Type to search

जळगाव

एकमुस्त ठेका रद्द करा, नवीन पर्याय द्या!

Share

जळगाव । शहरातील कचर्‍याचा प्रश्न सुटता सुटत नसून सर्वदूर कचरा झालेला आहे. ठेकेदार हा पूर्णत: अपयशी ठरलेला असल्याने त्यास ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे अथवा त्याचा ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी महानगर शिवसेनेतर्फे करण्यात आली. यावेळी आयुक्तांना गाजर देण्यात आले. यावेळी उपायुक्त (सा.प्र.) अजित मुठे, उपायुक्त (आरोग्य) मिनिनाथ दंडवते, आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील आदी उपस्थित होते.

शिवसेना महानगर कार्यालयापासून शिवसेनेच्या मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी शिवसेना विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगराध्यक्ष शरद तायडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा दुपारी 12 वा. मनपाकडे आगेकू च करीत निघाला. मोर्चात मोठ्या प्रमाणावर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आदींचा सहभाग होता. विविध घोषणा देत मोर्चा मनपाकडे निघाला. 12.30 वा. मोर्चेकरी मनपात पोहोचले. यावेळी थोडा वेळ त्यांनी बाहेर घोषणा दिल्या. त्यानंतर मनपातील 13 व्या मजल्यावरील आयुक्तांच्या दालनात मोर्चेकर्‍यांनी धडक मारली. मागण्या मांडल्या. आंदोलनाप्रसंगी नगरसेवक प्रशांत नाईक, स्वीकृत नगरसेवक अमर जैन, विभागीय प्रमुख प्रशांत सुरळकर, जितेंद्र मुंदडा, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

ठेक्याची पार्श्वभूमी

एकमुस्त ठेका हा 75 ते 80 कोटीचा असून तो 5 वर्षासाठी नाशिक येथील वॉटर ग्रेस प्राडक्ट कंपनीला देण्यात आला आहे. ठेक्याची वर्क ऑर्डर 16 ऑगस्ट रोजी देण्यात आली असून 16 पासून एकमुस्त ठेक्याच्या कामकाजास प्रारंभ झाला. 21 पासून कामास गती आली. मनपाची वाहने घंटागाड्या वगैरे ठेकेदाराच्या ताब्यात देण्यात आली. आज पावणे तीन महिने होत आहेत.

शिवसेनेच्या मागण्या

ठेकेदाराचे लाड प्रशासन पुरवते की सत्ताधारी असा सवाल विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी यावेळी उपस्थित केला. एकमुस्त ठेकेदारास ब्लॅक लिस्टमध्ये टाकले पाहिजे, ठेकेदाराचा ठेका रद्द केला पाहिजे, ठेकेदारास पाठीशी घातले जातेय असा घणाघात महानगराध्यक्ष शरद तायडे यांनी केला. दंड पूर्णत: आकारला जात नाही, पेमेंटही जास्त द्यावयास नको होते असे नितीन बरडे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. तसेच  आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, अधीक्षक वार्डात फिरकत नाहीत, घंटागाड्या येत नाहीत, 5 ते 6 दिवसात घंटागाडी येते, ठेकेदाराचा दंड पूर्णत: कापला जात नाही, शहरात सर्वदूर कचरा साचलेला आहे. ठेकेदाराचे पेमेंट देण्याची घाई करण्यात आली, पेमेंट द्यावयास नको होते,  आरोग्य अधिकार्‍यांच्या गल्लीत तीन पेशंट आहेत, घंटागाड्या या कचरा उचलण्यास अकार्यक्षम ठरत आहेत असे विविध  आरोप वजा मागण्या शिवसेना महानगरातर्फे यावेळी करण्यात आल्या.

पर्याय निवडा

ठेकेदारास पाठीशी घातले जातेय, ठेकेदाराचे लाड सत्ताधारी करतात की प्रशासन हे स्पष्ट झाले पाहिजे, आज सर्व शहरात कचरा झाला आहे, ठेकेदाराचे कर्मचारी करतात काय, कचर्‍यामुळे विनाकारण पैसे जातात, त्यामानाने कचरा उचलला जात नाही, योग्य तो दंड करा.

-सुनील महाजन

15 पासून कारवाई

15 नोव्हेंबर पासून ठेकेदारासह आरोग्य निरीक्षक व सर्वांनाच कडक करण्यात येणार असून सर्व पातळीवरील दंड आकारला जाईल, दोषीची गय केली जाणार नाही, एकमुस्त ठेक्यास 15 रोजी तीन महिने पूर्ण होत आहेत. त्या दिवशी त्वरित आरोग्य विभागाची मिटींग घेतली जाईल. त्यात आढावा घेतला जाईल व योग्य ती निती ठरवली जाईल असेही आयुक्त यावेळी म्हणाले.

घंटागाडीचालकांची अरेरावी

ठेकेदारास पाठीशी घातले जातेय, आरोग्य निरीक्षक, आरोग्य अधीक्षक वार्डावार्डामध्ये दिसत नाहीत,  अयोध्या नगरात तर आरोग्य विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे. येथे रस्तेही खराब आहेत, चार ते पाच दिवस घंटागाडीच येत नाही अशीही तक्रार काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली. यावेळी ठेकेदार अकार्यक्षम ठरत असल्याचे अयोध्यानगरातील कचर्‍याच्या चित्रावरुन स्पष्ट होते.

कोणालाही पाठीशी घातले नाही

कुणालाही पाठीशी घातलं जात नाही, मी येण्याच्या अगोदर टेंडर प्रोसीजर फायनल झाल्यासारखी होती. तीन महिनेपयर्र्त ठेकेदारास अधिक दंड करता येत नाही असे अटी शर्ती व करारातही म्हटले आहे, काम थांबू नये म्हणून आपण ठेकेदाराचे पेमेंट केले आहे तेही कमी प्रमाणात, कचरा साठला जावू नये, नागरिकांना त्रास होवू नये म्हणून आपण ठेकेदारास पैसे दिले, दंड हा पूर्णपणे आकारला जाईल आणि कापलाही जाईल, तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आपण योग्य ती कारवाई करु शकतो.

-डॉ.उदय टेकाळे, आयुक्त

 

…तर मनपात कचरा आणणार

आठ दिवसात जर कचरा साफ केला गेला नाही तर शहरातील सर्व कचरा जमा करुन तो मनपाच्या दारात आणून ठेवला जाईल असा सूचक इशाराही यावेळी महानगराध्यक्ष शरद तायडे यांनी केला. घंटागाडी चालक ज्या वेळी प्रभागात फिरतात त्यावेळी ते उर्मटपणाने उत्तरे देतात, उर्मटपणे नागरिकांशी वागतात, अशा घंटागाडी चालकांना  समज द्यावी, दुसर्‍यांदा असा प्रकार कुणा चालकाकडून झाल्यास गय नाही अशीही तक्रार महानगराध्यक्ष शरद तायडे यांनी केली.

-शरद तायडे 

 

मनपा वाहनांचे भाडे आकारा

मनपाची 8 ट्रॅक्टर, 3 लोडर, 2 जेसीबी असतांना तसेच चालकही असतांना मनपाने ते पैसे ठेकेदाराकडून कापणे गरजेचे होते. मात्र ते अद्यापही कापले जात नाही असे नगरसेवक नितीन बरडे यांनी निदर्शनास आणून दिले आतापयर्र्त 79 लाख रुपये दंड आकारला पाहिजे होता असेही ते म्हणाले.

-नितीन बरडे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!