Type to search

जळगाव

पावसाच्या विश्रांतीनंतर निंदणीसह शेतीकामांना मजुरांची ‘वानवा’

Share

जळगाव । जून महिन्यात जेमतेम हजेरी लावून पावसाने खंड दिला होता. त्या नंतर जुलैच्या मध्यंतरी व अखेरच्या पावसाने कोमेजणार्‍या रोपांना दिलासा मिळाला होता. मात्र जुलैच्या शेवटच्या आठवडयापासून रिमझिम पावसाने तब्बल 10 ते 12 दिवस सवड दिली नाही. गेल्या तीन चार दिवसांपासून बर्‍यापैकी पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात निंदणीसह अन्य कामांना वेग आला आहे. यामुळे मजुरांची वानवा जाणवत असून वाढत्या मजुरीच्या दरामुळे बळीराजा हतबल झाला आहे.

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात सोयाबीन ,कपाशी व तुर आदी वाणांची लागवड उशिरा करण्यात आली. त्यात पावसाने जून महिन्यातच तब्बल 10 ते 12 दिवसांचा खंड दिला. त्यानंतर जुलैत थोडाफार प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने काही अंशी पेरण्या घाईघाईने उरकण्यात आल्या. पुन्हा काही दिवसांचा खंड पडल्याने पिके कोमेजण्याच्या मार्गावर होती. जुलै अखेरच्या सततच्या पावसामुळे ग्रामीण भागात कपाशी व सोयाबीन पीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले, तर काही ठिकाणी पाणी साचल्याने कामे खोळंबली होती.

मजुरांच्या वाहतूक खर्चामुळे शेतकरी बेजार
पुर्वी गावातून पायी शेतापर्यंत मजूर जात होते. मात्र गेल्या दोन वर्षात मजुराच्या वाहतुकीसाठी ऑटो रिक्षा, मालवाहू वाहन आदीची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागते. काही ठिकाणी सकाळी 11 वाजेनंतरच महिला मजूर शेती कामावर निघत असल्याने गावापासून शेतापर्यंत मजुरांच्या वाहतुकीचा 300 रूपये प्रति दिवस खर्चही शेतकर्‍यांना करावा लागत असल्याने पिकांवर किटकनाशके फवारणी, कोळपणी वा निंदणीसह शेतकर्‍यांना उत्पादन येण्याअगोदरच मोठया या अतिरिक्त खर्चाला सामोर जावे लागत आहे.

मुकादमाची मनधरणी
जुलैच्या शेवटच्या आठवडयापासून सततच्या रिमझिम पावसामुळे सोयाबीन व कपाशीसह अन्य पिकांमधे निंदणी न झाल्याने मोठया प्रमाणावर तण वाढले होते. गेल्या कोळपणी झाल्यानंतर लगेच निंदणी करावी लागत असल्याने महिला मजुरांची मागणी वाढती आहे. महिला मजुरांची टंचाई असल्याने 10 ते 15 महिलांचा जत्था तयार करून त्यांना शेती कामासाठी उपलब्ध करून देणार्‍या मेटकरी अथवा मुकादमाला प्रति महिला मजुरामागे 20 ते 50 रूपये द्यावे लागत आहे.

मजुरीच्या दरात वाढ
प्रत्येक गावात महिला मजुरांना निंदणी कामासाठी त्यांच्या मुकादमास शेतकर्‍यांना सल्ला मसलत करून अगोदरच सांगावे लागते. कोळपणीसाठी संपूर्ण संचासाठी पूर्वी 900 ते 950 रोज द्यावा लागत होता तो आज 1100 ते 1200 रूपये द्यावे लागतात अन्यथा मजूर मिळत नाही. कोळपणी नंतर लगेच पिकांच्या आजूबाजूस राहिलेल्या गवत काढणीसाठी महिलांची मजूरी देखिल पूर्वी 200रूपये होती ती आजमितीस काही ठिकाणी 250 ते 300 तर कपाशीवर किटकनाशक फवारणीसाठी 500च्या ठिकाणी 650 रूपये रोजाने तर खते देण्यासाठी पूर्वी 50 रूपये गोणी ऐवजी आता 60 ते 70 रूपये मजूरी द्यावी लागत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!