समीक्षण : ‘द फोर्थ वे’ सशक्त संहितेचे तात्विक सादरीकरण

0

हिंसा आणि अहिंसा या मानव जातीच्या प्रारंभापासूनच्या प्रवृत्ती… पाश्चात्य देशांमध्ये आणि पूर्वेकडील देशांमधील मुलभूत जाणीवा याच दोन भावनांनी अधोरेखित होतात.

अनेक तत्त्ववक्ते होऊन गेलेत. अनेक हुकूमशाहा देखील होऊन गेलेत. काही ठिकाणी त्यांचे अस्तित्व अजूनही जाणवतं आहे आणि हाच खरा संघर्ष आहे.

लेखक अमरसिंह राजपूत यांनी तत्वज्ञानाच्या पायाभूत अशा माध्यमाचा नाटकाचा विषय निवडून नाटक हे वैचारिक भूमिकेवरही ताकदवान होऊ शकतं. एक सशक्त कथानक या संहितेद्वारे निर्माण होतांना दिसत आहे.

परंतु केवळ तात्विक आधार न घेता या संकल्पनेला त्यांनी जी ड्रामॅटिक लिबर्टी वापरली आहे आणि काळाच्या या खेळामध्ये नाट्यरसिकांना गुंतवत ठेवत विविध स्तरांवर एका वेगळ्याच उंचीवर नाटकाचा विषय घेऊन जातात.

दिग्दर्शक दिपाली पाटील यांनी लेखकाच्या या संहितेला एका वेगळ्याच सूत्रामध्ये गुंफले आहे. असेच वाटते. अगदी सुरवातीपासून ते शेवटपर्यंत नाटकाची जी गती अपेक्षित असते ती राखण्यात यशस्वी.

काही प्रसंगांमध्ये मात्र थोडे पात्रांच्या हालचालींकडे लक्ष देणे आवश्यक होते. दिग्दर्शकाचे कसब इथेच पणाला लागते. मात्र विषय हाताळतांना या तात्विक बैठकीच्या नाटकाचा भावगर्भ उलगडून दाखवतांना गांधी आणि बुध्दाच्या प्रतिमांचा वापर साईडवर दाखवून नाटकीय परिणाम योग्य साधला.

पहिल्या प्रसंगातच नाटक कोणत्या दिशेने जाणआर हे स्पष्ट होते. हिंसेमुळेही शरीराचा नाश होऊ शकतो. परंतु अहिंसेच्या वैश्विक तत्त्वज्ञानाला ते मारु शकत नाही.

विचाराला मारु शकत नाही. हिटलर जेव्हा गर्वाने म्हणतांना दाखवला आहे की माझेच चरित्र वाचतांना तरुण वर्ग मला दिसत आहे. परंतु गुर्जिएफ त्याला विचारतो की तुझे स्मारक कुठे आहे? पुतळा कोणी उभारला? कोणत्या देशात आहे ते सांग. तेव्हा तो हतबल होतो. हताश होतो. कुठेच त्याला त्याचा पुतळा आढळत नाही. जर्मनीत देखील नाही. परंतु महात्मा गांधी जर्मनीत आणि इतर देशांमध्येही केवळ स्मारकाच्या स्वरुपात नाही तर वैश्विक शांततेच्या आणि करुणेच्या संदेशाने प्रत्येक मानवात त्यांचे अस्तित्व आज दिसत आहे.

कोणत्याही हुकुमशहा ना त्यांना संपवू शकला ना त्यांच्या विचारांना. हिटलरच्या भूमिकेत मोरेश्वर सोनार यांनी जाण आणली. कायीक आणि वाचिक ही अभिनयाची दोन्ही अंगांनी समृध्द असाच त्यांचा रंगभूमीवरील वावर होता.

ओफेन्स्कीच्या भूमिकेत अमोल ठाकूर छाप पाडतात. विशेषतः गुर्जिएफ बरोबरचे त्यांचे तात्विक संवाद खुलले. विशेष प्रभाव हा संदिप तायडे या नटाने पाडला.

त्याची वेशभूषा आणि फक्त ऑर्डर फॉलो करायची, दहशत पसरवायची आणि मुडदे पाडायचे ही क्रुरता दाखवण्यात ते यशस्वी ठरतात. मारेकरी सचिन कापडे यांना संवाद नसूनही त्यांचा मार्मिक अभिनय वाखण्यासारखाच.

एम. रफीक हिमांशू पाटील, जॉन – निखिल जगताप आपआपली कामगिरी बजावतात. डॉ.अत्रेच्या भूमिकेत आशय कोतवाल लक्षात राहतात. त्यांचा आवाज उत्तम असाच आहे.

टिल्लूच्या भूमिकेत स्वराली जोशी या बालकलाकाराने चुणुक दाखवली. तिचे आत्मविश्वासाने वावरणे उल्लेखनीय. गुर्जिएफच्या भूमिकेत अमरसिंह राजपूत अनेक कंगोरे दाखवतात.

तात्विक बैठकीसाठी आवश्यक असणारा संयम त्यांनी त्यांच्या रंगभूमीवरील सहजपणे वावरतांना दाखवला. आणि आपली भूमिका समजावून सांगतांना समोहित करतांना आणि फोर्थवेचे आयाम उलगडून दाखवतांना त्याचे कसब निश्चितच उजवे ठरते.

लेखक म्हणून देखिल त्यांची वैचारिक बैठक या नाटकाने अधोरेखित केली. वैचारिक, तात्विक बैठक असलेले नाटक हे कवेळ शब्दबंबाळ होऊ शकते.

परंतु ते विशिष्ट प्रसंग मोठ्या खुबुने पेरतात अगदी पहिल्या प्रसंगापासून लेखकाचा खून, हिटलर बरोबरचे प्रसंग तसेच चष्मे विकणारी टिल्लू प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात.

एक तात्विक बैठक असलेले संहितेवरील दिग्दर्शकाचे यथोचित संस्कार यामुळे ‘फोर्थ वे’ प्रेक्षकांची पकड घेते आणि वेगळ्याच पातळीवर नाटक पोहोचते ते चौथ्या मार्गाचा ठाव घेऊनच.

 

LEAVE A REPLY

*