Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

जळगावातील रावेरमध्ये विजया बँकेच्या अधिकार्‍याची हत्त्या

Share

रावेर । नवीन निंबोल (ता.रावेर) येथील मुख्य चौकात असलेल्या विजया बँकेचे सहायक व्यवस्थापक करणसिंग नेगे (वय 31) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मंगळवारी भर दुपारी अडीच वाजता बँकेतच ही घटना घडली. दुचाकीवर आलेले दोघे हेल्मेटधारी गोळीबार करून प्रसार झाले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले दाखल झाले असून, त्यांनी तीन पथके मध्यप्रदेशात पाठवली आहे.

मंगळवारी दुपारी 2.30 च्या दरम्यान हेल्मेट घातलेले दोन इसम मुख्य प्रवेशद्वारातून आत घुसले. त्यातील एकाने आपला मोर्चा सरळ सहायक व्यवस्थापक करणसिंग नेगे यांच्याकडे वळवला. त्यांच्यावर सरळ पिस्तूल रोखले. नेगे यांनी सायरन वाजवण्याचा प्रयत्न केला असता मारेकर्‍याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. त्यात नेगे निसटले. त्यानंतर मारेकर्‍याने बाजूच्या काउंटरवरून उडी मारून नेगे यांच्यावर गोळी झाडली आणि मुख्यगेट जवळ परतला. गेटवर त्याने त्याच्या सहकार्‍यास हातवारे करून बाहेर पडण्याचा इशारा दिला. मारेकर्‍यासोबत असलेल्या दुसर्‍या व्यक्तीने बाहेर येत असतांना दुसरी गोळी झाडली. ही गोळी नेगे यांचे सहकारी महेंद्रसिंग राजपूत यांच्या कानाजवळून गेली. यानंतर दोन्ही मारेकरी बँकेच्या बाहेर लावेल्या मोटार सायकलवरून पसार झाले. हा सर्व प्रकार बँकेच्या सी.सी.टी.व्ही.कॅमेर्‍यात कैद झाला आहे. या घटनेचे वृत्त कळताच निंभोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन मोरे देखील बँकेत पोहचले. पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटना घडली तेव्हा प्रत्यक्षदर्शी असलेल्या पल्लवी बारी यांच्या माहितीवरून निंभोरा पोलीस स्टेशनला 302, 397, 398 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आय.जी.छेरिंग दोर्जे हे बुधवारी घटनास्थळी जाणार आहे. मंगळवारी ते जळगावात पोहोचले असून घटनेची माहिती जाणून घेतली.

सायरन वाजताच पं.स.सदस्याची बँकेकडे धाव
बँकेचा सायरन वाजताच मुख्यचौकात बसलेले पंचायत समितीचे सदस्य जितू पाटील बँकेकडे धावत आले. त्यांच्या पाठोपाठ मसाकाचे व्हा.चेअरमन भागवत पाटील, मोहन पाटील घटनास्थळी पोहचले. जितू पाटील यांनी रक्ताच्या थेरोळ्यात पडलेल्या करणसिंगला उचलून त्यांच्या गाडीतून रावेर येथील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ऑखो देखी…
दुपारी 2.25 ते 2.30 ची वेळ होती. बँकेत फारशी गर्दीही नव्हती. दोन हेल्मेट घातलेले व्यक्ती बँकेत आल्या. त्यांच्या हातात बंदूक होती. ते सरळ आमचे अधिकारी करणसिंग यांच्याकडे आले. करणसिंग यांनी सायरन बेल वाजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका मारेकर्‍याने काऊंटरवरुन उडी मारली आणि करणसिंग नेेगे यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर पहिल्या व्यक्तीसोबत आलेल्या दुसर्‍या व्यक्तीनेही गोळी झाडली आणि ते बाहेर पळाले. ती गोळी माझ्या कानाजवळून गेली. मी त्यांच्या मागे पळण्याचा प्रयत्न केला. परंतु बँकेत कोणीच नसल्याने मी माघारी परतलो.
– महेंद्रसिंग राजपूत, रोखपाल, विजया बँक

महाजनांनी घेतली माहिती
बँक अधिकार्‍यावर गोळी झाडून हत्या झाल्याने घटनेबाबत पालकमंत्री गिरीश महाजन व भाजपचे जेष्ठ नेेते एकनाथराव खडसे यांनी घटनेची माहिती घेतली. महाजन यांनी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्यांशी चर्चा करुन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.

महिन्याभरात होता विवाह
हिमाचल प्रदेश येथील रहिवाशी असलेला करणसिंग तीन वर्षापासून निंबोल शाखेत कार्यरत होता. त्यांचा वाडनिश्चय ठरला होता. यासाठी त्यांनी तयारी देखील सुरु केली होती. परंतु त्यापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठले. घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळवली आहे.

सात ठिकाणी बोटांचे ठसे
बँकेत सात ठिकाणी ठसे तज्ज्ञांना त्यांच्या बोटांचे ठसे सापडले आहे. त्यांनी बँकेत येण्यापूर्वी मुक्ताईनगर येथील प्रवर्तक चौकातून पाण्याची बाटली घेतली. ती बाटली ते बँकेत सोडून गेले. बँकेतून बाहेर येऊन मराठीत त्यांनी एटीएममध्ये पैसे आहे का? असे विचारले.

हत्त्या कशासाठी हे कोडेच?
मारेकर्‍यांनी करनसिंग नेगे यांची हत्त्या कशासाठी केली, हे एकच कोडेच आहे. बँकेत येऊन त्यांनी पैशांची मागणी केली नाही किंवा चावी संदर्भातही विचारणा केली नाही. यामुळे बँक लुटणे हा त्यांचा उद्देश नव्हता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!