Type to search

रेल्वेस्थानक परिसराबाहेरील अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी ; प्रवाशांना मनस्ताप

maharashtra जळगाव

रेल्वेस्थानक परिसराबाहेरील अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी ; प्रवाशांना मनस्ताप

Share

जळगाव । येथील रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाभोवती मनपा हद्दीत हातगाडी, ठेलेधारक, थंड पेय,किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेते, अनधिकृत दुचाकी वाहनतळावर लावण्यात आलेल्या दुचाकी वाहनचालकांसह रिक्षाचालकांकडून दिवसेंदिवस अतिक्रमात वाढ होत असून प्रशस्त अशा रेल्वेस्थानकात प्रवेश करणार्‍या तसेच बाहेरगावाहून येणार्‍या प्रवाशांना जीव मुठीत घेवूनच बाहेर पडावे लागत असल्याचे चित्र आहे.

जळगाव जंक्शन रेल्वेस्थानकावर अनेक परराज्यातुन लांब पल्ल्यांच्या प्रवासी गाडयांना थांबा आहे. शिवाय येथुन जवळच असलेल्या जागतीक प्रेक्षणीय स्थळ अजिंठा, गांधीतीर्थ, जैनव्हॅलीसह अन्य प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी परदेशातील नागरीक शहरात दाखल होत असतात. पालीटेक्नीक, अभियांत्रीकी,कृषि,वैद्यकिय,पदवी,पदव्यत्तर महाविद्यालये, विविध विद्याशाखांसह मोठया प्रमाणावर खाजगी क्लासेसच्या निमित्ताने बाहेर गावाहुन येणारा विद्यार्थी वर्ग शिवाय शासकिय, निमशासकिय, खाजगी आस्थापनांमधे कार्यरत कर्मचार्‍यांची देखिल मोठया प्रमाणावर येजा करतात. दिवसभरातुन किमान 90च्या वर मेल सुपरफास्ट एक्सप्रेस गाडयांना थांबा आहे. स्थानकावर एकाच वेळी दोन तीन गाडयांचे प्रवासी आल्यास मोठया प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी रिक्षाचालक आपआपली वाहने रस्त्यातच वाटेल तेथे उभी करून गिर्‍हाईक मिळविण्यासाठी धडपडत असतात. यात अनेक दुचाकीधारक देखिल वाट काढण्याचा प्रयत्न करीत असतात. एकाद्या मंत्र्याचा किवा अधिकार्‍यांचा दौरा असेल अशा वेळीच या ठिकाणी पोलिस तैनात असतात अन्यथा या परीसरात चौकी असून देखिल नसल्यासारखीच आहे. बहुतांश वेळा पोलिसचौकी बंदच आढळून येते.

रेल्वे स्थानक परीसराबाहेर महानगरपालिका हद्दीत गेल्या दिडदोन वर्षापुर्वी जलसंपदामंत्री महाजन यांच्या वाहनाला दुचाकीस्वाराचा कट लागण्याच्या कारणावरून वाद उद्भवला होता. मंत्र्यांनी तक्रार केल्यानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. परंतु त्यानंतर आजपर्यत ठोस अशी कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही. या परीसरात रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणावर नियमित होत असलेल्या अतिक्रमणास स्थानिक प्रशासनाचा आशिर्वाद असल्याचेच बोलले जात आहे. या अतिक्रमणाचा फायदा अनेक संधीसाधु घेत असून गर्दीत प्रवासी मिळविण्याच्या निमित्ताने महिलां प्रवाशांच्या अंगचटीला जाण्याचे प्रकार होत असल्याने अनेकवेळा हाणामारीचे प्रसंग देखिल उदभवत आहेत. आंबेडकर पुतळया नजीक असलेल्या बॅरीकेटस जवळच लावण्यात आलेल्या हातगाडयांच्या अतिक्रमणामुळे स्थानक परीसरात प्रवेश करणे दिव्यच आहे.या परीसरात अनेकदा सांडपाण्याचे डबके साचत असल्याने पायी चालणार्‍यांना जिकीरीचे होत असून सबंधित प्रशासनाने वेळीच कारवाई करावी असे बोलले जात आहे.

हद्दीच्या वादामुळे रेल्वेस्टेशन परिसरात पोलिसांची कारवाईसाठी टाळाटाळ
जळगाव रेल्वे स्थानक परिसर उपद्रवी, चोरट्यांचे आश्रयस्थान बनले आहे. दररोज रात्री उशिरापर्यंत या परिसरात हातगाड्या सुरु असतात. याठिकाणी रात्रीच्यावेळी येणार्‍यांची संख्याही जास्त असते. त्यामुळे या परिसरात नेहमी टवाळखोरांची वर्दळ असते. रात्री प्रवासी महिलांच्या छेडखानीच्या घटना, किरकोळ कारणावरून हाणामारीच्या घटनांमुळे अनेकदा मोठे वाद देखील झाले आहे. रेल्वे पोलीस हे शहर पोलीस स्टेशनची हद्द असल्याने तर शहर पोलीस हे रेल्वे पोलीसांची हद्द असल्याने कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करतात.

दररोज रेल्वे स्टेशन परिसरात रात्री चहाची गाडी लागते. ती चहाची हातगाडी रेल्वेच्या हद्दीत सुरु असल्याने शहर पोलीस रात्री कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. या चहाच्या गाडीवर रेल्वे पोलीसांनी कारवाई केल्यानंतर ती हातगाडी एक-दोन दिवस रेल्वे स्टेशनच्या बाहेरील जागेत लागते. त्यानंतर पुन्हा रेल्वेच्या हद्दीत ही चहाची गाडी सुरु होते. रात्रीच ही गाडी या परिसरात लागते.

उपद्रवींच्या सर्वसामान्यांना त्रास
रेल्वेस्टेशन परिसरात रिक्षावाले, उपद्रवी टवाळखोरांचा सर्वसामान्यांसह प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा रिक्षावाले बाहेरगावावरून आलेल्या प्रवाश्यांशी वाद घालतात. दरम्यान पोलीस स्टेशनबाहेरील पोलीस चौकी देखील नेहमी बंद असते. त्यामुळे या परिसरात पोलीस प्रशासनातर्फे कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

रेल्वेस्टेशन परिसरात रात्री कायमस्वरुपी कर्मचार्‍यांची नियुक्ती करा!
रेल्वे स्टेशन परिसरातील नेहमी क्षुल्लक कारणांवरून वाद होत असतात. या परिसरात महिलांची छेडखानी, मोबाईल चोरी, लुटमार, हाणामारीच्या घटना नेहमी होत असतात. शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या कायमस्वरुपी फिक्स पॉईट नेमून याठिकाणी 2 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे याठिकाणी देखील रात्री नेहमीसाठी पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!