कामे खोळंबल्याने आ.भोळेंना विधानसभा जड जाण्याची चिन्हे

आचारसंहिता काळात कामे मार्गी न लागल्यास ओढवू शकतो रोष

0
जळगाव । महापालिका निवडणुकीच्या प्रचारात दोनशे कोटींचा निधी आणून शंभर दिवसात जळगावचा कायापालट करेल, कामे झाली नाहीत तर विधानसभेसाठी मते मागायला येणार नाही, अशी रोखठोक भूमिका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मांडली होती. मात्र हीच घोषणा आमदार सुरेश भोळे यांच्या अंगाशी येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. शंभर कोटीच्या निधीतील प्रस्तावीत कामांसह अनेक महत्वाची कामे आचारसंहितेमुळे रखडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या दरम्यान मिळणार्‍या काळात जर कामे मार्गी लागली नाहीत तर मात्र आमदारांना आगामी विधानसभा निवडणूक कठीण जाण्याची चिन्हे आहेत.

आचारसंहिता जाहीर होताच महापालिकेच्या मोठ मोठ्या प्रकल्पांना खोडा बसला. गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक बाबीत अडकलेली ही कामे आचारसंहिता लागल्यापर्यंत मागी लागू शकली नाही. शंभर कोटीनिधीची कामे प्रस्तावित आहेत मात्र, तिही मार्गी लागू शकलेली नाही. मल्लनिस्सारण प्रकल्पही पावसाळ्यानंतरच सुरू होणार आहे. स्वच्छतेच्या एकमुस्त ठेक्यावरून वादंग उठला असून तोही अजूनपर्यंत मार्गी लागलेला नाही. त्यामुळे कचरा संकलनासाठी आलेली वाहने गेल्या महिनाभरापासून महापालिकेत धूळखात आहेत. त्यातच शिवाजी नगरपूलाच्या उद्घाटनात घाई करून पर्यायी व्यवस्था न करता केवळ काम आपल्या काळात दाखविण्यासाठी धडपड म्हणून कामोच उद्घाटन आटोपूण हा पूल पाडण्यास सुरूवात झाल्याचा आरोप सामन्यांमधूनही होत आहे. पर्यायी रस्त्या नसल्याने रोजच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर असल्याने परिस्थिती अधिकच बिकट आहे. डीआरएम यांनीही उद्घाटामुळे आम्हाला काम सुरू करावे लागले असे ताशेरे ओढल्याची माहिती आहे. अशा स्थितीत नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर रोष हा आगामी निवडणुकांमध्ये समोर येण्याची चिन्हे आहेत.

जळगावच्या जागेचा होईल गुंता, युतीमुळेही अडचणी वाढणार
कामे खोळंबल्याचा विषय असतानाच आगामी निवडणुकांमध्ये युतीची घोषणा झाल्याने जळगावच्या जागेचा प्रश्न उद्भवू शकतो, अशा स्थितीत आमदार भोळे यांच्यासमोर ही एक मोठी अडचण असेल असेही जाणकार सांगतात. त्यामुळे आमदार भोळेंपुढे काय पर्याय असू शकतात याची चर्चा आताच रंगू लागलेली आहे. शिवाय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शंभर दिवसात दिलेले आश्वासन पाळले नसल्याची टीका विरोधकांकडून होत आहेच शिवाय सामन्यांमधूनही काहीसा नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. अशा स्थितीत आगामी निवडणूक ही आमदार भोळेंसाठी तेवढी सोयीची ठरणार नाही, असे एकंदरीत चित्र आहे. त्यातच गेल्या महिन्याभरात आमदार भोळेंच्या विरोधात एक मोठा गट तयार झाला असून जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप या गटाकडून वारंवार झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सांभाळणेही मोठा गहन प्रश्न आगामी निवडणुकांमध्ये असेल.

LEAVE A REPLY

*