Type to search

जळगाव

योगेश कापसे खून प्रकरण; तिघांना जन्मठेपेची शिक्षा

Share

जळगाव । मानदाभाडी शिवारातील ढाब्याजवळ योगेश शिवराम कापसे यांच्यावर कुर्‍हाडीने वार करून खून केल्याप्रकरणी दाखल गुन्हयाच्या खटल्यात चौकशीअंती न्यायालयाने दोषी ठरवून मुरलीधर सपकाळे, तसेच त्यांचे पुत्र शांताराम सपकाळे, रविंद्र सपकाळे या तिघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी सुनावली.अन्य तिघा संशयीतांना दोषमुक्त केले.

घटनेची माहिती अशी की, 04 नोव्हेंबर 2015 रोजी डॉ. गजानन शिवराम कापसे हे त्यांचे चुलतबंधू विजय तापीराम कापसे सोबत त्यांच्या मानदाभाडी शिवारातील शेतात पिकाची पाहणी करण्यास गेले होते. नंतर सायंकाळी 05.30 ते सहा वाजेच्या सुमारास स्टार्च फॅक्टरीकडून ते येत असताना तेथील ढाब्याजवळ सुरू असलेले भांडण पाहण्यासाठी ते गेले. त्यावेळी त्यांचा भाऊ योगेश कापसे याला मुरलीधीर सपकाळे, शांताराम सपकाळे, रविंद्र सपकाळे हे शिवीगाळ करून मारहाण करत होते. भावास का मारता असे डॉ. गजानन कापसे यांनी विचारले असता संशयीत तिघे तसेच शांताबाई सपकाळे यांनी मध्ये पडू नको नाही तर तुम्हालाही मारून टाकू अशा शब्दात डॉ. गजानन कापसे तसेच विजय कापसे यांना धमकाविले. त्यानंतर तिघांनी योगेश कापसे यांच्यावर कुर्‍हाडीने हल्ला चढवित जखमी केले. योगेश कापसे यांच्या डोक्यावर, कपाळावर वार केल्याने रक्ताच्या थारोळयात योगेशचा मृत्यू झाला. जखमीला जामनेर रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.दरम्यान विजय हे खाली कोसळल्यानंतर संशयीत आरोपी वेगवेगळया दिशेने इतर साथीदार गजानान मालखेडे, अनिल शेळके यांच्या वाहनावर बसून पळून गेले. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला भादवी कलम 302, 323, 149,504 अन्वये संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

उपनिरीक्षक विशाल पुंडलिक पाटील यांनी तपास करून सहा जणांविरोधात दोषारोपपत्र जामनेर न्यायालयात सादर केले. हा खटला 11 सप्टेंबर 2017 रोजी सत्र न्यायालयात वर्ग होऊन खटल्याच्या चौकशीच्या कामकाजाला 18 जून 2019 पासून न्या. पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात सुरूवात झाली. सरकार पक्षातर्फे विठ्ठल येणे, मोतीराम श्रीपत भोई, राहुल मधुकर पाटील, डॉ. जयश्री पाटील, गजानन शिवराम कापसे, विशाल पाटील, राजू कापसे, विजय कापसे यांच्या साक्षी तपासण्यात आले. आज न्यायालयाने मुरलीधर सपकाळे, शांताराम सपकाळे, रविंद्र सपकाळे यांनी दोषी ठरविले. भादवी 302 सह 34 खाली दोषी धरून तिघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी 15 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. वसुल करण्यास येणारा दंड मयताची आई हिला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने केले. या खटल्यातील शांताबाई सपकाळे, अनिल शेळके, गजानन मालखेडे यांना दोषमुक्त केले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!