Type to search

क्रीडा

इंग्लंडचा सहज विजय

Share

साऊथॅम्प्टन । जो रुटच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून मात केली. वेस्ट इंडिजने दिलेले 213 धावांचे आव्हान इंग्लंडने 34 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गाठले

इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. त्यामुळे जो रुट सलामीसाठी उतरला. रुटने दमदार फलंदाजी करत शतक ठोकलं. जो रुट आणि जॉनी बेअरस्ट्रोने सलामीसाठी 95 धावांची भागीदारी केली. 15 व्या षटकात बेअरस्ट्रो 45 धावांवर बाद झाला. रुटनं त्याच्या भात्यातील तंत्रशुद्ध फटक्यांचा नजराणा पेश करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रुटनं 94 चेंडूत नाबाद 100 धावांची खेळी साकारली. यात खणखणीत 11 चौकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जो रुटनं गोलंदाजीतही कमाल केली. रुटनं यावेळी 5 षटकांमध्ये 27 धावा देत वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

तत्पूर्वी, इंग्लंडने ढगाळ वातावरणाचा फायदा उचलून विंडीजला सुरुवातीलाच पाठोपाठ धक्के देण्यास सुरुवात केली. वोक्सने एव्हिल लुईसला 4 धावांवर माघारी धाडत विंडीजला पहिला धक्का दिला. त्यानंतर गेलने फटकेबाजी करत विंडीजला 50 धावांच्या पार पोहचवले खरे पण, गेल 36 धावांवर असताना प्लंकेटच्या स्विंग गोलंदाजीवर बेअरस्टोकेर झेल देवून माघारी परतला. गेल पाठोपाठ वूडने शाय होपलाही 11 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता धरायला लावला. यामुळे विंडीजची अवस्था 13 षटकात 3 बाद 55 अशी बिकट झाली होती.

विंडीजचा निम्मा संघ माघारी गेल्यानंतर फलंदाजीला आलेल्या आंद्रे रसेलने आक्रमक पवित्रा धारण केला. त्याने 2 षटकार 1 चौकार मारत 16 चेंडूत 21 धावांची खेळी केली. पण, रसेलचा हा धडाका वूडने लगेचच संपवून इंग्लंडला दिलासा दिला. त्यानंतर एका बाजूने झुंज देत असलेल्या पुरनने विंडीजला 200 च्या पार पोहचवले. पुरन अखेरच्या षटकापर्यंत झुंज देत विंडीजला चांगली धावसंख्या उभारून देईल असे वाटत असतानाच जोफ्रा आर्चरने ही महत्वाची विकेट घेतली. आर्चरने पुरनला 63 धावांवर बाद केले.

पुरनची मोठी विकेट घेतल्यानंतर आर्चरने विंडीजचे शेपूट स्वस्तात गुंडाळण्याचा चंगच बाधला. त्याने आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखल्या जाणार्‍या ब्रॅथवेटला 14 धावांवर माघारी धाडले. पाठोपाठ कॉटरेलला शुन्यावर बाद करुन आर्चरने आपला तिसरा मोहरा टिपला. त्यानंतर मार्क वूडने गॅब्रिएललाही शुन्यावर बाद करत विंडीजचा डाव 212 धावात गुंडाळला. मार्क वूडनेही गॅब्रिएलच्या रुपाने आपला तिसरा मोहरा टिपला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!