Type to search

जळगाव राजकीय

चोपडा शहराला २०२० मध्ये दोन दिवसाआड मिळणार पाणी!

Share

चोपडा | शहराची वाढीव लोकसंख्या लक्षात घेता शासनाने २०१८ मध्ये गुळ धारणावरून ६५ कोटीची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली असून, गुळ धरण ते जलशुद्धीकरण केंद्रा पर्यंत चौदा किलोमीटरची अंतराची पाईप लाईन टाकण्याचे पूर्ण झाले आहे.नवीन पाणी पुरवठा योजनेची उर्वरित कामे जलदगतीने सुरू आहेत. यंदा पावसाळा समाधानकारक झाल्याने गुळ धरण ६५ टक्के भरले आहे. त्यापैकी १५ टक्के पाणी साठा चोपडा शहरासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेची कामे सन- २०२० अखेर पूर्ण होऊन, शहराला दर दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल, अशी माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा चौधरी,गटनेते जीवन चौधरी यांनी देशदूतशी बोलतांना दिली.

चोपडा शहराच्या ६५ हजार लोकसंख्येसाठी १९९० मध्ये तापी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती.त्यात पाईप लाईन व कठोरा पंपिंग स्टेशनसह १०.५० दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश होता.परंतु आज शहराची लोकसंख्या ६५,००० असून २०५० मध्ये १,३५,००० हजार पर्यंत पोहचणार आहे.लोकसंख्येनुसार दरडोई १३५ लिटर पाणी देणे गरजेचे आहे.यासाठी २०१७ मध्ये शासनाकडे नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला.त्यास २०१८ मध्ये शासनाची मंजुरी मिळाली. योजना लवकर कार्यान्वित होणेसाठी जलदगतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन पाणी पुरवठा योजनेला २३ मे २०१८ च्या सर्वसाधारण सभेत मान्यता घेऊन कार्यरंभ आदेश देण्यात आले.योजने संदर्भात तत्कालीन मुख्याधिकारी बबन तडवी यांना शासन निर्णयाचे योग्य प्रकारे आकलन न झाल्याने काम सुरू करणेस ऑक्टोबर महिना उजळला दरम्यान मुख्याधिकारी तडवी यांची बदली झाली अविनाश गांगोडे नवीन मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले.नगराध्यक्ष मनीषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी यांनी पाणी पुरवठा योजनेचा शासनस्तरावर पाठपुरावा केल्याने वनविभागाची परवानगी मिळाली त्यामुळे योजनेच्या कामाला गती मिळून एप्रिल महिन्यात गुळ धरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १४ किलोमीटर पाईप लाईन टाकण्यात येऊन पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

गेल्या वर्षी पावसाळा खूपच कमी झाल्याने तापी नदीला पूर आलाच नाही.नदीपात्र कोरडे ठाक असल्याने गुळ धरणातून आवर्तन सुटले तरी सर्व पाणी नदीत झिरपल्याने नगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापन कोलमडले. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली नवीन कूपनलिका करून व टँकरने पाणी पुरवठा करून शहराची तहान भागविण्याचा प्रयन्त केला.टंचाईच्या काळात जनतेने देखील नगरपालिका प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले एप्रिल महिन्यात गुळ धारणावरून शहराला पाणी पुरवठा झाला नसता तर भीषण टंचाईला तोंड द्यावे लागले असते.गुळधरणातील पंम्पिंग स्टेशनला फक्त आठ तास वीज पुरवठा होतो परंतु शहराला पाणी पुरवठ्यासाठी किमान वीस तास वीज पुरवठा होणे गरजेचे आहे.अशा कठीण काळात नगरपालिकेने दोन जनरेटर भाड्याने घेऊन ऐन कडक उन्हाळ्यात ४५ अंश डिग्री तापमानात देखील तरंगते पंप वापरून शहराला पाणी पुरवठा केला.हतनूर धरणातून एप्रिल महिन्यानंतर आवर्तन सोडणे पाच वर्षापासून बंद असल्याने गुळ प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.यंदा पावसाळा चांगला झाल्याने गुळ प्रकल्पात ६५ टक्के पाणी साठा आहे त्यापैकी १५ टक्के पाणी शहरासाठी आरक्षित आहे. तसेच नवीन पाणी पुरवठा योजनेची प्रगतीपथावर असलेली कामे २०२० अखेर पूर्ण होतील.परंतु जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने वापर केल्यास एक दिवसाआड पाणी पुरवठा होऊ शकतो अशी माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा चौधरी व गटनेते जीवन चौधरी यांनी दिली.

राज्यातील नगरपालिकांना शासनाने वैशिट्यपूर्ण कामांसाठी व विशेष रस्त्याच्या कामांसाठी अनुदान दिले आहे. यात चोपडा पालिकेला वैशिट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेत धरणगाव रस्त्यावरील महात्मा गांधी उद्यानाच्या विकासासाठी १ कोटीचा निधी तर विशेष रस्ता अनुदान योजनेत जुना शिरपूर रोडवरील हरेश्वर मंदिराच्या रस्त्याच्या कामासाठी दीड कोटीचा निधी मंजूर झाला असून,त्याबाबत चे आदेश पालिकेला प्राप्त झाले आहेत. या विशेष अनुदानातून महात्मा गांधी उद्यान व हरेश्वर मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती नगराध्यक्षा मनीषा चौधरी व जीवन चौधरी यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!