Type to search

जळगाव

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे

Share

जळगाव । अपघातांचे प्रमाण कमी करण्यासह व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सामाजिक बांधिलकी म्हणून प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात जिल्हा स्कुलबस समितीची बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, सहायक अधिकारी किरण मोरे, जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, शहर वाहतुकचे पोलीस निरिक्षक देविदास कुणगर,स्कुलबस असोचे पदाधिकारी, शालेय संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ. उगले म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची असून शासनाने स्कुलबस धोरण 2011 जाहिर केले आहे. यानुसार प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली स्कुलबस समिती गठीत करणे आवश्यक असून शालेय व्यवस्थापनाने दर महिन्यास व्यवस्थापन समितीची बैठक घेवून आढावा सादर करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या शाळांनी अद्याप समिती गठीत केली नसेल त्यांनी तात्काळ गठीत करावी. या समितीच्या दर तीन महिन्याला बैठका घेणे आवश्यक असल्याचेही डॉ उगले यांनी बैठकीत सांगितले.

नियमित तपासणी नसल्यास शाळांवर कारवाई
मुख्याध्यापकांना आपल्या शाळेत येणारे विद्यार्थी, वाहतुक करणार्‍या वाहनांची नियमित तपासणी झालेली आहे काय, त्यानुसार सर्व शाळांनी कार्यवाही करणेआवश्यक आहे. अन्यथा अशा शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही डॉ उगले यांनी दिला. शालेय विद्यार्थ्यांना स्कुलबसमधून उरवितांना तसेच चढवितांना वाहतुकीला अडथळा होता कामा नये. याकरीता वाहने रस्त्यावर न लावता ती शाळेच्या प्रांगणातच लावावी.

अग्नीशमन उपकरणे प्रथमोपचार पेटी व्यवस्था आवश्यक
स्कुलबसमध्ये अग्निशामक उपकरण, प्रथमोपचार पेटी, वाहन चालकाला त्याचा नावाचा बॅच असणे आवश्यक आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत शाळा व्यवस्थापनांने शाळेच्या गेटवर दोन वॉर्डन ठेवणे आवश्यक आहे. स्कुलबस असोसिएशनने चालकांची नेमणूक करतांना त्यांची संपूर्ण माहिती करुन घ्यावी, चालक निर्व्यसनी,वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक असून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक करु नये. ज्या वाहनांकडे असा परवाना नसेल त्यांचेवर कारवाई करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी लोही यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!