Type to search

जळगाव

समावेशक शिक्षणातून दिव्यांग विद्यार्थ्यांचा वाढला टक्का

Share

पंकज पाचपोळ
जळगाव । राज्य शासनातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार्‍या समावेशक शिक्षण (इनक्लूजींग एज्युकेशन) प्रकल्पांमुळे प्राथमिक शिक्षणाच्या मुळ प्रवाहात येणार्‍या दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. समुपदेशनासोबतच उपचार, थेरपीच्या निरनिराळ्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे आजमितीस जिल्ह्यातील 1 हजार 832 शासकीय प्राथमिक शाळांमधून 5 हजार 330 विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत.

दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुळ प्रवाहात यावे, यासाठी राज्यशासनाने जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत समावेशक शिक्षण हा प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पांतर्गत व जिल्हाभरातील प्राथमिक शाळांमध्ये असलेले दिव्यांग विद्यार्थी शिक्षणात अधिक रमावेत या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येतात. दिव्यांग विद्यार्थी एकटा शाळेत येवू शकत नसेल तर त्यासाठी मदतनीस भत्ता देण्यात येतो. सोबतच शेजारच्या गावातून शाळेच्या ठिकाणी येणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देखील देण्यात येतो. त्यासोबत या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण अनुदान देखील देण्यात येते.

थेरपी कक्षाची स्थापना
या उपक्रमांतर्गत दिव्यांगांचे 21 प्रकार करण्यात आल्या आहेत. या 21 प्रकारच्या दिव्यांगांवर उपचार व्हावेत व आपल्या व्यंगामुळे त्यांच्या मनात शाळेत जायची भिती वाटू नये, या उद्देशाने चिंचोलीजवळील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र थेरपी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या थेरपी कक्षात सर्व प्रकारच्या व्यंगावर जाणकार थेरपीच्या माध्यमातून थेरपी देण्यात येते, यासाठी लागणारी अत्याधुनिक साधने देखील शासनातर्फे पुरविण्यात आली आहे. या थेरपी केंद्रात जवळपास 388 विद्यार्थी थेरपी घेतात. यासोबतच दिव्यांगावर करण्यात येणार्‍या वैद्यकीय उपचारासाठी देखील या कक्षाच्या माध्यमातून मदत केली जाते.

दरमहिन्याला प्रशिक्षण
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी नेमण्यात येणारी विशेष शिक्षक, पालक, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख तसेच विशेष साधन व्यक्ती यांच्यासाठी शासनाच्या माध्यमातून दरमहिन्याला विशेष अश्या प्रशिक्षणाची सोयी देखील करण्यात येते. या प्रशिक्षणात विविध पातळींवर प्रशिक्षण देण्यात येवून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थी शिक्षणाच्या मुळ प्रवाहात कसे येतील, यासाठी प्रयत्न केले जातात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!