Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या राजकीय

सेनेलाही हवे जळगाव; शिर्डीची जागा भाजपाला!

Share
जळगाव । जळगाव लोकसभा मतदार संघाच्या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. त्या सोबतच सेनेने जळगाव लोकसभा मतदार संघात स्वतंत्ररित्या लढण्याची तयारीही सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून 15 फेब्रुवारी रोजी पाचोर्‍यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेचा मेळावा होत आहे. या मेळव्यातच जळगाव लोकसभा मतदार संघातून सेनेचा प्रचार नारळ फोडला जाण्याशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकसभेला भाजपा-सेनेची युती झालीच तर शिर्डीची लोकसभेची जागा सेनेतर्फे भाजपाला सोडली जाईल, असेही सेनेतील सूत्रांकडून समजते.

लोकसभा निवडणुकांची सध्या सर्वच पक्षांतर्फे मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात सध्याच्या भाजपा-सेना युतीचे खासदार ए.टी.पाटील यांना सेनेचा उघड विरोध होवू लागला आहे. सेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उघडपणे सभांमधून ए.टी.पाटील यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे जळगाव लोकसभेच्या जागेवर माजी आमदार आर.ओ.पाटील हे सेनेकडून संभाव्य उमेदवार असतील, अशी अप्रत्यक्ष घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळेच उध्दव ठाकरेंची सभा पाचोर्‍यात आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत अप्रत्यक्षरित्या सेनेकडून लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याची चर्चा आहे. जळगाव लोकसभेवर भाजपाचे वर्चस्व आहे. खासदार ए.टी.पाटील दोन पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाकडून निवडून आले आहेत. मात्र, अलीकडे मतदारसंघात त्यांच्याविषयी कमालीची नाराजी पसरली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून देखील त्यांच्या नावाला विरोध केला जात आहे.

युती झालीच तर सेनेचा विरोध पत्करून उमेदवार उभा करणे भाजपाला जड जाणार आहे. त्यामुळेच युती झालीच तर भाजपा जळगावची जागा सेनेला सोडू शकतो, अशी शक्यताही व्यक्त होवू लागली आहे. जळगावची जागा सोडतांनाच सेनेला भाजपाला एक जागा द्यावी लागू शकते. अशा वेळी सेना शिर्डीची जागा भाजपासाठी सोडू शकते, असा कयास लावला जात आहे. सेनेने अधिकच्या जागांची मागणी केली आहे. त्यात जळगावच्या जागेसोबतच पालघर आणि भिवंडीच्या जागेचीही सेनेने मागणी केली आहे.

दरम्यान, सेना मागत असलेल्या तिन्ही जागांवर सध्या भाजपाचे खासदार आहेत. त्यामुळे सेनेला या तिन्ही जागा सोडतांना भाजपाला विचार करावा लागणार आहे. सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतांना भाजपा-सेनेत युतीच्या माध्यमातून जागा वाटपाचे जे सूत्र होते, ते सूत्र अंगीकारले तरच भाजपा-सेनेची युती शक्य आहे. ज्या जागांवर सेनेचा संभाव्य उमेदवार निवडून येणे शक्य आहे, अशा जागा सेनेला देणे व ज्या जागांवर भाजपाचा उमेदवार निवडून येतो, अशा जागा भाजपाने आपल्याकडेच कायम ठेवणे हे सूत्र वापरले जावे, असा आग्रह सेनेकडून धरण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!