Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या राजकीय

गिरीश महाजनांकडे निवडणुकीची जबाबदारी!

Share

मुख्यमंत्र्यांनी केली जामनेर येथे घोषणा
जामनेर | आमचे दैवत हे जनता जनार्दन असून समृद्ध महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महाजनादेश यात्रा असून जनादेश घेण्यासाठी मी आलो आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर टाकणार असून जामनेरमध्ये ते फक्त निवडणूक अर्ज भरण्यासाठी व निवडणूक झाल्यावर विजयाची पावती घेण्यासाठी येतील. राज्यात भाजपाची सत्ता आणण्यासाठी मी गिरीशभाऊंना घेऊन जातो. मतदारसंघात ते नसले तरी जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठिशी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जामनेर येथे महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जाहीर सभेत केले.

जामनेर येथे महाजनादेश यात्रेसाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. व्यासपीठावर राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीश महाजन, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, खा. उन्मेश पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, आ. स्मिता वाघ, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष खेवलकर, राजेंद्र फडके, गुरुमुख जगवाणी, आ.चंदूभाई पटेल, अशोक कांडेलकर, आ.राजूमामा भोळे, नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन, सभापती सौ. नीता पाटील, जे.के.चव्हाण, सभापती रंजनाताई वाघ, शिवाजी सोनार, गोविंद अग्रवाल, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, छगन झाल्टे, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, दिलीप खोडपे, विद्याताई खोडपे, शंकर मराठे, डॉ. प्रशांत भोंडे, महेंद्र बाविस्कर, शरद पाटील, अतिश झाल्टे, शेंदुर्णी नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्ष चंदा अग्रवाल, सरपंच रामेश्वर पाटील, किशोर पाटील, रमेश नाईक ,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

यावेळी जामनेर नगर परिषदेच्या वतीने सौ साधना महाजन , उपनगराध्यक्ष अनिस शेख तसेच सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वागत केले. या सभेत राष्ट्रवादीचे योगेश भडांगे , पंढरीनाथ वाघ, यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री ना. फडणवीस पुढे म्हणाले की हे सरकार शेतकर्‍यांचे सरकार असून शेतकर्‍यांसाठी आपण सर्वात मोठे कर्जमाफीची योजना राबवून कर्जमुक्त केले. पंधरा वर्षात २० कोटी मिळाले आपण पाच वर्षात पन्नास हजार कोटी दिले असे सांगून ते म्हणाले की पाच वर्षात जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या माध्यमातून जे प्रकल्प पंधरा वर्षात पूर्ण झाले नाही ते पाच वर्षात पूर्ण झाले. तीस हजार कि.मी.चे ग्रामीण रस्ते करण्याचे रेकॉर्डब्रेक काम आपल्या सरकारने केले. दहा हजार किलोमीटरचे राज्यमार्ग करून रस्त्याचे जाळे राज्यभर विणले गेले. असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की १८ हजार गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण केल्या. पाच वर्षात सर्व समस्या संपल्या असा दावा मी करणार नाही परंतु पंधरा वर्षात त्यांना जे जमले नाही ते पाच वर्षात विविध विकास कामे आपण पूर्ण केली. ते पुढे म्हणाले की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली बलशाली भारत निर्माण होत असून ३७० कलम रद्द केल्याने ७० वर्षापासूनचा हृदयातील काटा निघाला आहे. आता काश्मीरला भारतापासून कोणी तोडु शकत नाही पाकिस्तानचे मनसुबे आता संपले असल्याचे ते म्हणाले. मोदींच्या नेतृत्वाखाली गावागावात प्रत्येक घराघरात गॅस ,रोजगार ,असे विविध संकल्पना केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत असून अतिक्रमण नियमित करून पक्या घरांसाठी त्यांना अडीच लाखाची मदत देऊन २०२१ पर्यंत महाराष्ट्रातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी या जनादेश यात्रेच्या निमित्ताने तुमचा आशीर्वाद घेऊन मी मुंबईला जात आहे असेही ते शेवटी म्हणाले.

विकास कामांसाठी ३० कोटीचा निधी द्या : ना. महाजन
शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी भरभरून निधी आतापर्यन्त दिला आहे . स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा निधी आपण शहर व तालुक्याच्या विकासासाठी आणला. परंतू राहिलेल्या विकास कामांसाठी आणखी तीस कोटी रुपयांची गरज असून ३० कोटी रुपयांचा थोडाफार वाद असून ३० कोटी रुपये निधी मिळाल्यास शहरातील विविध विकास कामे पूर्ण होतील. जामनेर नगरपालिकेत संपूर्ण २८ नगरसेवक आपलेच असून विरोधक नावालाही शिल्लक नाही. म्हणून आपण आम्हाला झुकते माप देऊन निधी द्यावा. अशी विनंती स्थानिक नेते , राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या सभेच्या माध्यमातून केली.

महाराष्ट्राची संपूर्ण तिजोरी गिरीश भाऊंसाठी खुली-मुख्यमंत्री फडणवीस
गिरीश भाऊ हे सरकारचे संकट मोचक असून सरकारचे आरोग्यदूत ही आहेत .कोल्हापूर, सांगली मध्ये दहा फूट पुराच्या पाण्यात जाऊन लोकांना वाचवणारा एकमेव नेता म्हणजे गिरीश महाजन. केरळमध्ये जाऊन त्यांनी आपदग्रस्तांना मदत केली. पहिला अरबी समुद्र मी मुंबईत पहिला आणि जामनेर मध्ये आल्यावर जनतेचा समुद्र ना. महाजनांच्या पाठीशी असल्याचे पहात आहे. गिरीश भाऊ यांचे व्यक्तिमत्व आगळे -वेगळे असून ३० कोटी रुचा काहीतरी वाद असल्याचे ते म्हणाले, गिरीष भाऊ तूमच्यासाठी ३० कोटीच काय महाराष्ट्राची संपूर्ण तिजोरी तुमच्यासाठी खुली आहे. असे ना . महाजनां विषयी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्तुतीसुमने उधळताच जनतेने प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्यांच्या वक्तव्याचे स्वागत केले.

आकाशवाणीपासून महाजनादेश यात्रेचा ‘रोड शो’
महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुक्रवारी ३.४५ वाजता जळगाव शहरात आगमन झाले. महाजनादेश यात्रेच्या रथावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील आदी विराजमान होऊन आकाशवाणी चौकापासून ‘रोड शो’ करण्यात आला. आकाशवाणी चौक ते सागरपार्क मैदानापर्यंत महाजनादेश यात्रा काढण्यात आली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या रथामागे १०८ ही आपतकालीन वैद्यकीय सेवा यासह सुरक्षेच्या दृष्टीने ३० गाड्यांचा ताफा होता. शहरात खोटेनगर, प्रभात चौक, आकाशवाणी चौक येथे भाजपा पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर पुष्पवृष्टी केली.

शहरात मुख्य चौकात स्वागत कमानी
शहरात खोटेनगर, प्रभात चौक येथे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. आकाशवाणी चौकात ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ अशी भव्य कमान उभारली होती. मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर पिपाणी,सांबूळ आणि पेटी या वाद्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. आकाशवाणी चौकात महापौर सीमा भोळे, मनपा गटनेते भगत बालाणी, सभागृहनेता ललित कोल्हे यांच्यासह भाजपा पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. प्रभात चौक, आकाशवाणी चौकात फटाक्यांची आतबाजी केली. सागरपार्क मैदान सभेच्या गेटवर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रवेश गेट तयार करण्यात आले होते. सभास्थळी येणार्‍या प्रत्येकाची तपासणी करुनच प्रवेश दिला जात होता.

मेगागळती थांबविण्याची चिंता करा; विरोधकांना टोला
जळगाव | देशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित आहे. निवडणुकांमध्ये विकासाच्या मुद्दयावर केलेल्या कामांवरुन जनतेने मूल्यमापन केले आहे. त्यामुळे विरोधकांकडे आता कुठलाही मुद्दा शिल्लक नाही. भाजप हा विकासाचा पक्ष असल्याने मोठी मेगाभरती सध्या सुरु आहे. अनेक नेते पक्षात येण्यास इच्छुक आहे. त्यामुळे विरोधकांनी मेगाभरतीपेक्षा पक्षातील मेगागळती थांबविण्याची चिंता करावी, असे खुले आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले.

महाजनादेश यात्रेच्या दुसर्‍या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात आले होते. यावेळी जळगावातील सागरपार्क येथे आयोजित सभेवेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन, आ. एकनाथराव खडसे, खा.उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आ. राजुमामा भोळे, आ.हरिभाऊ जावळे, आ. चंदुलाल पटेल, आ.स्मिता वाघ, आ. सुरजितसिंग ठाकूर, ना. गुरुमुख जगवाणी, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील,महापौर सीमा भोळे यांच्यासह मनपा पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मागील ५ वर्षात केलेल्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी ही यात्रा काढली आहे. खान्देशातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी १६ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले असल्याने सर्व प्रकल्पांच्या कामाला लवकर गती येणार आहे. खान्देशने वर्षोनुवर्ष आम्हाला साथ दिली आहे. त्यामुळे आमच्यावर त्यांचे कर्ज आहे. त्यांच्यावरील उतराईसाठी प्रयत्न करून गतवैभव मिळून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आ. खडसेंचे भाषणच नाही
भाजपतील ज्येष्ठ नेते आ. खडसे हे सभा सुरु होण्याच्या अगोदर जवळपास तास अर्धातास पासून आले होते. व्यासपीठावर देखील बसून होते. यावेळी आ. एकनाथराव खडसे यांच्या भाषणाची कार्यकर्ते वाट पाहत होते. सुरुवातीला आ. भोळे यांनी प्रस्ताविक केले. त्यानंतर ना. महाजन व शेवटी मुख्यमंत्र्यांचे भाषण होवून सभा संपली. आ. खडसे यांचे भाषण न झाल्याने समर्थक नाराज झाले. मुक्ताईनगर मतदार संघात महाजनादेश यात्रेचा एकही कार्यक्रम नसल्याने कार्यकर्ते आश्‍चर्यचकीत झाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!