिली आहे. तरीही ही संवेदनशून्यता दिवसेंदिवस का वाढत आहे? शिक्षण वाढले. माध्यमे वाढली. साधने वाढली. ‘कर लो दुनिया मुठ्ठीमे’ हा जाहिरातीतील वाक्प्रचार स्मार्ट फोनच्या रूपाने प्रत्यक्षात अवतरला. त्याने जगाला गवसणी घातली.

तथापि वाढती माध्यमे ही समाजाला संवेदनाशील बनवत आहेत की संवेदनाशून्य? ‘टीआरपी’साठी कुठल्याही मुद्यांचे चर्वितचर्वण करणार्‍या चर्चांचे दळण अहोरात्र सुरू असते.

कुणा उच्चपदस्थाच्या मुलाने आत्महत्या केली, तोसुद्धा चर्चेचा विषय बनवला जातो. आधीच दु:खाच्या डोंगराखाली पिचलेल्या माता-पित्यांच्या मन:स्थितीबद्दल चर्चेतून विद्वत्तेचे प्रदर्शन करणारी मंडळी इतकी संवेदनाशून्य व निर्दयी कशी होऊ शकतात? या सर्व प्रकारात मानवधर्म टिकणार तरी कसा?

 

LEAVE A REPLY

*