Type to search

जळगाव

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी केली कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांना मदत

Share

जळगाव (प्रतिनिधी) –

कोल्हापूर, सांगलीमध्ये आलेल्या पुरांमुळे मोठ्या प्रमाणात स्वच्छता, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मोठी वित्तहानी झाली आहे. त्यामुळे विविध प्राथमिक गरजांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विद्यार्थी कोल्हापूर व सांगलीमधील पुरग्रस्तांच्या मदतीला गेले होते. आठ दिवसात त्यांनी आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक सलोखासाठी विशेष प्रयत्न केले.

यवतमाळ जिल्ह्यातील प्रितम नानवटे, प्रणय शेंडे, स्मिता ताठेवार, गोपाल गोफणे, चंदू भिसे, वाशिम जिल्ह्यातील भिकेश भगत, गोरखपूर येथील आखिक सिद्दीकी, केरळमधील झिष्णू मोन पी या विद्यार्थ्यांनी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.

या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात जावून स्वच्छता अभियान, बाधित घरांमधील लोकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यवतमाळ येथील सावित्रीबाई ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयातील टिम बरोबर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी मदतकार्य केले.

प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत विविध खेळ खेळून त्यांचे मनोबल वाढविले. कोल्हापूरसोबतच सांगली जिल्ह्यातील सावळवाडी, माडवाडी, हरीपूर, सिद्धार्थनगर, कवटेगुलंद, कवटेपिरंद, जयसिंगपूर, जुनेखेडे, नवेखेडे, बोरगाव याठिकाणी या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून संसारपयोगी साहित्यांमधील वाया गेलेले व उपयोगी साहित्यांची विभागणी करून घरातील गाळ, पाणी बाहेर काढण्यास मदत केली.

13 गावांना पिण्याचे पाणी पोहचविले

महापूर असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालेले असताना घशाला मात्र

कोरड अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात शुद्ध पाणी मिळेनासे झाले. अन्न पाण्यावाचून गावकऱ्यांना उपाशी रहावे लागत होते. दरम्यान दररोज 10 हजार लिटर पाणी पोहचविण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले. यात घालवाड, मुकजाड, शितभटा, आवटवाडा, शिर्टी, आलस, कुरंदवाडा, कुंटवाडा, कोठर्डी, अर्जूनवाडा, चिंचवा, उदगाव, शिरोड या गावांना शुद्ध पाणी पुरविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पाण्यासाठी वादाचे प्रसंगही घडले त्यावर मात करीत त्यांनी आपले समाजकार्य सुरूच ठेवले.

प्रशासनालाही केले सहकार्य

कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्तांना शासनासह काही सामाजिक संस्थांकडुन मदतीचा ओघ सुरू आहे. मदत वाटपाठिकाणी झुंबड उडून सामाजिक अशांततेचा प्रश्न निर्माण होत असताना गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी शासन व नागरिकांमध्ये समन्वय राखण्यासाठी सहकार्य केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!