Type to search

जळगाव

बहुतांश गावात ग्रामसेवक दांडी बहाद्दर!

Share

जळगाव । सध्या जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्वला पाटील यांनी ग्राम पंचायत, प्रा. आ. केंद्र, पशू वैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, सुरू असलेली विकास कामे या ठिकाणी अचानक भेटी देण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहीम दरम्यान बहुतांश ग्रामसेवक हे दांडी बहाद्दर असून अपूर्ण कर्मचारी अभावी आरोग्य सेवा ढासळली असल्याचे निदर्शनास येत आहे.

दि. 25 रोजी ह्या मोहिमेचा 4 था दिवस होता. त्यात जि.प. अध्यक्ष ना. सौ. पाटील यांनी पारोळा तालुक्यातील म्हासवे, पळसखेड सीम, मंगरूळ, धुळपिम्प्री आदी गावांना भेटी दिल्या. यात म्हासवे येथे ग्रामसेवक उपस्थित नव्हते. तर प्रा. आरोग्य उपकेंद्र व पशू वैद्यकीय दवाखाना कुलूपबंद होते. ते नेहमीच बंद राहत असल्याची तक्रार यावेळी ग्रामस्थांनी केली. तसेच प्राथमिक शाळेत भेट दिली असता पटसंख्या आणि उपस्थिती यात मोठी तफावत दिसून आली. पटसंख्यानुसार उपस्थिती राहण्यासाठी पालक भेटी घेवून प्रयत्न करण्याच्या सूचना शिक्षकांना ना. उज्वला पाटील यांनी दिल्या. अंगणवाडीमध्ये जावून पोषण आहाराचा स्वाद घेवून आहार चांगला बनवला असल्याची खात्री केली. पळसखेड सीम येथे इयत्ता 7 वी विद्यार्थी 10 पैकी हजर 5 व इयत्ता 8 वी विद्यार्थी 10 पैकी हजर फक्त 2 अशी स्थिती प्रत्यक्ष पाहणी दरम्यान आढळली. विशेष म्हणजे जे शिक्षक आहेत तेही शिकवीत नाहीत. म्हणून अध्यक्षांची गाडी अडवून दाखले मागत होते. स्वतः मुख्याध्यापक कोठावदे मॅडम यांच्याकडे हे वर्ग आहेत. यावेळी सदर विद्यार्थी व पालकांची समजूत जि. प. अध्यक्ष उज्वला पाटील यांनी काढून जि. प. शाळेतच आपल्या पाल्यांना शिकवा ज्या उणिवा व आपल्या तक्रारी संदर्भात गांभीर्याने दखल घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

वैद्यकीय अधिकार्‍याची कान उघडणी
मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात अध्यक्षा उज्वला पाटील दाखल झाल्यावर एका गंभीर विषया संदर्भात डॉ. प्रकाश पाटील यांची त्यांनी चांगलीच कान उघडणी केली. तसेच स्विपर व अपूर्ण कर्मचारी यामुळे स्वच्छता व इतर बाबतीत आरोग्य केंद्रांचेच आरोग्य बिघडल्याचे बहुतांश ठिकाणी आढळून आले. धुळपिम्प्री येथे शिक्षक व पटसंख्या प्रमाणे विद्यार्थी उपस्थिती समाधान कारक आढळली. मात्र आजच्या दौर्‍यात एकाही गावाचे ग्रामसेवक गावी आढळून आले नाही. पावसाळा सुरू झाल्याने शाळा व परिसर वृक्षारोपण करून सुशोभीकरण करण्याच्या सूचना ना.सौ. पाटील या सर्वच गावांच्या शिक्षकांना भेटी प्रसंगी करीत आहेत. अपंगांचा ग्रामपंचायत उत्पन्नाच्या 5 टक्के निधी, गरोदर माता पोषण आहार व काळजी, योग्य लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ, शासन व जिल्यातील नेत्यांच्या माध्यमातून जिल्यात होत असलेली विकास कामे व विविध योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहाचाव्यात. तसेच जिल्हाभरात सुरू असलेले विकासकामे चांगल्या दर्जाची व्हावीत, हा या दौर्‍यामागील मुख्य हेतू अध्यक्ष उज्वला पाटील यांचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!