Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात मुसळधार : नद्या-नाल्यांना पूर

Share

जळगाव | देशदूत चमूकडून

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात शनिवार रात्रीपासून पाऊस अधुन-मधून मध्यम, जोरदार पावसाची रिपरिप रविवारी सकाळपर्यंत सुरू होती. मुसळधार पावसाचा जोर रविवारी कमी झाला असला तरी सोमवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील ५२ वर्षीय महिला पुरात वाहून गेली. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरु  होते. तर अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावासह तिन्ही  गावांचा संपर्क तुटला, अनेक घरांची पडझड झाली. उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पारोळा तालुक्यातील बोरी धरणातून ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांनी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करीत असल्याने नदीकाठच्या गावात कोतवालाद्वारे दवंडी पिटवून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव ते चांदवड नॅशनल हायवेचे रस्त्याचे काम सुरू असल्याने भडगाव रोडवरील बांबरूड (महादेवाचे) गावा जवळील तितुरनदीवरील कच्चा पुल वाहुन गेल्याने पाचोरा भडगाव गावाचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळे कपाशी, मका, ज्वारी, बाजरीसह आदी पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अहिरवाडी येथील ५२ वर्षीय महिला पुरात वाहून गेली 

रावेर – तालुक्यातील अहिरवाडी गावातून जाणार्‍या भिलाई व गंगापुरी नद्यांच्या उगमस्थानी जोरदार पाऊस झाल्याने, आलेल्या पुरात नदी ओलांडून जाणार्‍या तीन महिलांपैकी एक महिला पुरात वाहून गेल्याने गावात खळबळ उडाली आहे. अहिरवाडी गावातील फुकटपुरा भागातील रहिवासी शेगमबाई इतबार तडवी (वय-५२) ही महिला नसीब तडवी व बेबाबाई लहासे यांच्यासमवेत केळीचे घड वाहतुकीच्या कामाला गेली होती. सायंकाळी घरी परतल्यावर गावातून नदी ओलांडून फुकटपुरा भागातील घरी जातांना नदीला पूर असल्याने तिघे महिला एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडताना पुराच्या लाटेत तिन्ही वाहून जात असतांना, मागे असलेल्या असलम तडवी हिने दोघींचे जीव वाचवून बाहेर काढले मात्र शेगमबाई यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी पाहणी केली, तर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे अहिरवाडी येथे त्यांच्या सहकार्‍यासोबत शोध घेत आहे. (सविस्तर वृत्त पान ५ वर)

कळमसरेसह अनेक गावांचा संपर्क तुटला

कळमसरे – अमळनेर तालुक्यातील कळमसरेसह पाडळसरे बोहरे परिसरात व अमळनेर तालुक्यात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली असून ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. यात अनेक शेतांचे बांध व जलसंधारणची कामे फुटून शेतीसह शेतीपिकांना मोठा फटका बसला असून मोठे  नुकसान झाले वरील तिन्ही गावांचा संपर्क तुटला असून निम, तांदळी,बोहरे या गावांना जाणार्‍या रात्रीच्या बसेस मारवड येथे थांबून आहेत. त्यामुळे अनेक महिला व प्रवासी रस्त्यातच ताटकळत बसले असल्याने वाहक व चालक ही थांबून आहेत या घटनेची माहिती अमळनेरच्या तहसीलदार यांना कळमसरे, पाडळसरे येथील पत्रकारांनी दिली असता, अमळनेर नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान व तीन बंब घेऊन तहसीलदार ज्योती देवरे व प्रांत अधिकारी सीमा अहिरे, मारवडचे मंडळ अधिकारी बी.आर.शिंदे, तलाठी गौरव शिरसाट हे दाखल झाल्यानंतर घरे कोसळलेल्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करून कळमसरे पाडळसरे येथील ग्रामस्थांची भेट देऊन धीर दिला व प्रशासन आणि यंत्रणा आपल्या सोबत असल्याने घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये म्हणून जागृत केले. कळमसरे पाडळसरे येथे सात आठ घरे कोसळले असल्याने त्यात मात्र जीवित हानी झाली नाही.

सकल शेतीत तुडुंब भरल्याने  पिके पाण्याखाली आली आहेत. तर पाडळसरे, बोहरे, कळमसरेसह परिसरातील गावांच्या संपर्क तुटला आहे. गावातील अनेक घरात पावसाचे पाणी आत शिरले असुन, कळमसरे भिलाटी, दुर्गा नगर प्लॉटिंग येथे पावसाचे पाणी घरात शिरले असुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन अनेकांचे संसार हा उघडयावर आला आहे. जवळ पास १०-१२  घर ही पावसाच्या पाण्याने पडली आहे. कळमसरे गावाला पावसाच्या पाण्याच्या संपूर्ण वेढा असल्याने अमळनेर -शिरपुर बसही कळमसरे-शाहपुर रस्त्यावर उशिरापर्यंत उभी होती. तसेच अमळनेर-निम बस ही पाण्यात अडकली आहे. अचानक जणु काही ढगफुटी झाली कि काय? असा प्रश्न गावकरी करीत आहे. या आलेल्या पावसाने संपूर्ण शेती ही पाण्याखाली  आली असुन कपाशी, मका, ज्वारी, बाजरीसह आदि पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. ग्रामस्थानी नुकसान भरपाईची मागणी करीत, शेतीच्या पंचनामा करावा अशी मागणी शेतकरी वर्गाने तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्याकडे या वेळी करण्यात आली.

माळन नदीसह लहान मोठे नाले ओसंडून वाहिले

अमळनेर – शहरासह तालूक्यात आज दिवसभरात  पाऊसाने जोरदार हजेरी लावली विशेषतः तापी परिसरात ढगफूढी सदृष्य पाऊस झाल्याने परीसरातील माळन नदीसह लहान मोठे नाले ओसंडून वाहात होते तालूक्यात आज सरासरी १०० मिमि पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. त्यामूळे मारवड परिसरातील अनेक गावांचा जनसंपर्क तूटला होता तर मातीच्या घरांची पडझड होवून नूकसान झाले अमळनेर तालूक्यातील पांझरा परिसरातील मांडळ मूडी गावातही झालेल्या जोरदार पाउसाने  कळंबू गावातही  पावसाच्या पाण्याने तीन घरे पडले आहेत. यात गोरख बुधा पारधी,राजकोरबाई कौतिक  शिरसाठ,अशोक देविदास पारधी यांचे मातीच्या घरांचा समावेश आहे. यात त्यांची संसारोपयोगी वस्तूंचे नूकसान झाले. सूदैवाने कूठलीही जिवित हानी झाली नाही. महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महसूल प्रशासनाने सतर्क राहून तातडीच्या ऊपाययोजना केल्या. रात्री उशिरा पर्यंत महसूल अधिकारी या परिसरात असल्याने नूकसानिचा अंदाज समजून आला नाही तर बोरी धरणाचे ५ गेट उघडल्याने धरणातून ३०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सूरू होता त्यामूळे रात्री ऊशिरा पर्यंत बोरी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामूळे बोरी काठावरील गावकर्‍यांना महसूल प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे. दरम्यान शहरातही दूपारी २ वाजे पासून रात्री ऊशिरापर्यंत पाऊस मध्यम व जोरदार सूरू होता. त्यामूळे गणेश मंडळे ओस पडली होती तर शहरात सर्वत्र गटारी तूंबून रस्त्यांवर व सखल भागात पाणी साचले होते एकंदरीत आजच्या पाऊसाने तालूक्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत.

अंजनी नदीला मध्यम स्वरूपाचा पूर

एरंडोल- तालुक्यात  दुपारी पावसाने चौकार,षटकार मारत जवळपास सव्वा तास दमदार हजेरी लावली. पुन्हा रात्री पावसाने जोरदार आगमनाने नदी नाले वाहु लागले. यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला.त्यामुळे अंजनी नदीला मध्यम स्वरूपाचा पहिल्यांदाच पूर आला तसेच इतरत्र नाले ओढे सुद्धा प्रवाहित झाले आहेत. या पावसाचा खरीप पिकांना निश्चित फायदा होईल असे शेतकर्‍यानी सांगितले. दरम्यान रविवारपर्यंत अंजनी धरणात ३२ टक्के जिवंत पाणीसाठा झाला असुन सोमवारी वरुण राजाने केलेल्या दमदार बॅटिंगमुळे अंजनी धरणातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ होण्यासाठी मदत होऊ शकते. आतापर्यंत तालुक्यात ८९.२ टक्के पावसाची सरासरी झाली असुन सेंच्युरीकडे पावसाची वाटचाल होण्यास आजच्या पावसाची मोलाची भर पडणार आहे.

चोपडा शहर पोलीस स्टेशनला गळती 

चोपडा- येथील तहसील कार्यालयावर असलेल्या शहर पोलीस स्टेशनच्या इमारतीला पावसाळ्यात गळती लागलेली आहे. दररोज पडणार्‍या पावसामुळे गळतीचे प्रमाण वाढले असून ठाणे अंमलदार व कॉम्प्युटर विभागात पावसाचे पाणी छतातून खाली पडत आहे. पोलीस स्टेशनच्या इमारतीला गळती लागल्याने ठाणेअंमलदार कक्ष व कॉम्प्युटर विभागात पोलीस कर्मचार्‍यांना खुर्चीवर बसून काम करणे कठीण झाल्याने पोलीस कर्मचार्‍यांचे हाल होत आहेत. याबाबत चोपडा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाला अनेकदा पत्र व्यवहार करून देखील इमारतीची दुरुस्ती होत नसून दुर्लक्ष होत आहे.  स्वातंत्र्य पूर्व म्हणजे इंग्रजांच्या काळात दगडाच्या घडीव खांडकीत बांधण्यात आलेल्या प्रशस्त व भव्य अशा तहसील कार्यालयावर शहर पोलीस स्टेशनसाठी स्वतंत्र इमारत देण्यात आली असून तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन या दोन्ही इमारतीची देखभाल व दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. विशेष म्हणजे दोन्ही इमारती दगडी बांधकामाच्या असून छतावर मंगलोरी कौल बसविण्यात आले आहेत. प्रशस्त व भव्य अशा तहसील कार्यालयावरील शहर पोलीस स्टेशनच्या इमारतीला दरवर्षी पावसाळ्यात गळती लागत असते. यंदा देखील सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून इमारतीची दुरुस्ती झाली नसल्याने पोलीस स्टेशनला चांगलीच गळती लागलेली आहे. जिथे छताचे पाणी पडते तिथे पोलीस कर्मचार्‍यांना बादली किंवा भांडी ठेवावी लागत आहे. एव्हढेच नव्हेतर पोलीस स्टेशनची इमारतीच्या छतातून पाणी पडत असल्याने ठाणे अंमलदाराला टेबल खुर्चीवर बसणे कठीण झाले आहे. तसेच कॉम्प्युटर रूमला देखील गळती लागल्याने पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना ऑनलाईनची व प्रशासकीय काम करणे दुरापास्त झाले आहे. दररोज पडणार्‍या पावसामुळे पोलीस स्टेशनची इमारत जास्तच गळत असल्याने पोलीस कर्मचार्‍यांचे हाल होत आहेत. याबाबत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी व यापूर्वी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग चोपडा यांचेकडे अनेकदा लेखी पत्र व्यवहार केला आहे. परंतु शहर पोलीस स्टेशनच्या तक्रारीकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पर्यायी पूल पुरात वाहिला

पाचोरा – जळगाव ते चांदवड रस्त्याचे काम सुरू असल्याने भडगाव रोडवरील बांबरूड (महादेवाचे) गावाजवळील तितुर नदीवरील मुख्य पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी रहदारीला पर्यायी कच्चा पुल तयार केला होता. सांयकाळी ६ ते ७ च्या सुमारास परिसरात जोरदार पाऊस  झाल्याने हा कच्चा पुल वाहुन गेल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. यामुळे अनेक वाहने अडकून पडली आहे. अनेक प्रवाशी एस.टी.तसेच खासगी वाहनात अडकून पडले आहे.

अतिवृष्टीचा इशारा

जळगाव | हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यासह संपुर्ण राज्यभरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

येणार्‍या काही तासांत मुंबई, ठाणे, चंद्रपूर या भागात १०० मि.मी.पाऊस तर उर्वरीत महाराष्ट्रात २०० मि.मि. मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापैकी नागपूर, अमरावती, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव, अकोला व गडचिरोली या भागात अति मुसळधार म्हणजेच ३०० मि.मि.पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने धरण क्षेत्रासह नदी काठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागांत सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एक ते दिड तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चांगलीच दाणादाण उडाली. शहरातील उंच सखल भागातील रस्त्यांवर यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

पारोळा तालुक्यात दवंडीद्वारे जागृती

पारोळा – तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणाचे २ दरवाजे उघडल्याने धरणातून ९०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बोरी नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने बोरी नदीच्या काठावरील गावांना दवंडीद्वारे इशारा देण्यात आला असून गावकर्‍यांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दुसरीकडे कर्मचार्‍यांनाही सज्जतेच्या सूचना दिल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!