निंभोरा सरपंचांचा राजकीय वादातून खून ?

0
भुसावळ / फेकरी । दि.19 । प्रतिनिधी-तालुक्यातील निंभोरा बु॥ येथील सरपंच शालीक सोनू सोनवणे यांची राजकिय वादातून खून झाल्याचा संशय असून त्यांचा मृतदेह गावजवळील महामार्गाच्या उड्डाणपुलाखालील झुडपात दि.19 रोजी सकाळी 7 वाजेदरम्यान आढळून आल्याने गावात खळबळ माजली असून संतप्त ग्रामस्थांनी संशयीतांना ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी चार तास महामार्ग रोखून धरला होता.
यानंतर 16 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन सायंकाळी सोडण्यात आले. याबाबत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच शालीक सोनवणे यांचा मृतदेह दि.19 रोजी महामार्गवरील उड्डाणपुलाच्या खाली आढळून आल्यानंतर गावात तब्बल चार तास तणावाचे वातावरण निर्माण होऊन समाजबांधव व ग्रामस्थांनी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सकाळी 7 वाजेपासून आशियाई महामार्गावर रास्तारोको करत मार्ग रोखला होता.

घटनास्थळी चिघळत असलेली स्थिती लक्षात घेता परिविक्षाधिन पोलिस अधीक्षक मनीष कलवाणीया, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मेहनत घेऊन जमावाला शांत करत 16 संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर जमावाने रस्ता मोकळा केला.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांमध्ये 9 महिला तर 7 पुरुष अशा 16 जणांची चौकशी करुन रात्री सोडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक बच्चनसिंग यांनी तालुका पो.स्टे.ला भेट देऊन संबंधितांशी चर्चा करुन पोलिस अधिकार्‍यांना सुचना दिल्या.

मयताच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगावच्या जिल्हा रुग्णालयात रवना करण्यात आला मात्र नातेवाईकांनी शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी केल्याने मृतदेह धुळे येथील वैद्यकिय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.

शवविच्छेदनाचा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर तालुका पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत तालुका पोलिसात 20/2017 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास परिविक्षाधिन अधिकारी मनीष कलवाणीया करीत आहे.

सोनवणे हे दिड वर्षापासून सरपंचपदाचा पदभार सांभाळत होते.दरम्यानच्या काळात सत्ताधारी सदस्या व सोनवणे यांच्यात ग्रा.पं.च्या मुद्दांवर मतभेत निर्माण झाले होते यातूनच ही घटना झाल्याची चर्चा ग्रामस्थांमधून बोलली जात होती.

 

LEAVE A REPLY

*