विद्यापीठाचा युवारंग महोत्सव आजपासून

0
जळगाव । बहिणाबाई विद्यापीठस्तरीय दोन दिवसीय युवक महोत्सव, युवारंगला गुरुवार, 14 फेब्रुवारीपासून विद्यापीठाच्या प्रांगणात सुरुवात होत आहे. या महोत्सवात सुमारे 600 विद्यार्थी कलावंत सहभागी होणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सायंकाळी चार वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. शनिवार, 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पदवीप्रदान सभागृहात अभिनेता व दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांच्या हस्ते विकेत्यांना पारितोषिके दिले जातील.

उद्घाटन समारंभापूर्वी दुपारी 2 वाजेपासून संघांची नोंदणी केली जाईल. उद्घाटनानंतर सायंकाळी 7 वाजता संघव्यवस्थापकांची बैठक होईल. विद्यापीठ परिसरातील सहा रंगामंचावर शुक्रवारी सकाळी 8 वाजता स्पर्धांना प्रत्यक्ष प्रारंभ होईल. शुक्रवारी रात्री उशिरा सर्व स्पर्धा संपतील. शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, लोकगीत, भारतीय लोकसंगीत, पाश्चिमात्य व भारतीय सुगम गायन, सूर व तालवाद्य शास्त्रीय वादन, पाश्चिमात्य व भारतीय समूहगीत, समूह लोकनृत्य, मिमिक्री, मूकनाटघ, विडंबन तसेच काव्यवाचन, वक्तृत्व, वादविवाद, रांगोळी, क्ले मॉडेलिंग, फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, मेहंदी, कोलाज, स्पॉट पेंटींग, व्यंगचित्र आणि चित्रकला अशा विविध स्पर्धा महोत्सवात होतील. उद्घाटन व बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील राहतील.

चाळीसगाव, जळगाव, कुसूंबा आणि तळोदा या चार ठिकाणी जिल्हास्तरीय युवक महोत्सव झाले. यातील विविध कला प्रकारातील प्रथम तीन विजेते विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवात सहभागी होणार आहेत. यामध्ये 310 विद्यार्थिनी आणि 286 विद्यार्थी यांचा समावेश आहे. याशिवाय साथसंगत करणारे कलावंत आणि संघव्यवस्थापक दोनशेपेक्षा अधिक आहेत. युवारंगचे कार्याध्यक्ष दिलीप पाटील, विद्यार्थी विकास संचालक प्रा. सत्यजित साळवे, समन्वयक प्रा. अजय पाटील यांनी ही माहिती दिली.

LEAVE A REPLY

*