जिल्ह्यातही बरसल्या धारा : चोपडा तालुक्यात वीज कोसळली

0
जळगाव । देशदूत चमूकडून- राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली असतांनाच जळगाव जिल्ह्यातही काही तालुक्यांमध्ये रात्री वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यात पारोळा, एरंडोल, चोपडा, भडगाव, अमळनेरसह आदी तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाला प्रारंभ झाला. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. वादळामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तो रात्री उशिरापर्यंत सुरळीत होऊ शकला नाही. दरम्यान चोपडा तालुक्यात वीज कोसळून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रात्री सुरु झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकांना फटका बसला.

एरंडोल येथे वादळासह पाऊस
एरंडोल । प्रतिनिधी । शहरात रात्री 9.30 वाजेदरम्यान अचानक वादळाला सुरुवात झाली. नंतर पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातारण होते. रात्री अचानक जोरदार वादळाला सुरुवात होवून पावसाने हजेरी लावली. वादळ व अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उळाली. 10 ते 15 मिनिट पाऊस होता. यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

पारोळ्यात वादळी पाऊस
पारोळा । प्रतिनिधी । येथे आज सायंकाळी 6 वाजेपासून वादळ व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.
यामुळे मार्केट कमिटीत धान्य व मालाचे बरेच नुकसान झाले तर फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. लिंबू, डाळिंब, कांदा, आंबा पिकांना फटका बसला असुन दरवर्षी सप्तशृंगी गड धुण्यासाठी चावदसला पाऊस येतो म्हणून हा पाऊस येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यावेळी गडावर पायी जाण्यासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी असताना पारोळा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी चहा, पाणी, नाश्ता, जेवण, सरबतचे स्टोल लावण्यात आले असताना त्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली होती.

अमळनेर येथे शिडकावा
अमळनेर । प्रतिनिधी । शहरासह तालुक्यातील काही भागात आज दि.14 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाच्या पावसाचा शिडकावा पडला. सांयकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्री 9 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ सुरु होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या वादळामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. दरम्यान आज दि.14 रोजी दुपारपासूनच आकाशात काळ्या ढगांची गर्दी दाटली होती. तेव्हा संध्याकाळी 7 वाजेपासून पावसाळी वातावरणाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या मध्यम स्वरुपाच्या सरी सुरु होत्या. आजच्या वादळामुळे शहरातील रस्त्यांवरुन पाला पाचोळा साचला. तर भीमसैनिकांच्या मिरवणुकीवर याचा परिणाम झाला.

चोपडा तालुक्यात उडाली धांदल
चोपडा । प्रतिनिधी । चोपडा तालुक्यात आज रविवारी संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी वार्‍यामुळे घरावरील व गुरांच्या गोठ्याची पन्हाळी पत्रे उडाली तर काही ठिकाणी अकाली पावसाच्या सरी कोसळल्या. यावेळी जोरदार विजांचा कडकडाट होऊन मराठे येथे वीज पडून एक जण गंभीर जखमी होऊन भाजला गेला असून, त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जोरदार झालेल्या वादळ व पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, बाजरी, मका व कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. आज 14 रोजी संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यात जोरदार वादळी वार्‍यासह लासुर येथे पावसाने चांगलीच हजेरी लावली.तर रुखनखेडे, नारोद, खरद, बोरखेडा, माचला, वर्डी, मंगरूळ व अडावद भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.

जोरदार वादळाबरोबर आकाशात प्रचंड विजांचा कडकडाट सुरु होता. दरम्यान मराठे येथे वीज कोसळून बुधा कहारु भील (वय 50) गंभीर जखमी होऊन भाजला गेल्याने त्यास उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर वादळामुळे वराड येथील अरुण महाजन यांच्या गुरांच्या गोठ्याची पन्हाळी पत्रे उडाली तसेच विजेच्या तारा तुटल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत काही गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. आज जोरदार वादळीवार्‍यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतात उभा असलेला गहू, बाजरी, मका व उन्हाळी कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

LEAVE A REPLY

*