Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

गुजरात बनले गर्भपाताचे केंद्र; जळगाव जिल्ह्यात दलाल सक्रिय

Share

पारोळा । योगेश पाटील – जळगाव जिल्हा तसेच इतर परिसरातील मंडळीद्वारे गुजरात राज्यात गर्भलिंग तपासणी तसेच स्त्री लिंग असल्यास गर्भपात करण्याचे प्रमाण वाढले आहे.यासाठी जिल्ह्यासह गुजरातमध्येही दलाल सक्रिय असून 20 ते 30 हजार रुपये घेवून गर्भपात केले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मात्र प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे.

देशात सध्या मुलांचे प्रमाण वाढत असून मुलींचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे राज्य सरकारने हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी गर्भलिंग तपासणी थांबवण्यासाठी कठोर कायदा केल्याने महाराष्ट्रात हा प्रकार जवळपास बंद झाला. तरीही बरेचसे डॉक्टर गर्भलिंग तपासणी व स्त्री भ्रूणहत्त्या करताना आढळून आल्याने त्यांचे दवाखाने सील करून त्यांच्यावर कारवाईही झाली आहे.

मात्र, गुजरात राज्यात सध्या महाराष्ट्रातून दलालांची मोठी टोळी सक्रिय झाली आहे. जिल्ह्यातील महिला रुग्णास गर्भलिंग तपासणीसाठी गुजरातमधील ठिकाण सांगितले जाते, त्यानंतर नातेवाईक व दलाल त्याठिकाणी जातात. दरम्यान, यासाठी पूर्णतः साखळी असल्याने गुजरातमध्ये आल्यावर रिक्षावाला दलालही त्यांना तपासणीस्थळी सोडण्यासाठी तयार असतो. तो रुग्णासह नातेवाईकांना कोपर्‍यातील एका दवाखान्यात नेऊन महिलेस तपासणी होऊन मुलगा की मुलगी, हे सांगितले जाते. दरम्यान, मुलगी असल्यास लगेच तेथेच गर्भपात करण्यास नातेवाईक टोकाची भूमिका घेतात. यासाठी सुमारे 20 ते 30 हजारांपर्यंत रक्कम घेतली जात असून त्यात दलालांचा हिस्सा ठरलेला असतो.

सहा महिन्यांनी दवाखान्याची बदलते जागा
गुजरात राज्यात महाराष्ट्रातील गर्भलिंग तपासणीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असल्याने गुजरातमधील स्त्रीभ्रूणहत्या करणारे डॉक्टर्स आपल्या दवाखान्याची दर सहा महिन्यांनी जागा बदलवत असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकारामुळे स्त्री भू्रणहत्या होत असल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

चिंताजनक परिस्थिती
समाजात वंशाचा दिवा मुलगाच हवा, मुलगी नको; या भावनेने मुली झाल्यावर त्यांना हुंडा लागेल, परके धन आहे असे म्हणत नाकारून गर्भलिंग तपासणी होत आहे. गर्भपात करण्याच्या प्रकारामुळे हजार मुलांमागे 800 मुली असे प्रमाण असून परिस्थिती चिंताजनक आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!