Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या राजकीय

राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकरांच्या गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ!

Share
जळगाव । एकीकडे जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून अनिल भाईदास पाटील कामाला लागले असतांनाच दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच देवकर यांना लोकसभेची निवडणूक लढविण्याचे फर्मान सोडल्यानंतर आतापर्यंत नकार देणार्‍या गुलाबराव देवकरांनी होकार देत लोकसभेची तयारी सुरु केली आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहु लागतांनाच राज्यात शिवसेना-भाजपाने सोमवारी सायंकाळी युतीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून देखील जोरदार हालचाली सुरु झाल्या. या पूर्वी प्रदेश पातळीवर दोन वेळा झालेल्या बैठकांमध्ये गुलाबराव देवकर यांचेच नाव जळगाव लाकेसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवार म्हणून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी सुचविले होते. मात्र देवकरांनी आपली विधानसभाच बरी असे म्हणत लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. त्यामुळे पर्याय म्हणून जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील आणि विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे नाव पुढे आले होते.

अ‍ॅड.निकम यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे अनिल भाईदास पाटील यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनिल भाईदास पाटील हे कामाला लागले होते. दरम्यान शिवसेना-भाजपानेच युती केल्यानंतर राज्यातील आणि देशातील राजकीय समीकरणे बदल्यामुळे स्वत: शरद पवारांनी सोमवारी रात्री उशिरा देवकरांना फोन करुन लोकसभा निवडणुकीची उमेदवार घेण्याचे आदेश दिल्याने देवकरांनीही पवार साहेबांना होकार देत कामाला लागण्याचा शब्द दिला.

साहेबांचा आदेश पाळावाच लागेल!
खुद्द शरद पवार साहेबांनी फोन करुन लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी घेण्याचे सांगितल्यामुळे मी होकार देत कामाला लागेल, असा शब्द साहेबांना दिला आहे. आज सर्व कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून कार्यकर्त्यांना निर्णय कळविल्यानंतर उद्यापासून संपूर्ण मतदार संघाच्या दौर्‍याला सुरुवात करीत आहे.
– गुलाबराव देवकर

अनिल पाटलांना पुन्हा हुल
विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपाकडून दगाफटका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील हे अमळनेर विधानसभा मतदार संघातून विधानसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशिल होते. मात्र राष्ट्रवादीत लोकसभा लढण्यास कोणीही तयार होत नसल्याने अनिल पाटील यांना उमेदवारीबाबत संकेत मिळाले होते. त्यानंतर अनिल पाटील हे कामाला लागले होते. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे तसेच जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावून त्यांनी संपर्क मोहीम सुरु केली होती. ऐनवेळी शरद पवारांनी देवकरांना लोकसभा लढण्याचे आदेश दिल्याने पुन्हा एकदा अनिल पाटील यांना हुल दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!