खुनाच्या तपासाचे पोलिसांना आव्हान

0
भुसावळ/फेकरी । दि.19 । प्रतिनिधी-तालुक्यातील विद्यमान निंभोरा बु.चे सरपंच शालीक सोनू सोनवणे यांची राजकीय वादातून हत्या करुन त्यांचा मृतदेह आशियाई महमार्गावरील उड्डाणपुलाखालील झाडीत आढळल्याने संतप्त ग्रामस्थांनी दि.19 रोजी सकाळी 7 वाजेपासून महामार्ग रोखून धरला होता.
याबाबत पोलिसांनी संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर सकाळी 11.20 वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली. या खुनाच्या मागील करणांचा शोध घेणे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान मानले जात आहे.

सरपंच शालीक सोनवणे हे दि. 15 जून रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडले ते न परतल्याने दि. 16 रोजी त्यांचा मुलगा विनोद सोनवणे यांनी तालुका पो.स्टे.ला त्यांच्या हरविल्याची नोंद करण्यात केली होती.

घटनेच्या 5 व्या दिवशी महामार्गावरील उड्डाणपुलाखाली दुर्गंधी येत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी पुलाजवळ जाऊन पहिले असता सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. मयताचा चेहरा विद्रुप झाला होता. मात्र ग्रामस्त व नातेवाईकांनी कपड्यांनरुन सोनवणे यांची ओळख पटविली.

यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सकाळी 7 वाजता आशियायी महामार्ग क्र 46 वरील सरगम गेट समोर रोखून धरत संपूर्ण संशयीत 16 ग्रा.पं. सदस्यांना अटक करण्याची मागणी केली.

यानंतर तालुका पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर सकाळी 11.20 मिनिटांनी ग्रामस्थांनी महामार्ग मोकळा केला.

अधिकार्‍याची भेट – दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधिन उपअधिक्षक मनीष कलवाणीया, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, मुक्ताईनगरचे उपविभागीय अधिकारी श्री नेवे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, पो.नि. वसंतराव मोरे, जामनेरचे पो.नि. नजिर शेख, वरणगावचे एपीआय जगदीश परदेशी, उपनिरीक्षक मनोज पवार, कमलाकर बागुल, महिला पोउनि सारिका खैरनार, किरण बावस्कर यांच्या सह एलसीबी व जळगावहून अतिरिक्त पोलिक कुमक मागविण्यात आली होती.

प्रांतानी घातली समजूत – घटनास्थळी वाढती बिकट परिस्थिती लक्षात घेता प्रांत अधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार मीनाक्षी राठोड, नायब तहसीलदार संजय तायडे, तलाठी ठाकूर घटनास्थळी दाखल होवून महिलांची समजून घातली.

अप्पर अधीक्षकांची भेट – दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी तालुका पो.स्टे. ला दाखल होऊन नातेवाईकांचे म्हणणे ऐकूण घेऊन पोलिस अधिकार्‍यांना तपासाबाबत सुचना केल्या

राजकीय वादातून हत्या ? – निंभोरा ग्रा.पं. वर 40 वर्षांपासून भाजपाच्या एका गटाची सत्ता होती. आजही ग्रा.पं.भाजपाच्याच ताब्यात असून आता पहिल्यांदाच भिल्ल समाजाला सरपंच पदाचा मान मिळाला होता.ते दिड वर्षापासून सरपंच होते. विरोधी गटासह सत्ताधारी गाटातही एकजूट नसल्याने मागील काही दिवसांपासून राजकिय वाद सुरु होते. या वादातूनच त्यांची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकाकडून करण्यात आला.याशिवाय महामार्गाच्या चौपद्रीकरणाचे आरखाडे व ग्रा.प.मध्ये आलेला मोठ्या प्राणातील निधीच्या मुद्यावरुनही सरपंच व ग्रा.पं. सदस्यांमध्ये वाद झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. या राजकीय वादातूनच हत्या झाल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

रात्रीपासून बेपत्ता – दि. 15 जून रोजी रात्री 10.30 वा. गावात लाईट गेली असतांना तलाठी यांनी बोलविण्याचा निरोप अज्ञात व्यक्तीने दिल्यानंतर ते रात्री 10.30 वाजता घरातून बाहेर पडले. ते रात्री उशीरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली होती. रात्री 2 वाजे पर्यंत त्यांचा फोन सुरु होता. त्यानंतर तो बंद झाल्याचे सांगण्यात आले.

अ‍ॅसीड प्रयोग नाही – मयताचा चेहरा काळवंडलेला असल्याने चेहर्‍यावर अ‍ॅसीड प्रयोग झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र मृतदेह डोक्याच्या बाजूने खाली असल्याने रक्त प्रवाह डोक्याच्या दिशेने होत असल्याने चेहरा काळवंडलेला आहे चेहर्‍यार अ‍ॅसीड प्रयोग झाला नसल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सांगळे यांनी सांगितले
मयत शालिक सोनवणे हे भुसावळ आयुध निर्माणीतील सेवानिवृत्त चार्जमन होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

 

LEAVE A REPLY

*