Type to search

जळगाव राजकीय

सुरेशदादांच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ

Share

पंकज पाचपोळ
जळगाव । एकीकडे घरकुल घोटाळ्याच्या निकालाची टांगती तलवार डोक्यावर असतांनाच दुसरीकडे माजी आमदार सुरेशदादा जैन हे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठीच खळबळ उडाली आहे. दादांच्या निवडणुकीची ही घोषणा म्हणजे जिल्ह्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदीच ठरणार आहे.

गेली 35 वर्ष जळगाव महापालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित करणारे जळगावचे अनभिषिज्ञ सम्राट सुरेशदादा जैन गेल्या पाच वर्षांपासून सक्रीय राजकारणापासून दूर राहिले आहेत. घरकुल घोटाळ्यात झालेल्या अटकेनंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीतही सुरेशदादांनी कारागृहातून निवडणूक लढविली होती. मात्र, त्यानिवडणुकीत सुरेशदादांना पराभव सहन करावा लागला. आमदार सुरेश भोळे हे त्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर एकूणच जळगावातील राजकीय हवा-पाणीच फार मोठ्या प्रमाणावर बदलले. गेल्या साडेचार वर्षात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. सुरेशदादांना गेली 35 वर्षे महापालिकेवर असलेली आपली सत्ता देखील सोडावी लागली. घरकुल घोटाळ्याचा निकालही अद्याप यायचा बाकी आहे. 15 जुलैला सुरेशदादांच्या भवितव्याचा फैसला होणार असतांनाच आणि दुसरीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीला भाजप-शिवसेनेची युती झाल्याने विधानसभा निवडणुकीतही ही युती कायम राहील, हे गृहीत धरुन भाजपाच्या नेत्यांसह भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे हे निवडणुकीची तयारी करत असतांनाच सुरेशदादांनी टाकलेली ही गुगली सर्वांनाच चक्रावणारी आहे.

निकालावरच राजकीय भवितव्याचा फैसला
सुरेशदादांनी जरी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जळगाव शहरातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली असली तरी घरकुल घोटाळ्यात सुरेशदादा जामीनावर आहेत, हे विसरुन चालणार नाही. 15 जुलै रोजी घरकुल घोटाळ्याचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालात दादांवर कोणते आरोप ठेवले जातात किंवा काय शिक्षा सुनावली जाते. यावरच दादांचे राजकीय भवितव्य देखील अवलंबून राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेच्या युतीचे काय होईल, हेही अद्याप सांगने कठीण आहे. त्यासोबतच जळगावची जागा पूर्वीप्रमाणेच शिवसेनेला सुटेल की भाजपाच्या ताब्यात राहील. यावरही विधानसभा निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. दादांनी निवडणूक लढविण्याची घोषणा करुन शहरातील गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेक इच्छुकांना मात्र चांगलीच चपराक दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!