Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

शेतकर्‍यांच्या विम्यावर कंपन्यांना कोट्यवधींची कमाई

Share

जळगाव । प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांत शेतकर्‍यांचे नव्हे तर विमा कंपनीचे चांगभले झाले आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल 3,309 कोटी रुपयांची मलाई विमा कंपन्यांना मिळाली आहे. विम्याच्या प्रीमियमची रक्कम वाढत असताना लाभधारक शेतकरी मात्र कमी झाले आहेत.

केंद्र शासनाने 13 जानेवारी 2016 रोजी प्रधानमंत्री पीकविमा योजनेस मंजुरी दिली. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत शेतकर्‍यांऐवजी विमा कंपन्यांनाच या योजनेचा फायदा झाला आहे. सन 2016-17 मध्ये 3,948 कोटी प्रीमियम शेतकर्‍यांनी भरला. मात्र, भरपाई केवळ 1,890 कोटींची दिली गेली. 2,048 कोटींचा फायदा विमा कंपन्यांना झाला. सन 2017-18 मध्ये 3318 कोटी प्रीमियम शेतकर्‍यांनी भरला. भरपाई मात्र 2,617 कोटी मिळाली. 701 कोटींचा फायदा कंपन्यांना झाला. तीन वर्षांत मिळून 3,309 कोटींचा नफा शेतकर्‍यांच्या माध्यमातून विमा कंपन्यांना झाला.

दोन वर्षांत लाभधारक शेतकरी संख्याही वाढलेली नाही. सन 2016-17 मध्ये 109.2 लाख शेतकर्‍यांनी पीकविम्यासाठी अर्ज केला, त्यातील केवळ 27.5 लाख शेतकर्‍यांना लाभ मिळाला. सन 2017-18 मध्ये 87.6 लाख शेतकर्‍यांनी विम्यासाठी अर्ज केला, त्यातील 49.5 लाख शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळाला. सन 2018-19 मध्ये अर्जदार शेतकरी वाढले असले तरी लाभधारक शेतकरी कमी झाले आहेत. या वर्षी 95 लाख शेतकर्‍यांनी अर्ज केला, त्यातील 49 लाख शेतकर्‍यांनाच लाभ मिळाला. म्हणजेच या वर्षी 51 टक्केच शेतकरी पात्र ठरले.

नवीन पीकविमा योजना सुरु करताना 2016 मध्ये सरकारने दावा केला होता की, आधीच्या सर्व योजनांमधल्या सर्वोत्तम अशा सर्व गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत आणि त्याचवेळी आधीच्या योजनांमधील सर्व त्रुटी काढून टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात 1 टक्क्यापेक्षाही कमी शेतकरी या योजनेत आहेत. शेतकर्‍यांपेक्षा विमा कंपन्यांचे फायदे करुन देणारी ही योजना दिसत आहे.

तंत्रज्ञानाचा वापर शेतकर्‍यांना नाहीच
2016 पासून सुरु झालेला पीकविमा केवळ उत्पन्नातील घट एवढ्यापुरताच मर्यादित नसून पीक काढणीनंतर पिकाचे झालेले नुकसान, तसेच चक्रीवादळे, भूस्खलन, बिगरमोसमी पाऊस इ. स्थानिक पातळीवरील आपत्तीपासूनच्या संरक्षणासाठीही हा विमा आहे. पिकांच्या नुकसानीची स्थिती जाणून घेऊन विम्याच्या रकमेवर हक्क सांगण्याची प्रक्रिया जलद व्हावी, यासाठी सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा वापर यात केला. मात्र, त्याचा फायदा शेतकर्‍यांना किती मिळत आहे, हे एक कोडेच आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!