Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

मुलगा होत नाही म्हणून पत्नीचा खून

Share

पाचोरा । तिन्ही मुलीच झाल्या असून मुलगा होत नाही म्हणून पतीने पत्नीला मारहाण करून तिचा खून केल्याची घटना पाचोरा शहरातील विवेकानंद भागातील वंजारी तांडा येथे घडली.

रतन पवार (वय 31) याचा विवाह निपाने (ता एरंडोल) येथील कस्तुराबाई हिच्याशी सुमारे नऊ वर्षांपूर्वी झाला. त्यांना गौरी (माया), खुषी, भाग्यश्री अशा तीन मुली (वय 6, 4,2) झाल्या. तिन्ही मुलीच आहेत म्हणून पती रतन हा पत्नी कस्तुराबाईचा छळ करून दररोज दारूच्या नशेत मारहाण करीत होता. 9 जून रोजी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास रतन याने पत्नी कस्तुराबाई हिला मारहाण करून गळा दाबला. यावेळी घरातील लहानग्या तिन्ही मुली घाबरल्या बाहेर पळाल्या. कस्तुराबाई यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आला. . घटनेची माहीती मिळताच चाळीसगाव भागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन मोरे, उपविभागिय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांचे मार्गदर्शनात पीएस आय पंकज शिंदे हे तपास करीत आहे.

माहेरच्यांना सांगितले चक्कर आले
माहेरच्या मंडळींना कस्तुराबाई यांचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र माहेरच्यांनी कस्तुरबाईच्या पतीने खून केल्याचे सांगून पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरुन पोलिसांनी मयत कस्तुरबाईचे शवविच्छेदन जळगाव येथे करुन पाचोरा येथेच माहेरच्यांनी अंत्यसंस्कार केले. दरम्यान विवाहितेची आई पदमाबाई राठोड यांच्या फिर्यादीवरुन शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरुन पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

मुलीने सांगितले बाबांनी मारले
चिमुकल्या तिन्ही मुलींच्या समक्ष आईला मारल्याचे सहा वर्षाच्या मोठ्या मुलीने पोलिसांना सांगितले. बाबांनीच आईला मारल्याचे गौरीने सांगितले. आरोपी रतन पवार यानेही पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे.

…तर मानवी वंशच धोक्यात
परवाच दहावीचा निकाल लागला. मागील आठवड्यात बारावीचा निकाल लागला होता. या निकालात गुणवत्तेत पुन्हा मुलीच आघाडीवर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. गेल्या अनेक वर्षांपासून अशाच बातम्या येत आहेत. शिक्षणच नव्हे तर अनेक क्षेत्रात मुलीच आपल्या गुणवत्तेचा झेंडा रोवत आल्या आहेत. त्यानंतरही समाजात अजून वंशाला दिवा म्हणून मुलेच हवे आहेत. मग त्यासाठी स्त्री भ्रूण हत्या होते किंवा मुलीच होत आहेत म्हणून सासू, सासरे, नवर्‍याकडून सून, पत्नीची हत्या होते. 21 वे शतक सुरु होऊन आता दोन दशके लोटत आली आहेत. त्यानंतर मुलासाठी हट्ट कायम आहे.

पाचोर्‍यातील घटनेत त्याची पुन्हा पुनरावृत्ती झाली. खरं तर मुलगा किंवा मुलगी होणे हे मानवाच्या हातात नाही. निसर्गाच्या हातात आहे. विज्ञानानुसार एक्स आणि वाय गुणसूत्र एकत्र आले तर मुलगा होतो तर एक्स आणि एक्स गुणसूत्र एकत्र आला तर मुलगी होते. यातील महिलेकडे दोन्ही एक्स गुणसूत्रे असतात तर पुरुषाकडे एक एक्स व एक वाय गुणसूत्र असते. यामुळे मुलीच होत असतील तर त्याला महिला नव्हे तर पुरुषाचे गुणसूत्र कारणीभूत असतात. यासंदर्भात शासन, सामाजिक संस्थांकडून जनजागृती केली जात असते. परंतु त्यानंतर काही दिवसांनी अशा सुन्न करणार्‍या घटना समोर येतात. मुले आणि मुलींच्या जन्मदरात मोठी तफावत असते. प्रत्येक समाजात मुलांचे लग्न मुली मिळत नसल्याने लांबत चालले आहेत. तरीही समाजात जागृकता होत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आताच जागे व्हा, नाहीतर मुलाच्या हट्टासाठी भविष्यात मानवी वंशच धोक्यात येईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!