दलालीशिवाय काँग्रेसचे पोट भरत नाही!

संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचा आरोप

0
जळगाव । कुठलाही मुद्दा नव्हता म्हणून काँग्रेसने राफेलचा मुद्दा काढला. ‘पॅरॅलीसीस पॉलीसी’ हा काँग्रेसला झालेला रोग आहे. जोपर्यंत त्यांना दलाली भेटत नाही, तोपर्यंत त्यांचे पोट भरत नाही, असा आरोप केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी रविवारी केला. जळगावात झालेल्या भाजपच्या शक्तिकेंद्र प्रमुखांच्या संमेलनात ते बोलत होते. राफेल करार हा पूर्णतः पारदर्शक असून आरोप करणार्‍या राहुल गांधींचा बुद्ध्यांक देवालाच माहिती, असा टोलाही त्यांनी लगावला.

गोटेंनी कार्यकर्त्याला हरवून दाखवावे! – गिरीश महाजन
अजित पवार बारामतीत येण्याचे आव्हान देतात, अनिल गोटे धुळ्यात तर आमदार किशोर पाटील पाचोर्‍यात. एकटा माणूस कुठे -कुठे लढणार? येथे कुणीही अमर नाही, भाजपात चॅलेंज स्वीकारण्याची धमक आहे.अनिल गोटेंनी आधी भाजपच्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला हरवून दाखवावे, असे प्रतिआव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
संघटनेच्या बळावर उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांसह राज्यातील सर्व जागा जिंकू, असा दावाही त्यांनी केला. नगरमध्ये तुलनेने कमी जागा असतांना राष्ट्रवादीमध्ये फोडाफाडी करुन गनिमी काव्याने महापालिकेत सत्ता काबीज केल्याचेही महाजन यांनी सांगितले.

एकनाथराव खडसेंचा टोला
उत्तर महाराष्ट्रात सातत्याने भाजपचेच खासदार निवडून येत आहेत, केवळ नंदुरबारचा अपवाद होता. ती जागाही गेल्या वेळी जिंकलो. विरोधकांकडे उमेदवार नाहीत. रक्षा खडसेंच्या विरोधात कोण आहे सांगा, ए. टी पाटील यांच्याविरोधात कोण आहे ते सांगा, असा प्रश्न विचारतच आतले असतील पण बाहेरचे कोण? ते सांगा, असा टोला आमदार एकनाथराव खडसे यांनी लगावला. मोदींच्या काळात दहशतवादी कारवाया थांबल्या, देशाला सुरक्षित ठेवण्याचे महत्त्वाचे काम या सरकारच्या काळात झाल्याचे ते म्हणाले. खडसे यांचे सभागृहात आगमन होताच समर्थकांनी मोठमोठ्यांनी घोषणा दिल्या. याचा आपल्या भाषणातून नंतर समाचार घेत गिरीष महाजन यांनी खडसे समर्थक कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. कार्यकर्त्यांनी वैयक्तिक नेत्यांच्या नावाने घोषणा न देता, संघटनेच्या नावाने घोषणा दिल्या तर आपण सारे संघटीत असल्याचा संदेश जातो, असे ते म्हणाले. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनीही मनोगत मांडले.

LEAVE A REPLY

*