Type to search

शहरातील मुख्य पाच नाल्यांची अद्यापही सफाई नाहीच!

maharashtra जळगाव

शहरातील मुख्य पाच नाल्यांची अद्यापही सफाई नाहीच!

Share
जळगाव । अवघ्या तीन आठवड्यावर पावसाळा येऊन ठेपला असतांनाही नाला साफसफाईची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. मुख्य नाल्यांची साफसफाई अद्यापही झाली नाही. नाले, उप नाल्यांची सफाईची कामे सुरू करण्यात आली असली तरी प्रभाग अधिकार्‍यांकडून मुख्य पाच नाल्यांच्या सफाईला सुरुवात देखील झाली नसल्याने अतिवृष्टी झाल्यास शहरवासीयांना पुन्हा पूरसदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात शहरातील बोगस नालेसफाईचे प्रकार समोर आले आहेत. शहरातील काही पडक्या इमारती धोकेदायक झाल्या असून त्याबाबत देखील प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे.

शहरात 23 कीमी लांबीचे 5 मोठे नाले आहेत. या पाच प्रमुख नाल्यांसह 70 उपनाले आहेत. सफाईच्या मोहीम पावसाळ्यापूर्वी केली जाते. या नाल्यामधील सर्व गाळ व कचरा काढून नाल्याचा प्रवाह मोकळा करण्यात येतो.पावसाळ्यापूर्वी दोन महिने आधीपासून करण्यात येणारी नालेसफाईची कामे सुरु करण्याचे आदेश आयुक्तांनी मागच्या महीन्यातच दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने शहरातील 70 उपनाल्यांची (लहान) सफाई आरोग्य विभागाकडून करावी तर शहरातील मुख्य पाच नाल्यांची सफाई चार प्रभागअधिकार्‍यांनी जेसीबीसह यंत्रणा भाडे तत्वावर घेवून करण्याचे ठरले होते. या चारही प्रभागांसाठी 30 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने पालिकेच्या जेसिबीने उप नाल्यांची सफाई सुरु केली आहे.मात्र, मुख्य नाल्यांच्या सफाईला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. मे महिन्याच्या तिसरा आठवडा आला आहे. असे असतानाही जेसीबी भाड्याने घेऊन काम का सुरू झाले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नालेसफाईसाठी मक्ते काढण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही.

आतापयत नालेसफाई पूण करणे अपेक्षित असतांना प्रभाग अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे या कामास सुरुवातच झाली नसल्याने शहरवासीयांना अतिवृष्टीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मागील अनेक वर्षे आपत्ती व्यवस्थापनात अपयशी ठरलेल्या महापालिकेने यंदा देखिल मान्सूनपूर्व तयारी अद्याप प्रभावीपणे सुरू केलेली नाही. मागील काही वर्षात अनेकदा अतिवृष्टी झाली. लेंडी नाल्याच्या पूरामुळे तर ममुराबाद रस्ता दिवसभर बंद राहिला होता. गेल्या पावसाळ्याच्या चार महिन्यात खंडेराव नगरातील पूल दोनवेळा वाहून गेल्याने या भागातील संपर्क तुटला होता. शाहू नगरातील व मेहरूण परिसारात तुंबलेल्या गटारींचे पाणी ओव्हरफ्लो होऊन काही घरांमध्ये घुसले होते.

या पार्श्वभूमीवर दीड महिना अगोदर प्रत्यक्ष कारवाईच्या सूचना देऊनदेखील प्रभाग अधिकार्‍यांनी त्यास गांभीर्याने घेतलेले नाही. शहरातील अखेरच्या घटका मोजत असलेल्या तब्बल 108 पेक्षा जास्त इमारती आहेत. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीच्या मालकांना नोटीस बजावण्याची औपचारिकता महापालीका प्रशासन नेहमीप्रमाणे पार पाडणार आहे. मात्र, ही काही वर्षांपासूनची नोटीस देण्याच्या परंपरेचा काहीही फरक प्रशासन व इमारत मालक यांच्यावर पडत नसल्याचे दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!