विद्यापीठ निवडणूक : मतदार यादी तयार करण्यासाठी 19 पासून ऑनलाईन नोंदणी

0
जळगाव । दि.16 । प्रतिनिधी – उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याकरिता संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्थांमधील विविध विभागांच्या विभागप्रमुखांची माहिती मागविण्यासाठी पदवीधर मतदार याद्या तयार करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दिनांक 19 पासून सुरू करण्यात येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांच्या स्वाक्षरीने या अधिसूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियमनुसार विविध अभ्यास मंडळाचे गठण करणे आवश्यक असून त्यातील उपकलमनुसार संलग्न महाविद्यालयातील व मान्यताप्राप्त परिसंस्थांमधील संबंधित विषयाच्या विभागप्रमुखांच्या गटांमधून तीन विभागप्रमुख अभ्यासमंडळावर निवडून द्यावयाचे आहेत.

त्यादृष्टीने सर्व संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्थांमधील विविध विषयांच्या विभागप्रमुखांची यादी तयार करुन त्यातून संलग्न महाविद्यालय व परिसंस्था यांच्या विभागप्रमुखांचा समावेश असलेला निर्वाचक गण तयार करावयाचा आहे.

या निर्वाचक गणामध्ये विविध विषयांच्या विभागप्रमुखांची माहिती विहित नमून्यात 30 जून पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधरांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि.19 पासून सुरु करण्यात येणार आहे.

विद्यापीठाने पदवीधरांच्या नोंदवहीत नाव नोंदणीसाठी तसेच नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निर्वाचक गणामध्ये मतदार म्हणून समावेश होण्यासाठी विद्यापीठाच्या लिंकवर असलेल्या विहित नमून्यात ऑनलाईन माहिती भरावी.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 जुलै आहे. ऑनलाईन सादर केलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह विद्यापीठाने निश्चित केलेल्या केंद्रावर 19 ते 6 जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जमा करावयाचे आहेत.

 

LEAVE A REPLY

*