Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या राजकीय

जळगाव, भुसावळात सर्वाधिक 21 उमेदवार

Share

देशदूत चमूकडून – जळगाव जिल्ह्यात शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात सर्व प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. जिल्ह्यात सध्या जळगाव व भुसावळ येथे सर्वाधिक 21, तर पाचोर्‍यात सर्वात कमी सात उमेदवार आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर विविध मतदारसंघातील लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल. त्यात जामनेर व मुक्ताईनगर या दोन्ही मतदारसंघांवर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जामनेरात ना.गिरीश महाजन यांना संजय गरुड हे कितपत टक्कर देतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तसेच मुक्ताईनगरात एकनाथ खडसे यांच्या जागी उभ्या राहिलेल्या रोहिणी खडसे यांची जादू तालुक्याती किती चालते याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

चोपड्यात 5 उमेदवारांचे अर्ज बाद
चोपडा – चोपडा (अनुसूचित जमाती) विधानसभा मतदारसंघासाठी 5 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सीमा अहिरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनिल गावित, निवडणूक नायब तहसीलदार राजेश पौळ यांच्या उपस्थितीत छाननीचे कामकाज पार पडले. छाननीत पाच उमेदवारांचे अर्ज बाद, तर 18 उमेदवारांचे 24 अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.छाननीप्रसंगी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक नरेंद्रसिंग पटेल हे उपस्थित होते. अरुणा बाविस्कर यांचा वंचितकडून भरलेला अर्ज आघाडीला निवडणूक आयोगाची मान्यता नसल्याने बाद झाला. तसेच माजी नगराध्यक्षा मनीषा चव्हाण यांचा महाराष्ट्र क्रांती सेनेकडून दाखल केलेला अर्ज निवडणूक आयोगाची पक्षाला मान्यता नसल्याने बाद झाला. मात्र, या दोघा उमेदवारांचे अपक्ष अर्ज वैध झाले आहेत. माजी पं.स.सभापती डी. पी.साळुंके यांचा मनसेकडून भरलेला अर्ज ए.बी.फॉर्म नसल्याने बाद, तर अपक्ष अर्ज वैध झाला आहे. मगन बाविस्कर यांचा भाजपाकडून भरलेला अर्ज ए.बी.फॉर्म नसल्याने बाद, तर अपक्ष अर्ज वैध झाला आहे. अजय चव्हाण (रा.धरणगाव) यांचा अपक्ष अर्ज आयोगाच्या नियमाप्रमाणे उमेदवाराचे वय 25 वर्षापेक्षा कमी असल्याने व मतदार यादी क्रमांक न जोडल्याने बाद झाला. छाननीप्रसंगी कोणत्याच उमेदवारांनी हरकत घेतली नाही.

भुसावळमध्ये 7 अर्ज अवैध
भुसावळ – येथे छाननीत रजनी संजय सावकारे यांच्यासह 7 अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे आता 21 उमेदवारांचे 27 अर्ज शिल्लक राहिले आहे. माघारीनंतर मैदानात कोण राहते हे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, सतीश घुले व गीता खचणे यांच्या उमेदवारीवर घेण्यात आलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी फेटाळली.

रजनी सावकारे यांनी भाजपातर्फे डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. अधिकृत उमेदवार संजय सावकारे यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला, तर रजनी सावकारे यांनी एबी फॉर्म जोडला नसल्यामुळे तसेच सतीश घुले यांचा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भरण्यात आला होता. मात्र, एबी फॉर्म नसल्यामुळे तो अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. दुसर्‍या अपक्ष अर्जात त्यांनी गुन्ह्यांची माहिती लपवल्याने अपक्ष उमेदवार जानकीराम सपकाळे यांनी हरकत घेतली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी ती हरकत फेटाळून लावली. प्रतिज्ञापत्रावर निर्णय घेण्याचा अधिकार मला नसल्याचे त्यांनी सांगितले. सपकाळे यांनी वराडसिम येथील सरपंच गीता खाचणे यांच्या नावावरही हरकत घेतली. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून, जातीचे प्रमाणपत्र हे ओबीसी असल्याची हरकत घेण्यात आली आहे. मात्र, हा अर्जही सुलाने यांनी फेटाळला.

चाळीसगावला 13 जणांचे अर्ज वैध
चाळीसगाव – येथे 16 उमेदवारांपैकी तिघांचे उमेदवारी अर्ज शनिवारी छाननीअंती अवैध ठरले. त्यात तिघा अपक्षांचा समावेश आहे, तर 13 जणांचे अर्ज वैध ठरलेत. माघारीची मुदत सोमवार असल्याने त्याच दिवशी या मतदारसंघातील चित्रही स्पष्ट होणार असल्यामुळे आता सर्वांच्या नजरा माघारीकडे लागल्या आहेत.

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात 16 उमेदवारांनी मुदतीअंती 27 अर्ज दाखल केले होते. त्यात इनेश जाधव या उमेदवाराची डिपॉझीट आणि प्रतिज्ञापत्रअभावी अवैध ठरली, तर मच्छिंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्जावर 10 सूचक देणे आवश्यक असताना एकच सूचक दिला. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. प्रभाकर जाधव यांनी प्रतिज्ञापत्र जोडले नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. आता 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यात राजीव देशमुख (रा. काँ.), राकेश जाधव (मनसे), मंगेश चव्हाण (भाजपा), प्रतिभा चव्हाण (अपक्ष), मोरसिंग राठोड (वंचित), सुभाष हिरालाल चव्हाण (अपक्ष), विनोद कोतकर (अपक्ष), ईश्वर मोरे (अपक्ष), उमेश करपे (अपक्ष), संजय पाटील (अपक्ष), विनोद सोनवणे (अपक्ष), ओंकार केदार (अपक्ष), डॉ.तुषार राठोड (अपक्ष) यांचा समावेश आहे.

पाचोर्‍यात 7 अर्ज वैध, तर 2 अवैध
पाचोरा- येथे छाननीअंती 7 अर्ज वैध, तर 2 डमी अर्ज अवैध ठरले. वैध अर्जांमध्ये शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, अपक्ष अमोल शिंदे, राजेंद्र चौधरी तर वंचितचे नरेंद्र पाटील, बसपाचे संतोष मोरे, बहुजन महापार्टीचे मांगो पगारे यांचे अर्ज वैध, तर संजय वाघ व सुनीता पाटील यांचे डमी अर्ज अवैध ठरले. आता एकूण 7 उमेदवार मैदानात आहेत.

अमळनेरमध्ये 11 जणांचे अर्ज वैध
अमळनेर- येथे सर्व 11 उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरवण्यात आले, तर आ. शिरीष चौधरी यांच्या अर्जात त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची नोंद केली नसल्याने अर्ज बाद करावा, अशी हरकत अ‍ॅड. यज्ञेश्वर पाटील यांनी घेतली. त्यावर निवडणूक अधिकारी सीमा अहिरे यांनी सायंकाळी साडेसहा वाजता निकाल दिला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार अर्जात नोंद असल्याने अर्ज मंजूर करण्यात आला, तर रा. कॉ.चे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या अर्जावर आ. चौधरी गटाकडून वेळेत हरकत अर्ज न आल्याने त्यांचा तक्रार अर्ज नामंजूर करून अर्ज वैध ठरवला गेला. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर 11 जणांचे 16 अर्ज दाखल झाले होते. यात राष्ट्रवादी काँ. आघाडीचे अनिल पाटीलविरुद्ध भाजपाचे आ.शिरीष चौधरी यांच्यात सरळ लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. वैध उमेदवार असे संदीप पाटील (अपक्ष), अनिल भाईदास पाटील (रा. कॉ.), नरेश कांबळे (अपक्ष), जयश्री पाटील (अपक्ष), अरुण वंजारी (वंचित), अंकलेश पाटील (मनसे), शिरीष चौधरी (भाजपा), रामकृष्ण बनसोडे (बसपा), अनिल भाईदास पाटील (धाबे, ता. पारोळा), अनिल भाईदास पाटील (रणाईचे, ता. अमळनेर) यांचा समावेश आहे.

मुक्ताईनगरात 17 अर्ज वैध, 4 अर्ज बाद
मुक्ताईनगर – येथे एकूण 21 अर्जांची आज छाननी करण्यात आली. त्यात 17 अर्ज वैध, तर 4 अर्ज बाद झाले. त्यामुळे 12 उमेदवार रिंगणात उरले आहेत. मुक्ताईनगर तहसील कार्यालयात अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात आ. एकनाथ खडसे यांनी भरलेले दोन्ही अर्ज हे एबी फॉर्म नसल्याने बाद झाले. अशोक कांडेलकर यांचाही अर्ज भाजपाकडून एबी फार्म न मिळाल्याने बाद करण्यात आला. विनोद यांनी 2 दाखल केले होते. त्यापैकी राष्ट्रवादीमार्फत एबी फॉर्म न मिळाल्याने तो बाद, तर एक अपक्ष अर्ज बाद करण्यात आला. तसेच नितीन कांडेलकर यांचेही 2 अर्ज दाखल होते. त्यापैकी वंचितकडून एक अर्ज फॉर्म न मिळाल्याने बाद, तर एक अपक्ष अर्ज करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांचे अपक्ष 2 अर्ज, अनिल गंगातीरे- अपक्ष एक अर्ज, भगवान दामू इंगळे बहुजन समाजवादी पार्टी एक अर्ज, ज्योती महेंद्र पाटील अपक्ष अर्ज, संजीव कडू इंगळे अपक्ष अर्ज, अ‍ॅड. रवींद्र प्रल्हादराव पाटील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष दोन अर्ज, विनोद तराळ तर अपक्ष एक अर्ज, खडसे रोहिणी भारतीय जनता पार्टी- दोन अर्ज, अ‍ॅड. राहुल अशोक पाटील वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असे दोन अर्ज, नितीन कांडेलकर अपक्ष अर्ज, राजेंद्र दगडू सांगलकर अपक्ष- अर्ज, संजय प्रल्हाद कांडेलकर अपक्ष- अर्ज अशा एकूण एकवीस अर्जांपैकी 17 अर्ज वैध ठरवण्यात आले, तर 4 अर्ज बाद करण्यात आले. वैध ठरलेल्या अर्जानुसार आता 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघाकडेे सर्वांचे लक्ष लागून आहे.

जामनेर मतदारसंघात 7 अर्ज अवैध
जामनेर – जामनेर विधानसभा मतदारसंघातून काल अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 21 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.आज त्या अर्जांची छाननी केली असता 7 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले असून, 14 उमेदवारांचे अर्ज आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत मते यांनी पत्रकारांना दिली. 7 ऑक्टोबर रोजी माघारीची शेवटची तारीख असल्याने किती उमेदवार माघार घेतात? याकडे सार्‍यांचे लक्ष असून त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. अवैध झालेल्या अर्जांमध्ये शरद त्र्यंबक पाटील, साधना गिरीश महाजन, अमोल योगिराज ठोंबरे, मदन शिवलाल जाधव, राहुल सुपडू सोनार, अमिज तडवी, जितेंद्र श्रावण पाटील अशा या उमेदवारांची नावे आहेत. तसेच ज्या 14 उमेदवारांचे अर्ज वैध आहेत यामध्ये विद्यमान नामदार गिरीश दत्तात्रय महाजन, (भाजपा), विजयानंद अरुण कुलकर्णी (मनसे), शक्तिवर्धन शांताराम सुरवाडे (बहुजन समाज पार्टी), भीमराव नामदेव चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), विजय जगन तंवर (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), गजानन रामकृष्ण माळी, नामदेव चत्तरसिंग चव्हाण, पवन पांडुरंग बंडे, मूलचंद धनसिंग नाईक, प्रभाकर पंढरी साळवे, शरद त्र्यंबक पाटील, पंढरीनाथ ज्योतीराम सुरवाडे अशा सर्व आठ उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!