Type to search

maharashtra जळगाव

दुष्काळप्रश्नी सत्ताधार्‍यांचे पाहणी दौरे तर विरोधकांचा पत्रपरिषदांचा फार्स !

Share
जळगाव । जिल्हयात लोकसभा निवडणुका संपताच सत्ताधार्‍यांपेक्षा विरोधी पक्षांमध्ये दुष्काळ पाहणीवरून स्पर्धा लागली असून दुष्काळाचे तीव्र स्वरूप पाहता पाणी, चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ पाहणीचा फार्स सध्या सुरू आहे. आचारसंहिता असल्यामुळे प्रशासनाला सूचना करण्याव्यतिरिक्त ठोस निर्णय घेण्यात अडचणी येत असल्यामुळे सत्ताधार्‍यांचे पाहणी दौरे निरर्थक असल्याचे दिसते आहे, तर दुष्काळ नियोजनात राज्यशासन व प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस- राष्ट्रवादी विरोधी पक्षाकडून पत्रपरिषदांसह जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाव्दारे केला जात आहे.

जिल्हयात दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. शेतकरी आणि नागरिकांच्या प्रति आस्था असल्याचे दाखविण्यासाठी हे दौरे आयोजित करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली नाही, तोवर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांकडून जिल्हाधिकार्‍यांना चाराछावण्या सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले गेले. उन्हाच्या तडाख्यातून बचाव करण्यासाठी आचारसंहितेचे कारण पुढे करून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा कार्यालयातून स्वतःच्या वाहनातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येवून जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांना निवेदन दिले होते. तर काँग्रेसचे डॉ.राधेशाम चौधरी यांनी काँग्रेसभवनात नुकतीच पत्रपरिषद घेतली.

मूळ समस्यांकडे दुर्लक्ष
जिल्ह्यातील पर्जन्यमान, प्रकल्पातील पाणीसाठा, पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा, टँकर, विहिरींचे अधिग्रहण, पाणीपुरवठा, चारा छावणी, आदींबाबत प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती कागदोपत्री अद्ययावत असली तरी शेतकर्‍यांच्या पीक विमा, दुष्काळी अनुदान, प्रधानमंत्री किसान योजनेचे रखडलेले अनुदान यासह खरीप हंगामातील मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे.

मुख्यमंत्री, पालक सचिवांकडून आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 मे रोजी जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधून दुष्काळ परिस्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या पालक सचिवांना दुष्काळ उपाययोजनांच्या अनुषंगाने पाठविले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दुष्काळ निवारणासंदर्भात जिल्ह्यातील सरपंचांनी तक्रारी, समस्या मांडल्या. त्या समस्यांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे प्राधान्याने पालन करावे. तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना जिल्ह्याचे पालक सचिव राजेशकुमार मीना यांनी गुरूवार 16 मे रोजी जिल्हा प्रशासनाला केल्या होत्या. त्या नंतर लगेच पालकमंत्री ना.चंद्रकात पाटील यांनी शनिवार 18 रोजी जिल्हयात चाळीसगांव तालुक्यातील हिरापुर, वाघळीसह अन्य दोन तालुक्यांची पहाणी केली.

पालकमंत्र्यांच्या अधिकार्‍यांना सूचना
जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ना.पाटील यांनी तीन तालुक्यांत पाहणी केली असता शेतकर्‍यांनी पीक विम्यासह पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. चारा, पाणी, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी पाहणीअंती केल्या होत्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!