Type to search

जळगाव

14 भूमिपुत्रांचा सपत्नीक गौरव

Share

जळगाव । कंपनीचे शेती, शेतकरी, पाणी यांच्याशी अतूट नाते असून करार शेतीच्या माध्यमातून हजारो शेतकर्‍यांपर्यंत नवतंत्रज्ञान पोहोचले आहे. या तंत्रज्ञानाचा वापरासह, अनुभवाच्या आधारे आर्थिकसुबत्ता आणणारे आणि सर्वाधिक कांदा उत्पादन घेणार्‍या 14 भूमिपुत्रांचा सपत्नीक स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार देऊन गौरव होणे, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. पुढील वर्षापासुन हा पुरस्कार तीन शेतकर्‍यांना दरवर्षी दिला जाईल आणि पुरस्काराची रक्कम वाढविली जाईल असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. दरम्यान श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या व्यक्तीमत्वानुसार पुरस्कारार्थींचे कार्य बलदंड आहे असा गौरव कविवर्य ना. धों. महानोर यांनी केला.

कराराची शेती व सूक्ष्मसिंचनासह आधुनिक कृषी उच्च तंत्रांचा वापर करून अनेकविध कृषी प्रयोगपद्धतींद्वारे बहुमोल योगदान व लक्षणीय उत्पादन घेणार्‍या भुमीपूत्रांचा आणि त्यांच्या सौभाग्यवतींचा स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कविवर्य ना. धों. महानोर, ज्योती जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजीत जैन, शोभना जैन, विपणन प्रमुख अभय जैन, एस. व्ही. पाटील, जैन फार्मफ्रेशचे कार्यकारी संचालक सुनील देशपांडे, सुनील गुप्ता, के. बी. पाटील, गौतम देसर्डा, डॉ. अनिल ढाके, डॉ. बालकृष्ण यादव यांच्यासह सन्मानित करण्यात येणारे 14 भुमिपूत्र सपत्नीक उपस्थीत होते. करार शेती, प्रक्रिया उद्योग, कंपनीची सद्यस्थिती व पुढील दिशा याबाबत भुमिपूत्रांशी संवाद साधताना अशोक जैन म्हणाले की, सध्या करार शेतीला भविष्यात खूप मोठी संधी आहे. कंपनीने नव्याने उभारलेल्या मसाला प्रक्रिया उद्योगाला मिरची, आले, हळद, जिरे, धने यांची मोठ्याप्रमाणावर आवश्यकता आहे. शिवाय फळे, भाजीपाला यासह पेरू, टोमॅटो, केळी यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.

आपण बलदंड शेतकरी – ना.धों.महानोर
श्रद्धेय डॉ. भवरलालजी जैन व ज्यांच्या नावाने पुरस्कार दिला गेला त्या स्व. सौ. कांताई यांची आठवण काढत ना. धों. महानोर म्हणाले की, शेतीचे अर्थशास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थापन करावे. शेतीशी संवाद साधा. ती आपल्याला समृद्ध करते. कृतज्ञतापूर्वक काळ्या आईची सेवा केली तर ती विश्वाचे पोट भरते. मी शेतीवर कविता केल्या त्यामुळे जगभर पोहचलो. याच धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधनात्मक पिकपद्धती वापरून सक्षम व्हावे असे आवाहन करून पीकपद्धतीत फेरपालट करण्याचा सल्लाही कविवर्य महानोर यांनी दिला. काही वेळा जीवनात संघर्षाचा काळ येतो. चंद्र, सूर्यालासुद्धा ग्रहण लागते आपण तर मानव आहोत. आपल्याला संघर्ष अटळ आहे. मात्र आपण बलदंड शेतकरी असल्याने त्यावर मात करू शकतो असाही विश्वास त्यांनी जागविला.

जैतपूर येथील आदिवासी शेतकरी बांधवांनी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा तीरकमान देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने सन्मान केला. आरंभी प्रास्ताविक गौतम देसर्डा यांनी केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन व कांताई यांच्याविषयी विचार प्रकट केले. डॉ. अनिल ढाके यांनी आभार मानले. खंडवा येथील लक्ष्मीनारायण मांगीलाल सामडिया यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराने सन्मानित शेतकरी
जैन तंत्रज्ञानासह करार शेतीतुन पांढरा कांदाचे उत्पादन घेऊन समृद्धी आणणार्‍या 14 भुमिपूत्रांचा सपत्नीक स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये भाऊसाहेब काशिनाथ शेलार (ऐंचाळे जि. धुळे), सुभाष प्रभाकर देसाई (चोपडा जि. जळगाव), प्रविण झुलाल पाटील (खर्डी जि. जळगाव), साहेबराव हिलालसिंग इंगळे (वर्णा जि. बुलढाणा), राजेंद्र सुधाकर चौधरी, रविंद्र शामराव महाजन, मोहन लक्ष्मण महाजन, देवेंद्र रामदास चौधरी (सर्व अहिरवाडी, जि. जळगाव), प्रमोद पुंडलीक पाटील (तर्‍हाड जि. धुळे), नरसई सजन पाटील (दामडदा जि. नंदुरबार), ज्ञानेश्वर भाऊराव पाटील (विखरण, जि. धुळे), शरद तुळशीराम चौधरी ( नशिराबाद जि. जळगाव), दिपक दत्तू महाजन (कर्जोद जि. जळगाव) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात नशिराबाद येथील गणेश ज्ञानेश्वर पाटील यांनी वडिलांच्या वतीने पुरस्कार स्विकारला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!