Type to search

Featured जळगाव

जळगाव: पोलीस ठाण्यात पती-पत्नीत फ्रीस्टाइल हाणामारी; परस्परांविरोधात तक्रार

Share

जळगाव | प्रतिनिधी

न्यायालयीन कामकाजासाठी जळगावात आलेल्या चाळीसगाव येथील विवाहितेसह तिचे कुटुंबिय आणि तिच्या पतीत पोलीस ठाण्यातच जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार शुक्रवारी दि.२९ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात घडला. दरम्यान पोलीस ठाण्यातच हाणामारी होत असल्याचे पाहून पोलिसांनी दोघांची सुटका केली. यावेळी विवाहितेसह कुटुंबियांनी उलट पोलिसांना दोषी ठरवत धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. तसेच पोलीस ठाण्यात आरडाओरड करून गोंधळ घातला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

न्यायालयात शिवीगाळ

पतीने न्यायालयात केलेल्या तक्रारीवरील कामकाज शुक्रवारी जिल्हा न्यायालयात होते. या कामकामासाठी मुलीचे वडील, आई, बीएसएफ जवान असलेला भाऊ तसेच बहिण हे जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात आले. याठिकाणी पती तसेच सासरे समोर येताच त्यांना शिवीगाळ झाली. याबाबत तक्रार देण्यासाठी विशाल वडीलांसह शहर पोलीस ठाण्यात आला. त्यांची तक्रार पोलीस घेत असतांना विवाहितेसह तिचे कुटुंबिय शहर पोलीस ठाण्यात धडकले.

याठिकाणी विवाहितेने तिच्या वडीलांना पतीने माझे मागे गुंड लावले असून त्यापैकी एक मुलगा पोलीस स्टेशनला आला असल्याचे सांगितले. हे ऐकताच विवाहितेच्या वडीलांनी शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षकाच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या तरुणाला चापटांनी मारहाण केली. पोलीस निरिक्षकांसह, गुन्हे पथकातील कर्मचार्‍यांनी तरुणाची सुटका करुन विवाहितेसह तिच्या कुटुंबियाला बाजूला केले.

उलट विवाहिता हिच्यासह कुटुंबियांनी आम्हाला पोलिसांनी धक्काबुक्की तसेच अरेरावी केली, असा आरोप करत गोंधळ घातला व आरडाओरड करत पोलीस ठाणे आवारात गर्दी जमविली. विवाहिता व तिचे पती दोघांची परस्परविरोधात तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. तसेच गोंधळ घालणार्‍या विवाहितेसह तिच्या कुटुंबियांविरोधात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकारामुळे शहर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काहीतरी मोठा प्रकार घडल्याच्या अफवा देखील शहरात पसरल्या होत्या.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!