Type to search

जळगाव

सकाळी निरूत्साह तर दुपारनंतर केंद्रांवर रांगा

Share

जळगाव । जळगाव शहर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळी 7 वाजता सुरु करण्यात आली. शिवाजीनगर मनपा शाळेत 10 बुथ केंद्र, खुबचंद शाळेत 8 मतदान केंद्र, गेंदालाल मिल उूर्द मनपा शाळा मतदान केंद्र, गणेश कॉलणी परिसरातील कन्या शाळा, एसएमआयटी विद्यालयात 5 बुथ केंद्र यासह शहरातील बहुतांश मतदान केंद्रावर सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. सकाळी 9 वाजेनंतर तुरळक प्रमाणात जागृत नागरिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 9 ते 12.30 वाजेपर्यंत बहुतांश मतदान केंद्रांवर कर्मचारी, अधिकारी आणि बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांव्यतिरीक्त एकाही मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या नाही. मतदान केंद्राच्या बाहेर राजकीय पक्षांच्या बुथवर मतदान पावती शोधण्यासाठी तुरळक गर्दी दिसून आली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण असल्यामुळे रस्त्यांवर चिखलमय वातावरण असल्याने मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले असून या निवडणुकीत मतदारांमध्ये निरुउत्साहाचे वातावरण असल्याचे चित्र दिसून आले. मतदान केंद्रांवर मतदारांचा अल्पप्रतिसाद लाभल्यामुळे जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, दि. 21 रोजी सकाळी 7 वाजता प्रतापनगरमधील सौ. रत्ना जैन प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्र खोली क्रं 1 मध्ये महापौर सीमा भोळे व आमदार सुरेश भोळे उर्फ राजुमामा यांनी मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हाधिकार्‍यांनी केंद्रांची केली पाहणी
सोमवारी सकाळी गुरुनानक सतसंग हॉल येथे जिल्हाधिकार्‍यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात पाऊस पडत असला तरीही मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. त्यांनी मतदार केंद्राची पाहणी केली. सकाळी या मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. शहरात मतदान केंद्रावर अनुचित प्रकार होणार नाही याची खबरदारी पोलीस दलातर्फे घेण्यात आली. परशुराम विठोबा पाटील या शाळेत डीवायएसपी नीलाभ रोहन यांनी पाहणी केली. दरम्यान, मतदान केंद परिसराच्या 100 मीटर लांब अंतरावर वाहन ठेवण्याचे आदेश देऊनही काही वाहनधारक मतदान केंद्रांच्या जवळच वाहन पार्किंग करीत असल्याने पोलिसांनी वाहनधारकांना सूचना देतांना दिसून आले.

पावसामुळे शहरात संथगतीने मतदान
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु असल्यामुळे शहरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान संथ गतीने मतदान प्रकिया सुरू होती. सकाळी 9.30 वाजता पाऊस थांबल्यानंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, रस्त्यांवर चिखल व दलदलमुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली होती. विशेष म्हणजे सकाळी बहुतांशी ज्येष्ठ नागरिक व नोकरदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मात्र तरुणांमध्ये सकाळच्या वेळी प्रतिसाद कमी दिसून आला. सोमवारी सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वात कमी जळगाव शहरात मतदान झाले होते.

मेहरुणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा शहरातील मेहरूण परिसरातील यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. यात तरुणांपेक्षा नोकरदार वर्ग आणि वयोवृद्ध वर्गातील मतदारांच्या उत्साह दिसून आला. विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजेपासून सर्व मतदान केंद्रावर मतदारांची मतदानासाठी कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र दुपारी 1 वाजेनंतर मतदारांची मतदानासाठी गर्दी वाढत होती. आज सकाळी मतदानासाठी मतदारांचा निरुत्साह दिसून येत होता. मात्र दुपारी वातावरणात बदल झाल्यानंतर घराबाहेर पडून मतदारांनी मतदान करण्याचे पसंत केले. तसेच अपंग बांधवांना सुध्दा मतदान केंद्रापर्यंत आणून राष्ट्र्रीय कर्तव्य पार पाडण्यास मोलाची भुमिका पार पाडली. तसेच सुशिक्षित मतदारांपेक्षा नवीन मतदारांमध्ये मतदान करण्याचा उत्साह दिसून आला.

सर्वाधिक गर्दी असणारे मतदान केंद्रे
चौबे शाळेतील 117 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 113 पुरुष व 87 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे 200 मतदार म्हणजे 15.56 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. तर इस्लामपुरा मतदान केंद्र क्र. 114 वर 235 जणांनी मतदान केले या केंद्रांवर मात्र सर्वात जास्त गर्दी ही मतदारांची दिसून आली. व झालेले मतदानही या शाळेतील इतर केंद्रापैकी या केंद्रावर अधिक होते. तर राम मंदिर शाळेतील मतदान केंद्र क्र. 100 वर 218 मतदारांनी 1.30 वाजेपयर्र्त मतदान केले. हे मतदान 20.7 टक्के होते. तिथल्या सर्व मतदान केंद्रात हे मोठे मतदान आहे. तसेच येथीलच मतदान केंद्र क्र. 104 वर जवळपास 270 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथेही या शाळेतील सर्वच मतदान केंद्रामध्ये येथील आकडेवारीचा सर्वाधिक उच्चांक आहे. का. उ. कोल्हे शाळेतील शिशुविहारातील मतदान केंद्र क्र. 79 येथे 330 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या मतदान केंद्रांवरही बर्‍यापैकी गर्दी होती. तसेच का. उ. कोल्हे विद्यालयातीलच मतदान केंद्र क्र. 85 वरही सर्वाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 370 मतदारांनी मतदान केले. शहरातील बहुतेक मतदान केंद्रांवर दुपारी 3 ते 3.30 वाजेपर्यंत तुरळक प्रमाणात मतदार दिसत होते. कुठे अत्यल्प प्रमाणात तर कुठे बर्‍यापैकी मतदार केंद्रांवर दिसत होते तर 4 वाजेनंतर मतदार घरुन निघायला लागले. यावेळी एक तास निवडणूक आयोगाने जास्त दिल्याने 5 वाजेपर्यंत चालणारे मतदान हे 6 वाजेपयर्र्त चालले. 4 वाजेनंतर तर सायंकाळी 6 पयर्र्त दरवाजापर्यंत असलेले सर्व मतदारांना मतदान करता आले.

10 केंद्रांवर सीसीटीव्ही बंद

शहरातील संवेदनशिल केंद्रासह इतर 39 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. मात्र सकाळच्या सुमारास सीसीटीव्ही बंद असल्याची ओरड झाली. शहरातील 39 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही लावले असले तरी त्यापैकी 10 केंद्रांवरील सीसीटीव्ही बंद असल्याचे चित्र दिसून आले. तर खुबचंद विद्यालयातील एका मतदान केंद्रावर मतदान यंत्राच्या ठिकाणी अंधार असल्याने एका माजी निवडणूक अधिकार्‍याने संबंधित निवडणूक अधिकार्‍याकडे तोंडी तक्रार केली. या ठिकाणी त्वरित व्यवस्था करा,अन्यथा मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार करण्याचा दम भरला.

बीएलओंकडून नवमतदारांचे स्वागत
रामपेठमधील शाळा क्र. 22 येथे नवमतदारांचे स्वागत करण्यात आले. बिएलओ योगेश भालेराव, विनोद कोळी, किशोर घुले, सुपरवायझर अशोक सैंदाणे यांचेतर्फे नवीन मतदारांचा गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. राम पेठेत दोनतीन केंद्रांवर नवीन मतदारांचा भरणा अधिक होता. पहिल्यांदाच मतदान करणार्‍या तरुणांच्या चेहर्‍यावर मतदान केल्या आनंद ओसंडत होता. दरम्यान, हुडको परिसरातील ज्ञानसाधना शाळेच्या मतदान केंद्रावर आईसोबत एका 23 वर्षीय युवकाने मतदान करुन बाहेर पडतांना त्या युवकाचे निवडणूक अधिकार्‍यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्या युवकांचे केंद्राबाहेर व्हीडिओ चित्रीकरण करण्यात आले.शहरातील हुडको परिसरातील ज्ञानसाधना शाळेच्या मतदान केंद्रावर आईसोबत एका 23 वर्षीय युवकाने मतदान करुन बाहेर पडतांना त्या युवकाचे निवडणूक अधिकार्‍यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

सेल्फीचा मोह मतदारांना आवरे ना!
शहरातील जळगाव पीपल्स इंग्लिश मीडियम स्कूल,सेंट जोसेफ स्कूल या दोन्ही शाळांमधील सखी मतदान केंद्रात विधानसभा मतदानाबाबत महिलांचा व तरुणाईचा उत्साह वाढवण्यासाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले होते. मतदान केंद्र परिसरात अनोख्या पद्धतीने प्रत्येक मतदाराचे स्वागत केले जात होते. मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंटवर जाऊन मतदारांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजेपासून सर्व मतदान केंद्रावर मतदारांची मतदानासाठी कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र दुपारी 1 वाजेनंतर मतदारांचा मतदानासाठी गर्दी वाढत होती. आज शहरात पावसाची रिमझिम हजेरी लावली होती त्यामुळे मतदानासाठी सकाळी मतदारांचा निरुत्साह दिसून येत होता. मात्र दुपारनंतर वातावरणात बदल झाल्यानंतर नागरिकांनी दुपारनंतर मतदान करण्याचे पसंत केले.

अपंग पत्नीला मतदानासाठी घेतले कडेवर
लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी शहरातील कुमावत दाम्पत्याने मतदान केंद्रावर आज सकाळच्या सुमारास हजेरी लावली. पत्नी दोन्ही पायाने अपंग असल्याने चक्क पत्नीला कुमावत यांनी दोन्ही हातांनी उचलून मतदान केंद्रापर्यंत आणले. मतदान केल्यानंतर पुन्हा पत्नीला उचलून घरी रवाना झाले. लोकशाहीचा मतोत्सव मजबूत आणि सशक्त करण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य समजून कुमावत दाम्पत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे केंद्रावर मतदानासाठी येणार्‍या मतदारांनी त्यांचे कौतूक केले. तसेच शहरात वयोवृध्द स्त्री-पुरुष मतदानासाठी येत असताना तरूणांनी मदतीचा हात देवून मतदान केंद्रपर्यंत पोहचविले.

मतदान केंद्रावर असाही योगायोग
शहरातील 119 क्रमांकाच्या मतदान केंद्रांवर 119 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदान केद्रांवर 119 या संख्येचा असाही योगायोग सोमवारी घडून आला. क्र. 119 वर 84 पुरुष व 35 स्त्रिया असे मिळून 119 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विशेष म्हणजे 119 व्या क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 119 मतदारांनीच 12.40 पयर्र्त मतदान केले होते. त्यामुळे 119 चा आकडा हा येथे योगायोग म्हणावा लागेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!