Type to search

निष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही

maharashtra जळगाव राजकीय

निष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही

Share
जळगाव । जळगाव शहराच्या विकासासाठी पूर्ण प्रयत्न करेल, जे उमेदवार विरोधात आहे त्यांचे उणे-दुणे काढण्यापेक्षा विकासाची मोठी रेषा ओढेल, आपण निष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही. अशी ग्वाही जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना दिली. भाजप कार्यालयातील बैठकीत त्या बोलत होत्या.

जळगाव लोकसभेच्या उमेदवार म्हणून भाजपतर्फे नुकतेच आमदार स्मिता वाघ यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगावातील भाजप कार्यालयात नगरसेवक, मंडळप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांच्यासह पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, भाजपच्या 57 पैकी 34 नगरसेवकांचीच या बैठकीला हजेरी होती. अनेकांनी पाठ फिरविली. शिवसनेचे पदाधिकारीही या बैठकीला नव्हते.

महिलांना प्रथमच मोठ्या प्रमाणात संधी मिळत आहे. नरेंद्र मोदी यांनी विकासाची मोठी कामे करून ठेवलेली आहे. ती आपल्याला लोकांपर्यंत पोहचवायची आहेत, असे सांगत 26/11 हल्ल्याच्या काही आठवणीही आमदार वाघ यांनी सांगत काँग्रेस सरकारच्या तेव्हाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.

इगो विसरून कामाला लागा
आमदारांशी असलेले वादविवाद नंतर बघू असे म्हणून महिनाभर सर्व कामे व इगो बाजूला ठेवून कामाला लागा, सर्वांना सोबत घ्या, असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी केले. भाजप सेना युती असल्याने शिवसेनेच्या नगरसेवक, पराभूत उमेदवार, प्रभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घ्या, विश्वासात घ्या, कमीपणा वाटू न देता स्वतः त्यांच्याकउून जाऊन चर्चा करा, असेही आमदार भोळे यांनी सांगिते. आपले उमेदवार हे केवळ नरेंद्र मोदी आहेत. त्यांना पंतप्रधान बनविण्यासाठी आपल्याला जळगाची जागा जिंकून द्यायची आहे. एक लाखाची लीड या जळगाव शहरातून देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. प्रभागातील प्रत्येक प्रभावी व्यक्तीची यादी बनवून त्यांचीही मदत घ्या अन्य पक्षातील कार्यकर्ते भाजपात येण्यास इच्छुक असतील त्यांनाही पक्षात घ्या, जिथे संधी भेटेल तिथे प्रचार करा. उमेदवार 28-29 रोजी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सागितले.

खडसेंचे नाव टाळले, कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज
आमदार स्मिता वाघ यांनी नियोजनासंदर्भात माहिती दिली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर आठ जागांची जबाबदारी सोपविण्यात आली असून या आठही जागा भाजपच जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गिरीश भाऊंचे नियोजन आपण सर्व बघतच आहोत, असे सांगत दोन ते तीन वेळा आमदार वाघ यांनी गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख केला, मात्र, माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या नावाचा उल्लेख टाळला. त्यामुळे सभेनंतर यासंदर्भात कार्यकत्यांमध्ये कुजबूज सुरू होती.

म्हणून तिकीट कापले
पदाधिकार्‍यांनी संघटनावर भर द्यावा, संघटनेसाठी कामे करावी, असे सांगत ज्या खासदारांनी संघटनावर भर दिला नाही, संघटनेसाठी कामे केली नाहीत अशा चार ते पाच खासदारांची तिकीट कापण्यात आल्याचे सूत्रसंचालक नगरसेवक नरेंद्र घुगे यांनी सांगितले. त्यांनी असे म्हणताच काही काळ शांतता पसरली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!