Type to search

जळगाव

बहुळा, हिवरातून विसर्ग; दोन्ही पर्यायी पूल वाहिले

Share

पाचोरा । तालुक्यात सरासरी पेक्षा अति प्रमाणात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील लहान-मोठी धरणे नद्या- नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. तालुका जलमय झाला आहे. अनेक वर्षांपासून तालुक्यात अश्या स्वरुपाचा पाऊस झाला नाही.मध्यम प्रकल्पातील बहुला व हिवरा सिंचन प्रकल्प 100% भरले आहे. तर या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

हिवरा धरण पुर्णतः भरल्याने होत असलेल्या पाण्याच्या विसर्गा मुळे हिवरा नदिला दि.,9 सप्टेंबर रोजी पहिला पूर आला तर दी.18 रोजी आलेल्या पुरा मुळे राष्ट्रीय महामार्गावर सुरु आलेल्या नवगजा पुलांच्या बांधकामा वरील पर्यायी दोन्ही पूल रस्ते वाहून गेल्याने शहरात येणारी व शहरा बाहेर जाणारी लहान-मोठी वाहने दुचाकी वाहन धारक वाहतुकीच्या कोंडी मुळे अडकून पडले.आगाराच्या बसेस शहरात येऊ शकत नसल्याने प्रवासी अडकले.अशीच परिस्थिती कृष्णापुरी फरशी पुलावर पहायला मिळाली. शहरात येणार्‍या ह्या रस्त्यावर नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शहरातील जनतेचा संपर्क तुटला.तर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, वाहन धारक दोनही बाजूस अडकले.

पूर परिसरातील रस्त्यावर वाहनांची रहदारी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी काही काळ थांबवली होती. नगर पालिका प्रशासनाच्या वतीने हिवरा नदिवर आठ पट्टीचे पोहणारे जलरक्षक लाईफ जॅकेट घालून तैनात करण्यात आले. तालुक्यातील भोजे बहुला नदीला 1990 नंतर मोठा पूर आला.शहरी व ग्रामीण भागात पुरामुळे कोणतीही वित्त किंवा जीवित हानीची प्रशासना कडून माहिती प्राप्त नाही. होवू पाचोरा हिवरा किनार्यावर मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, पोलिस अधिकारी दत्तात्रय नलावडे, गणेश चौबे, तलाठी आगरकर ,पोलिस व पालिका व महसुल प्रशासन दक्ष आणि लक्ष ठेवून आहेत.

पाय घसरल्याने तरुण वाहिला
हिवरा नदी परिसरातील शिव कॉलनी भागात राहणारा तरुण जितेंद्र दत्तात्रय महाजन हा दि.18 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास फरशी पुलावर अचानक पाय घसरून पडल्याने पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदर तरुण अद्यापपर्यंत मिळून आलेला नाही.

जिल्ह्यातील तीनही प्रकल्पांसह बहुतांश प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असल्याने सर्वच नदीपात्रातील पाण्याची आवक वाढ होत आहे. परीणामी सर्वच नदयांमधे पाणीपातळी वाढत असल्याने प्रकल्प अभियंत्यांसह प्रशासनाकडून देखिल सतर्कतेचा ईशारा देण्यात आलेला आहे.

खडकी नदीला पूर
तोंडापूर, ता.जामनेर । वार्ताहर – तोंडापूरसह परिसरात बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. घाट माथ्यावर खडकी नदीच्या उगमस्थानवर जोरदार पाऊस झाल्याने तोंडापूर धरणातून शंभर टक्के पाण्याचा विसर्ग होत असल्याने खडकी नदीला महापूर आला.तर पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.

नदीने रौद्रय रूप धारण केले.दि.18 रोजी दुपारी बारा वाजल्यापासून नदीला पाण्याची पातळी वाढत गेली होती. काही वेळातच नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नदीवर पूल छोटा असल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला होता.जामनेरवरून येणार्‍या वाहनांची वाहतूक बंद ठप्प झाली होती. फर्दापूर, फत्तेपुर या मार्गाने चार ते पाच तास सर्व वाहतूक ठप्प झाली होती. शालेय विद्यार्थी या पुरामुळे अडकून पडले होते. एवढे मोठे धरण, त्यावर असलेली मोठी नदी असतांना या नदीवर छोटा पूल असून त्यात या पुलाला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाचा विळखा असल्याने पाण्याचा विसर्ग होण्यास अडथळे निर्माण होत असल्याने सार्वजनिक बांधकामविभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. या नदीवर मोठा पूल व्हावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!