खुबचंद साहित्या प्राणघातक हल्लाप्रकरणी एका नगरसेवकाला अटक

जळगाव  –

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांना खंडणी मागून त्यांच्यावर प्राणघातक हल्लाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी नगरसेवकास पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली. न्यायालय हजर केले असता त्यास सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील व. वा. वाचनालयाजवळील गोरजाबाई जिमखाना आवारात आणि जिमखान्यात बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या (वय ५१, रा. टीएमनगर, सिंधी कॉलनी) यांना खंडणी मागून त्यांच्यावर प्राणघातक हल्लाची घटना १६ जानेवारी रोजी घडली होती. या गुन्ह्यात फरार संशयित आरोपी नगरसेवक प्रवीण देविदास कोल्हे (वय ३२, रा.कोल्हेवाडा, जुने जळगाव) याला सोमवारी २० रोजी पहाटे शहर पोलिसांनी अटक केली.

पिस्तूलचा धाक दाखवून हल्ला

साहित्या यांच्या मुलाच्या नावावर असलेली महागडी चारचाकी त्यांनी माजी महापौर ललित कोल्हे यांना दिली होती. ही चारचाकी परत मागितल्यानंतर कोल्हे यांनी देण्यास टाळाटाळ केली. साहित्या यांच्याकडून खंडणी मागितल्याची तक्रार आहे. साहित्या १६ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता गोरजाबाई जिमखाना येथे गेले होते. या वेळी ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पिस्तूलचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण केली. यात साहित्या हे गंभीर जखमी झाले होते.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. साहित्या यांच्यावर मुंबई व केरळमधील खासगी दवाखान्यात उपचार घेतले. याप्रकरणी साहित्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पालीलस ठाण्यात माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांवर प्राणघातक हल्ला, जबरदस्तीने वसुली, लबाडीच्या इराद्याने वस्तूची परस्पर विक्री, गैरकायद्याची मंडळी जमा करुन मारहाण करणे, जीवे ठार मारण्याची धमकी व बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

ललित कोल्हे यांचा शोध सुरुच
या गुन्ह्यात आतापर्यंत चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. हे चारही जण सध्या कारागृहात आहे. तर सोमवारी नगरसेवक प्रवीण कोल्हे याला अटक केली. नगरसेवक प्रवीण कोल्हे याला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर ललित कोल्हे याचा शोध पोलीस घेत आहेत. तपास पोलीस निरीक्षक अरुण निकम करीत आहेत.