Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या राजकीय

विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीची वाट बिकट!

Share

जितेंद्र झंवर
जळगाव । लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजप-शिवसेना युतीने देदीप्यमान यश मिळवले. साडेतीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेतले. सर्वच विधानसभा क्षेत्रात आघाडी घेतली. यामुळे जिल्ह्यात आधीच कोमामध्ये असणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा आहे.

लोकसभा निवडणूक संपल्यावर आता विधानसभेचे वेध सुरू झाले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभेचा ट्रेंड विधानसभेत कायम राहिल्यास जिल्हा आघाडीमुक्त होणार आहे. परंतु लोकसभेत ‘ब्रॅण्ड मोदी’ यांच्या नावावर मतदान झाले आहे. विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होणे अवघड आहे. कारण राज्यातील व केंद्रातील प्रश्न वेगळे आहेत. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला सावरण्याची संधी आहे. या 4 महिन्यात या संधीचा वापर ते कसा करून घेतात? त्यावर विधानसभेतील यश-अपयश अवलंबून असेल.

भाजपकडे ना.गिरीश महाजन, आ.एकनारावथ खडसेंसारखे तर शिवसेनेकडे ना.गुलाबराव पाटील यांचेसारखे नेते आहेत. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीकडे जिल्ह्यात ओळख असणारे असे नेतृत्व नाही, पक्ष संघटना कमकुवत झाली आहे. जनतेच्या जिव्हाळाच्या प्रश्नावर आंदोलने उभारली गेलेली नाही. लोकसभेत मिळालेल्या अपयशामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खालावले असेल. नेत्यांना कार्यकर्त्यांमधील ही नकारात्मक भावनाही दूर करावी लागणार आहे.

शेतकरी कर्जमाफी हा विषय भाजप-शिवसेनेसाठी अडचणीचा ठरणार आहे. शिवसेनेकडूनही कर्जमाफीवर टीका केली जात होती. दुसरीकडे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयात शेतकरी कर्जमाफीचा मोठा वाटा राहिला आहे. लोकप्रिय घोषणा व सरसकट कर्जमाफीचे आश्वासन काँग्रेसकडून महाराष्ट्रात दिले जाऊ शकते. तसेच बेरोजगार, महिला आणि युवा मतदार सर्वच राजकीय पक्षांसाठी फोकस राहणार आहे.

जिल्ह्यातील 2014 चे चित्र काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी आशादायक नव्हते. ज्या पारोळा-एरंडोल मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला, तेथेही 73 हजारांचे मतधिक्क्य उन्मेश पाटील यांना मिळाले आहे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या व नंतर भाजपत दाखल झालेल्या आ.शिरीष चौधरी यांच्या अमळनेर मतदारसंघात 60 हजारांचे मतधिक्क्य उन्मेश पाटील यांना मिळाले आहे. यामुळे 2019 ची विधानसभा ही जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

आघाडीने काय करावे?
दुष्काळाचे गांभीर्य ओळखून काम करावे.
जिल्ह्यातील पक्ष संघटन मजबूत करावे लागेल.
आपापसातील हेवेदावे मिटवून काम करावे.
संघटनेला जिल्हास्तरावर नेतृत्व द्यावे लागेल.

युतीेने काय करावे?
दुष्काळग्रस्तांसाठी
कामांचा वेग वाढवावा.
सरकारची कामगिरी तळागाळात न्यावी.
नेते-कार्यकर्त्यांमधील गटबाजी संपवावी.
संघटनेतील नेतृत्वाचा पुरेपूर वापर करावा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!