Type to search

जळगाव

विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी इंग्रजी-मराठी शाळांमध्ये लागली स्पर्धा!

Share

जळगाव । आधुनिक स्पर्धेच्या युगात विद्यार्थी कमी आणि शाळा जास्त अशा परिस्थितीमुळे इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यावरून स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. या चढाओढीत मराठी शाळेच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळा कशा सरस आहेत, हे सिध्द करण्यासाठी इंग्रजी संस्था चालकांनी इंग्रजी शाळेत मिळणार्‍या सोयी-सुविधांची शहरासह ग्रामीण भागात फ्लेक्सद्वारे जाहिरातबाजी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी इंग्रजी व मराठी माध्यम अशी जणू स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात होत असून खासगी इंग्रजी माध्यमांच्या संस्था चालकांनी शाळा टिकवून राहण्यासाठी आतापासून विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यावर भर दिला आहे. त्यादृष्टीने फ्लेक्सबोर्ड लावून जाहिरातीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळाही मागे नसून त्यांनीही शाळेच्या वैशिष्ट्यांचे व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यातून व्हायरल केले आहेत. तर जि.प. शिक्षकांनी शाळा परिसरातील पालकांशी संपर्क साधून त्यांची मनधरणी करून पाल्यांना मराठी शाळेत दाखल करण्यासाठी प्रबोधन करून प्रवेश निश्चित केले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी मिळवून आपली शाळा टिकवून धरण्यासाठी इंग्रजी व मराठी अशी स्पर्धाच लागली आहे. काही शाळांनी शिक्षकांना नवीन विद्यार्थी मिळविण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत हे शिक्षक घरोघरी फिरताना दिसत आहेत. काही शिक्षक तर आपल्या पगारातून विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व रिक्षा भाडे देऊन प्रवेश वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

इंग्रजी शाळांबद्दल पालकांच्या मनात आकर्षण असते. मात्र सुविधा देण्याबरोबरच इंग्रजी शाळांची वाढीव फी हे अनेकांना न पेलणारे आहे. तरी देखील इंग्रजी संस्थाचालक वर्षाच्या सुरुवातीला प्रवेश मिळविण्यासाठी फी मध्ये सवलत देऊ, टप्प्याटप्प्याने फी भरा, अशी प्रलोभने दाखवितात. मात्र कालांतराने दिलेले आश्वासन पाळले जात नाही. दुसरीकडे मात्र मोफत शिक्षण देणार्‍या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. तालुक्यात सर्व शाळा डिजिटल झाल्या आहेत. शाळेत मध्यान्ह भोजन, शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, मोफत ई-लर्निंग व सर्व शाळांत डिजिटल वर्गाची सुविधा उपलब्ध असल्याने पालकांचा कल मराठी शाळेकडे वाढता आहे.

शिक्षण विभागाकडूनही सतर्कतेचा इशारा!
जिल्ह्यात सुमारे 271 इंग्रजी माध्यमांच्या शाळांना महाराष्ट्र राज्य बोर्डाची मान्यता आहे. यापैकी काही शाळांना सीबीएसईची मान्यता आहे. तर काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून सीबीएसईची मान्यता नसतानाही चुकीच्या पध्दतीने जाहिरातबाजी करून पालकांची फसवणूक होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने याबाबत एप्रिल महिन्यात पत्रक काढून पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करताना फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

विद्यार्थी कमी व शाळा जास्त
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या जोरावर इस्त्रो आणि आयुका या संस्थांना विमान प्रवासाने भेट देण्याची संधी असल्याने वेगळीच उत्सुकता पालक व विद्यार्थ्यांच्या मनात घर करून आहे. परिणामी या शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. एकंदरितच विद्यार्थी कमी व शाळा जास्त अशीच काही परिस्थिती झाल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी पालकांची मनधरणी करण्याची इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांवर वेळ आली असून त्यातून आता स्पर्धा निर्माण झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!