Type to search

जळगाव

सफरचंद, केळी, भेंडीसह राजकीय पुढार्‍यांची साकारली वेशभूषा

Share

जळगाव । टोमॅटो, सफरचंद, केळी, पत्ताकोबी, भेंडी, गुलाब, जास्वंद यासह राजकीय पुढारी अशा विविध वेशभूषा केलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी रविवारी हॉटेल क्रेझी होम येथे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. तसेच पर्यावरण, सामाजिक विषयावर प्रबोधन केले. शहरातील अग्रवाल समाजातर्फे श्री अग्रसेन जयंती उत्सवानिमित अग्रवाल नवयुवक मंडळ, अग्रवाल महिला मंडळ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 22 सप्टेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. प्ले ग्रुप, ज्युनियर, सिनियरसाठी फळ, फुल, भाजी तर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण बचाव आणि पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना राजकीय, सामाजिक विषय स्पर्धेसाठी देण्यात आले. यात 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत संगीताच्या तालावर सादरीकरण केले. मुलांच्या विविध मुद्रा पाहून उपस्थितांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली.

फॅन्सी ड्रेस स्पर्धेआधी नर्सरीच्या मुलांना शरीराचे अवयव ओळखणे, ज्युनियर-सिनियरच्या मुलांना गणवेशावरून व्यवसाय ओळखणे, पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना गणवेश ओळखणे, तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांना कानकाडीने रंगकाम करणे, पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाडूमातीचा गणपती बनवणे, सातवी-आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टेबल व्यवस्थापन, नववी-दहावी विद्यार्थ्यांना जळगाव ओळखणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी कौशल्य पणाला लावत उत्स्फ्रूर्तपणे भाग घेतला. संध्याकाळी आनंद मेळा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात महिला वर्गाने घरी बनविलेल्या विविध खाद्यपदार्थांचे 40 स्टॉल लावले होते. यावेळी महाराष्ट्रीयन, गुजराथी, दक्षिण भारतीय, बंगाली, मध्य प्रदेश, राजस्थानी, दिल्ली, पंजाबी, हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळी असे विविध प्रांतातील खाद्यपदार्थांचे प्रकार विविध स्टॉलवर पाहायला मिळाले.

शनिवारी शोभायात्रा
श्री अग्रसेन जयंती उत्सवानिमित शनिवारी दि. 28 रोजी भव्य शोभायात्रा संध्याकाळी 5 वाजता सुभाष चौक परिसरातील भवानी माता मंदिर येथून काढण्यात येणार आहे. शोभायात्रेत समाजबांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अग्रवाल नवयुवक मंडळाचे अध्यक्ष मनिष अग्रवाल, सचिव हितेश अग्रवाल यांनी केले आहे.

अग्रवाल समाजातर्फे सकाळी पांझरापोळ येथे गायींना चारा देऊन गोसेवा करण्यात आली. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना अन्नदान करण्यात आले. यावेळी रुग्णांसह नातेवाईकांनी लाभ घेतला. यावेळी अग्रवाल नवयुवक मंडळ, महिला मंडळ आदी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!