Type to search

जळगाव

पंढरी सोडून पांडुरंग येतात शेंदुर्णीत

Share

शेंदुर्णी, ता.जामनेर। दिग्विजय सूर्यवंशी

आषाढी एकादशीला महाराष्ट्रातील तमाम वारकरी पांडुरंगाच्या पंढरीत जात असतात. परंतु पांडुरंग काही क्षण पंढरी सोडून खान्देशाची पंढरी असलेल्या शेंदुर्णीत येतात आणि विठ्ठल भक्तांना दर्शन देतात, अशी विठ्ठल भक्तांची श्रध्दा आहे.

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी तेली समाजातील धावडा (जि. औरंगाबाद ) येथे 1714 साली मोलमजुरी करणार्‍या गरीब कुटुंबात संत कडोबा महाराज जन्माला आले. वयाच्या तिसर्‍या वर्षीच महाराजांचे पितृछत्र हरपले. त्यांच्या मातोश्री वाटूबाई या शेंदुर्णी ता. जामनेर येथे माहेरी राहायला आल्यात. संत कडोबा हे त्यांचे 21 वे अपत्य असल्याचे सांगितले जाते. लहानपणापासून संत कडोबांना विठ्ठल भक्तीची ओढ लागली. भक्ती मार्गाला लागून सदा सर्वकाळ पंढरीच्या पांडुरंगाचा मुखी जयघोष करीत आपली जीवन चर्चा सुरु होती.

आपल्या भक्ती मार्गात कुणीही अडथळा आणू नये यासाठी उपजीविकेसाठी ते रोज येथून दहा बारा किलोमीटर अंतरावरील अजिंठा डोंगरातील रुद्रेश्वर मंदिरात ध्यानसाधना करीत. त्यानंतर घरी परत येताना डोंगरातील लाकडे तोडून त्याची भली मोठी मोळी तयार करुन येथील बाजारात विकत असत.

विठ्ठल भक्त आषाढी कार्तिकीला पंढरीला जातात आपणही वारीला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्याची त्यांची तीव्र इच्छा झाली. सावकाराकडून कर्ज घेऊन ते वारीला दिंडीसोबत निघाले असता वारीच्या पहिल्या मुक्कामात साक्षात पंढरीच्या पांडुरंगाने त्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, कडोबा तुझी भक्ती भक्त पुंडलिकासारखी आहे. माझ्या खर्‍या भक्तांना मी स्वतःच त्यांच्या भेटीसाठी जात असतो. तुला पंढरीला येण्याची गरज नाही मीच तुझ्या गावी गावच्या भल्या मोठ्या उकिरड्याखाली श्रीत्रिविक्रम रुपाने अवतीर्ण झालो आहे.

स्वप्नात साक्षात पांडूरंगाने दर्शन देवून अवतीर्ण असल्या दृष्टांतानुसार संत कडोबा वारी सोडून गावी परत आले व गावच्या कारभार्‍यांना आपला दृष्टांत सांगुन गावातील मोठा उकिरडा खोदण्याची विनंती केली. त्यानुसार खोदकाम केले असता भुयारी मंदिरात श्रीत्रिविक्रम रुपात सुंदर मोहक मुर्ती स्थानापन्न असलेली आढळून आली तेव्हा पासून विठ्ठल भक्तांचे खान्देशचे प्रतिपंढरपूर म्हणून श्रध्दास्थान ओळखले जाते.

दरम्यान या दृष्टांत पंढरीच्या पांडूरंगाने संत कडोबाना मी आषाढी व कार्तिकी एकादशीला काही क्षण श्रीत्रिविक्रम मुर्तीत साक्षात अवतीर्ण होवून भक्तांना दर्शन देईल अशी श्रध्दा तथा कथा प्रचलित आहे.

सेवाभावी संस्थांची सेवा – बाहेरगावाहून आलेल्या भाविक भक्तासाठी येथील सामाजिक मंडळे, सहकारी पतसंस्था, भाविक भक्त ठिकठिकाणी मोफत चहा-पाणी, केळी, साबुदाण्याची खिचडीचा फराळ देवून आपली सेवा बजावतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!